संत चोखामेळा म. चरित्र ४१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ४१.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा आणि ५-६ वृध्द चौथर्‍याचे बांधकाम करीत होते.चोखोबा हाताने काम करीत होते पण मन मात्र विठ्ठलाकडे धाव घेत होते.अवघे विठ्ठल मय झाले होते.एवढ्यात अचानक कोणाला कांही कळायच्या आंत आदल्या दिवशी बांधलेल्या तटबंदीच्या बुरुजाची भिंत धडाडधूम आवाज करीत कोसळली काम करणारे मजूर दगडांच्या राशीखाली गाडल्या गेले.दगडाच्या माराने उताणे पडलेल्या चोखोबाला एखाद्या लहान बालकासारखा सावळा विठ्ठल,त्यांचा पंढरीनाथ एवढ्या उंचीवरुन झेप घेत आहे असे दिसतांच,त्याला लागेल असे वाटल्याने जिवाच्या आतंकाने ओरडत थांबss विठूराया थांबss मी तुला अलगद झेलतो…ये माझ्या मिठीत ये..!!

दगडांच्या वर्षावाखाली रक्ताळले ले जखमी चोखोबा उठण्याची धडपड करत,झेपावणार्‍या विठ्ठलाला झेलण्या साठी पुनः पुनः उठत,दगड अंगावर पडला की,पुन्हा जखमी होऊन खाली पडत.पायावर मोठा दगड पडल्याने जायबंदी झालेले चोखोबा म्हणाले,थांब विठुराया थांब असे ओरडत उठण्याची धडपड करीतच होते.एकामागुन एक दगडं छाती,पोटावर पडत होते.शुध्द हरपायला लागली,तरीही प्राण कंठाशी आणुन पुटपुटत उंचावरुन झेपावणार्‍या विठ्ठलाला क्षीण आवाजांत थांब,विठू राया थांब असे अस्पष्ट पुटपुटत असतांना डोळ्यापुढे अंधार पसरला.चोखोबा अंधाराच्या खोल गर्तेत बुडत होते आणि चमत्कार झाला.शुध्द हरपण्यापुर्वी एक आर्त हाक मारली पांडुरंगा धाsss व ही जाणीवेतील शेवटचीच हाक असावी. खोल खोल विहिरीत पडतो आहोत असे वाटत असतांनाच,इतकावेळ विठोबाला झेलण्याचा प्रयत्न करणार्‍या चोखोबाला तळाशी विठोबानेच आपल्याला झेलले अगदी फुलासारखे!शेवटची नजर विठू रायावर टाकली.देवाने आपल्याला झेललय पाहुन एक अस्पष्टसे स्मित ओठावर ओघळले आणि विठुरायात मिळुन गेले.जीवात जीव मिसळला. मिटल्या डोळ्यांत समाधान,तृप्ती,अस्पुट से स्मितहास्य,विठ्ठलाशी तादात्म्य पावले.लौकिकार्थाने चोखोबांची इच्छा अपुरी राहिली होती.पण शेवटच्या क्षणी त्यांचा विठ्ठल जवळ होता नव्हे,त्यांना बोलवायलाच आला होता.

“शुध्द भाव,शुध्दमती।ऐसे पुराणे वदती।।
जयासाठी जप तप।तो हा विश्वाचाचिबाप
नामे पातकी तारिलें।जडजीव उध्दरिले।
विश्वास दृढ धरा मनी।चोखो मिठी घाली चरणी ।।” असं प्रांजलपणे आणी उत्कट भावनेने सांगणारे चोखोबा आज खरोखरच विठ्ठलचरणी लीन झाले होते. विठ्ठल विठ्ठल असे श्वासोच्छासाच्या लयीत म्हणणारे,नामदेवांना प्रश्न वाचारुन भंडवणारे,अट्टाहासाने दीपमाळ बांधणारे अस्पृश्य जातीत जन्माला येऊनही उत्कट भगवद् भक्ती करणारे,अस्पृश्य म्हणुन जगतांना इतकी भावोत्कट अभंगरचना करणारे,लौकिक जीवनांत दुर्दशा असुनही अत्मभान राखुन जाणीवपूर्वक आत्मगान करणारे नाम हेच परब्रम्ह ठासुन सांगणारे,इतकी पराकोटीची विठ्ठलभक्ती करणारे,श्वासाश्वासातुन नाम जपत रक्ताच्या थेंबाथेंबापर्यंत नेऊन पोहोचवणारे,विठ्ठलाचा हा लाडका सखा भक्त,संतपरिवारांत मानाचे स्थान लाभलेले हे संत चोखोबा वैशाख वद्य पंचमीला विठ्ठलाच्या चरणी समर्पित झाले.

अरेss भिंत पडली,कोसळली. धावा ss धावाss ! पळाss पळाss असा एकच हलकल्लोळ,हाहाःकार मंगळवेढ्याच्या गांवकुसाजवळ माजला. कुणाला कांहीच कळेना,उमजेना.जो तो जीव वाचवत सैरावैरा धावत होता.पळत होता.धडाधड भिंती कोसळत,मोठमोठे दगड वरुन खाली पडत होते.सगळीकडे मातीच्या धुराळ्याने दिसेनासं झालं. कोणाचं काय झालं?कशाचाच मेळ लागत नव्हता.भीतीने मारलेल्या किंकाळ्या,मदतीसाठीचा टाहो फोडणार्‍या आर्त हाका,वेदनांनी भरलेले तीव्र स्वरातील कण्हणे,विव्हळणे,छाती पिटून केलेला आक्रोश,मृत्युच्या भीषण तांडवाने सारा परिसर शोकाकुल होऊन  गेला.मातीची धूळ,थर कमी झाल्यावर, सगळ्यांनी भिंतीजवळ धाव घेतली. जवळ जवळ दोन पुरुष उंचीची भींत कोसळुन बांधकाम करणारे ६०-७० मजूर ढीगार्‍याखाली सांपडुन मृत्युमुखी पडले होते.घटना कळतांच मदत कार्या साठी सरदाराचचे सैनिक धावुन आले.या दगडमातीच्या ढिगार्‍यात एक श्रेष्ठ भगवद् भक्त श्रेष्ठसंत,चिरविश्रांती घेतोय याची त्या सैनिकांना काय कल्पना? तिकडे दूर परमुलखात असलेल्या नामदेवांनाही आज सतत अपशकुन होत होते.शतकोटी अभंग रचण्याचा संंकल्प आपल्या हयातीत पूर्ण करण्यासाठी तीर्थाटन करुन वारकरी संप्रदाय व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्या ची सर्वत्र संचार करणारे नामदेव आतां शरीराने थकले होते.मनांत मात्र प्रचंड उत्साह होता.सरस्वती ज्यांच्यावर नेहमी प्रसन्न होती ते नामदेव आज धर्मसभेत बोलतांना अडथळत होते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *