संत चोखामेळा म. चरित्र २४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  २४.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

अतिव आनंदाने सगळ्यांना स्नेह भोजनाचे आमंत्रण देऊन भारवल्या देही चोखोबा तरंगतच घरी पोहोचले.विठ्ठल विठ्ठल हा त्रिक्षरी मंत्र त्यांच्या रोमरोमी भिनला होता.मंत्राळलेल्या उन्मनी अवस्थेत सोयराला सारा प्रसंग सांगीतला “धन्य धन्य नामदेवा।केला उपकार जीवा चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव। दाखविला देव ह्रदयी माझ्या ।।” सोयराच्या आनंदाश्चर्याला पारावार राहिला नाही.तिचा मुळी विश्वासच बसेना आपले बाळांतपण करायला निर्मळाच्या रुपात प्रत्यक्ष परमेश्वर आले.आपणही कांहीतरी विशेष आहो अशा मनःस्थितीत तिच्यातली प्रतिभा जागी होऊन तिला स्फुरलेली अभंगरचना केव्हा चोखोबाला ऐकवतो असे झाले.थोडे निवांत झाल्या वर तिने केलेले काव्य… “नाही उरली वासना।तुम्हा नारायणा पाहतां।उरला नाही भेदाभेद।झाले शुध्द अंतर।विटाळाचे होते जाळे।तुटले बळे नामाच्या।चौदेही सुटली दोरी।म्हणे चोखाची महारी।।
अवघा रंग एक झाला।रंगी रंगला श्रीरंग।
मी तू पण गेले वाया।पाहता पंढरीच्या राया। नाही भेदाचे ते काम।
पळोनी गेले क्रोध काम।देही असोणी तो विदेही।
सदा समाधीस्त पाही।।पाहते पाहणे गेले दुरी।


म्हणे चोखाची महारी।।”उत्कट भावनेने भरलेला आणि पांडुरंग भक्तीने भारलेला सोयराने रचलेला अभंग ऐकल्यावर चोखा स्तिमित झाले.आपली बायको समंजस,हुशार,चतूर,शहाणी आहे हे त्यांना माहित होते.तिला सरस्वती चे वरदान आहे असा संकेत नामदेवांनी दिला होता.पण ती उत्कृष्ट अभंग रचना करुं शकेल हे माहीत नव्हते.आपल्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देणारी, घराण्याला वंशाचा दिवा देणारी,जीवा पाड प्रेम करणारी,आपल्या इतकीच पांडुरंगाची निरामय भक्ती अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्तही करुं शकते हे बघुन चोखोबा अचंभित झाले. आज बाळाचे बारसे होते.पंढरपूर च्या आसपासच्या परिसरांतील सगळा संत परिवार त्यांच्या घरी जेवायला येणार होते हे बारश्यापेक्षा जास्त अप्रुप होते. त्यांत ज्ञानेश्वर माऊलीही येण्याची वदंता होती.नामदेवांना खात्री होती की,गावां तील ब्राम्हणकुळातीलही कुणी येऊन त्यांच्या घरचे अन्न खाणार,जेवणार, स्पृश्य-अस्पृश्यतेचा,विटाळ चांडाळ कसलाही भेदभाव न मानतां,धर्माचा, चातुर्वर्णाचा आणि समाजाचा कायदा धाब्यावर बसवुन,परंपरेच्या रितीरिवाजा चे उल्लंघन करुन सामाजिक नैतिकतेची रुढी मोडुन हे  सगळं घडणार होते.

“न भूतो न भविष्यति” अशी चर्चा इतके दिवस अत्यंत नगण्य,क्षुद्र असणार्‍या चोखोबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार होते. त्यांतच एक अतर्क्य घटना गेल्या कित्येक दिवसांपासुन प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरांत घडत होती.विठ्ठलाचा परम भक्त सज्जन ब्राम्हण,विठ्ठल मंदिराचा खास पुजारी,त्याच्याकडे विठ्ठल मूर्तीला पंचामृ ताचा अभिषेक घालुन विठ्ठलाची षोडशो पचार पुजा करण्याचे काम गेली कित्येक वर्षे केशवभटांकडे होते.एका मोठ्या पात्रात तयार केलेले पंचामृत मंदिरांत येणार्‍या भक्तांना प्रसाद म्हणुन देण्याचा शिरस्ता होता.पण अलिकडे जे पंचामृत  गेले कित्येक वर्षापासुन मधुर लागत होते ते आतां कडू लागु लागले.असे काय घडले की,विठ्ठलाचे तीर्थ कडू बनावे?नक्कीच कांहीतरी पाप घडलं होतं किंवा गांवावर कांहीतरी मोठं संकट कोसळणा र होतं,त्यामुळे लोकं आधीच अस्वस्थ, भयग्रस्त होते,त्यातच ब्राम्हणकुळातील ज्ञानेश्वर,क्षुद्र जातीच्या चोखोबाकडे जेवणार,कदाचित याचमुळे देवाचा कोप होऊन तीर्थ कडू झालंं असावं असा तर्क वितर्क,कुतर्क सुरु होते.चोखोबाच्या घरचे बारसे आणि विठ्ठलाचे कडू होणारे तीर्थ याचा संबंध जोडुन घडणार्‍या गोष्टीचे खापर चोखोबाच्या डोक्यावर फुटणार होते.

अखेर बारश्याचा दिवस उजाडला. चोखोबाच्या घरी मोठी धांदल उडाली. भागीरथी,सून गंगा,निर्मळा,सोयरा सगळीजणं स्वयंपाकाच्या तयारीत गुंतली होती तर चोखोबा,सेना,नरहरी सोनार,गणाकाका,मुलगा लक्ष्मण यांच्या मदतीने संतमेळाच्या आगत स्वागताची तयारी करीत होते.अंणासकट सर्व घर दार सारवुन त्यावर शुभ चिन्ह असणारी हळद कुंकु चुण्याची बोटं भिंतीवर उमटवली होती.अवघा परिसर पताकांनी सुशोभित केला होता.बाळाला जरीची कुंची,काजळाची तीट लावुन सजवले होते.एवढ्यात संतमंडळी आल्याचा पुकारा झाला. पुढे गोरोबाकाका,त्यांच्या मागे साक्षात ज्ञानेश्वर माऊली सहस्र सूर्याचे तेज घेऊन अत्यंत शांत,स्निग्ध, नजरेने आसपासचा परिसर न्याहाळत  धिमी पावले टाकत येत असतांना चोखोबा त्यांना सामोरे गेले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *