सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

176-13
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥176॥
देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो.
177-13
तें अनिरूप्य कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥177॥
(ज्ञान दाखवता येत नाही.लक्षणांवरून ओळखावे लागते.) ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल. त्याशिवाय डोळ्यांनी पहाता येईल असे ते ज्ञान नाही.
178-13
मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी । तैं इंद्रियांचिया व्यापारीं । डोळांहि दिसे ॥178॥
मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते.
179-13
पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान ॥179॥
वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात.
180-13
अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं । तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥180॥
अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमधे पाणी सापडते.(ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही)तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते.


181-13
कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥181॥
अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो.
182-13
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्ति । कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष ॥182॥
अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणार्‍या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो.
183-13
नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला । कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके ॥183॥
अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो
184-13
तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगों आतां अवधानें । चागें आइक ॥184॥
त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक.
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥13.7॥

अर्थ अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धि, स्थैर्य, अंत:करणनिग्रह –
185-13
तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे । संभावितपणाचें । वोझे जया ॥185॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे, त्याला आवडत नाही, आणि मोठेपणाचेही त्याला ओझे वाटते.


186-13
आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां । योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥186॥
त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर,
187-13
तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा । कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं ॥187॥
त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता, तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्‍यात सापडावा.
188-13
पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे । गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥188॥
अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही.
189-13
पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥189॥
आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये.
190-13
तेथ सत्काराची कें गोठी । कें आदरा देईल भेटी । मरणेंसीं साटी । नमस्कारितां ॥190॥
असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे? (म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल?) असा मनुष्य आदराला भेट कशी देईल? (म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते.


191-13
वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे । परी वेडिवेमाजीं दडे । महिमेभेणें ॥191॥
बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो.
192-13
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥192॥
आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो. व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो.
193-13
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । उगेपणीं चांगु । आथी भरु ॥193॥
लोकात होणार्‍या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगी राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो.
194-13
जगें अवज्ञाचि करावी । संबंधीं सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥194॥
लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये (आपल्या नादी लागू नये) अशा प्रकारची ज्याच्या जीवामधे फार इच्छा असते.
195-13
तळौटेपण बाणे । आंगीं हिणावो खेवणें । तें तेंचि करणें । बहुतकरुनी ॥195॥
ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी बहुतेक तो करतो.


196-13
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणेंभावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥196
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते.
197-13
पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥197॥
पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्‍यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते.
198-13
माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो । मज झणें वासिपो । भूतजात ॥198॥
माझ्या असतेपणाचा लोप व्हावा (म्हणजे मी एक अमुक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये). माझे नाव व रूप नाहीसे व्हावे (म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळयांसमोर येऊ नये), कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील तर तसे होऊ नये
199-13
ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये । नामेंचि जो जिये । विजनाचेनि ॥199॥
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो (म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो).
200-13
वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलणं आवडे । जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥200॥
वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो) व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *