ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.250

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५०

परियेसी गव्हारा सादर । कर्में निर्वंश झाले सगर । भिल्ले विंधिले शारंगधर । जाला पुरंदर सहस्त्रनयन ॥ कर्मे मन्मथ जालासे राख । कर्में चंद्रासी घडला दोष ।

कर्में भार वाहती कूर्मशेष । कर्में खरमुख ब्रह्मा देखा ॥ कर्में वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरीं कासोटा । कर्में शुकदेव गर्भी कष्टा । पाताळवाटा बळी गेला ॥

कर्मे दशरथ वियोगे मेला । कर्में श्रीराम वनवासा गेला । कर्में रावण क्षयो पावला । वियोग घडला सीता देवी ॥ कर्में दुर्योधनादि रणीं नासले । कर्मे पांडव महापंथे गेले ।

कर्मे सिंधुजळ शोषिलें । नहूष जाला सर्प देखा ॥ कर्मातें शंभु मानी आपण । किती पळसिल कर्माभेण । बापरखुमादेवीवरा विठ्ठल शरण । केली कर्मे निवारी नारायण ॥

अर्थ:-

हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल. कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. कर्मामुळेच भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला. कर्मामुळे इंद्रला गुरुपत्नीगमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले.

कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला, चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्माना पृथ्वीचा भार वाहवा लागला तसेच ब्रह्म्याला गाढवाचे मुख प्राप्त झाले. कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले, मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली,

शुकदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले. कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला, रामाला वनवासात जावे लागले, रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सितेला रामाचा वियोग प्राप्त झाला

. दुर्योधनप्रभुतीना रणात मरावे लागले, पांडवांना महापंथ चालावा लागला, अगस्तीला समुद्र प्यावा लागला व इंद्रपदावर पोहचलेल्या नहुशराजाला सर्प योनीत जावे लागले. त्या कर्माला महादेव भितात,

अशा त्या कर्मापासुन तु कुठे पळुन जाऊ शकतोस? या वर उपाय म्हणजे, माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *