सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

301-15
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ 301 ॥
आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनांत विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही. 1
302-15
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥ 302 ॥
रवि (मंथा) म्हणून योजलेला मंदारपर्वत काढल्यावर समुद्र जसा स्थिर झाला त्याप्रमाणे, सदैव शांत असल्यामुळे ज्याच्या चित्तात कामाची उर्मी उठत नाही. 2
303-15
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥ 303 ॥
षोडषकलापूर्ण चंद्र जसा कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो, तसा पूर्णस्वरूप ह्याला कसलीच अपेक्षा असणे शक्य नाही. 3
304-15
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥ 304 ॥
ह्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी तुला किती सांगाव्या? वायूपुढे जसे परमाणूचे नावही घेण्याची सोय नाही, तसे ह्याला विषयाचे नांवही आवडत नाही. 4
305-15
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥ 305 ॥
ह्याप्रमाणे जे किंवा ज्ञानाग्नीने शुद्ध झाले आहेत, ते, सुवर्णातिसुवर्ण मिळावें त्याप्रमाणे क्षेत्रं प्राप्त होतात. 5

306-15
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥ 306 ॥
तेथे म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मवस्तु तेथे प्राप्त होतात. (तदरूप होतात) 6
307-15
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥ 307 ॥
जे दृष्टीचा विषय होईल, किंवा जे जाणले जाईल, जे असे किंवा तसे आहे असे म्हणतां येईल, असे जें नाही (ते, ते पद होय.) 7
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पवकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥15. 6॥

308-15
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥ 308 ॥
दिव्याच्या भडक तेजांत किंवा चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते, इतकेच काय सांगावें? तर सूर्य ज्याचे प्रकाशन करितो. 8
309-15
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥ 309 ॥
हा सर्व दिसण्याचा व्यवहार, म्हणजे ज्याचे अदर्शन किंवा अज्ञान आहे; कारण, त्या वस्तूच्या अदर्शन स्थितीतच (अज्ञानांतच) विश्वाभास होत असतो. 9
310-15
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लोपतां सापें । फार होइजे ॥ 310 ॥
शिपीचा शिंपीपण जसा जसा नजरेआड होतो तसे तसे रुपे खरे वाटू लागते, किंवा दोरीचा दोरपणा लोपेल तोंवरच सापाची प्रतिष्ठा असणार. 310

311-15
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती ॥ 311 ॥
त्याचप्रमाणे, हे चंद्रसूर्यादि प्रकाशित थोर पदार्थ जिच्या अंधारांत म्हणजे (अज्ञानांत) प्रकाशित होतात.11
312-15
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ 312 ॥
ती वस्तु तेजोराशि (तेजाची खाण) खरी; ती सर्व भूतांचा आत्मा असून सर्वत्र सम आहे, आणि चंद्र- सुर्यांनाही तिचाच प्रकाश आहे.12
313-15
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ 313 ॥
(अशी वस्तुस्थिति आहे) म्हणून, वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य हे कवडशासारखे क्षुद्र होत; यास्तव तेजिष्ठ वस्तूंच्या ठिकाणचे तेज ती वस्तुप्रभा होय.13
314-15
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥ 314 ॥
सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे जशीं लोप पावतात, त्याप्रमाणे, जी आत्मवस्तु स्वप्रकाशत्वाने प्रकाशित झाली असतां (आत्मानुभवकाली) चंद्रसूर्यासह जगाचा लोप होतो, 14
315-15
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥ 315 ॥
किंवा जागृतींत स्वप्नांतील सर्व व्यवहार मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर ज्याप्रमाणे मृगजल आपोआप नाहीसे होते. 15

316-15
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥ 316 ॥
त्याप्रमाणे, ज्या वस्तूच्या ठिकाण अन्य कसलाही आभास नाहीं तें, अर्जुना, माझे मुख्यस्थान म्हणजे स्वरूप होय.16
317-15
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥ 317 ॥
महासागराला मिळून सागररूप झालेले ओढे जसे माघारे येणें संभवत नाही, त्याप्रमाणे त्या स्थानाला जे गेले त्यांची पुन्हां जन्माला येण्याची गोष्टच नको. 17
318-15
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥ 318 ॥
किंवा मिठाची केलेली हत्तीण लवण सागरांत सोडली असतां, जशी परत येणे शक्य नाहीं. 18
319-15
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥ 319 ॥
अथवा आकाशांत गेलेल्या अग्निज्वाला जशा परत फिरत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी परत पाणीरूपाने आढळणे शक्य नाही. 19
320-15
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥ 320 ॥
त्याप्रमाणे, यथार्थज्ञानाने जे माझ्याशी ऐक पावले म्हणजे मद्रूप झालेत्यांना पुन्हा मागे येण्याला रस्ता नाही. (पुनर्जन्म नाहीं) 320

321-15
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥ 321 ॥
(येथून 342 ओवी पर्यंतच्या ओव्या ह्या पुढील श्लोकाचे अवतरण जाणाव्या)
हे भाषण ऐकून सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो म्हणाला, हो हो ! मजवर आपला केवढा प्रसाद आहे म्हणून सांगावें ! पण, प्रभो, आणखी एक शंका येते, तिचे निरसन व्हावें अशी इच्छा आहे.21
322-15
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥ 322 ॥
ती अशी – जे आपल्याशी एकवट झाले, म्हणजे ऐक्य पावले म्हणून माघारे येत नाहीत, ते, प्रभो, आपल्याहूनमूळचे भिन्न आहेत की अभिन्न आहेत? 22
323-15
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ 323 ॥
जर ते अनादिसिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील तर माघरे येत नाहीत हें म्हणणे जुळत नाही; पहा कि मधु सेवनार्थं पुष्पांशी ऐक्य पावलेले भ्रमर काय पुष्परूपच होतात म्हणावयाचे? 23
324-15
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ 324 ॥
दुसरे असे की नेम मारावयाच्या वस्तुहून भिन्न असलेले बाण त्याला स्पर्शून जसे मागे खाली पडतात, तसे भिन्न असून आपल्याला मिळालेले परत आलेच पाहिजेत. 24
325-15
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं? ॥ 325 ॥
नाहीतर तुम्ही तेच ते अशी जर वस्तुस्थिति असेल, तर, कोणी कोणास मिळावयाचें? शस्त्र आपले आपल्यालाच कसें खोचणार? 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *