संत चोखामेळा म. चरित्र ९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  ९.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

नामदेव म्हणाले,अहो चोखोबा!या चंद्रभागेच्या वाळवंटात विठुमाऊलीचा गजर दुमदुमत असतांना,या गजरांत देह भान हरपुन नाचणार्‍या वारकर्‍यात प्रत्यक्ष विठ्ठल असतांना,लाखो सजीव मूर्ती त्याच्या नामस्मरणांत तल्लीन होऊन नाचतांना आपणही त्यातली सजीव मूर्ती बनायचं सोडुन त्या काळ्या दगडाच्या निर्जिव मूर्तीचं काय दर्शन घ्यायच?तुम्ही कळसाला नमस्कार करतांना प्रत्यक्ष तुम्हाला पांडुरंग दिसत असतांना वेगळ दर्शन हवय कशाला?तुम्ही भागवत धर्माच्या झेंड्याखाली येताहात ना?मग ईश्वर हाच आत्मा,आत्मा हाच ईश्वर असं अद्वैत सांगणारं भागवत धर्माचं तत्व असतांना हे द्वैत कशापायी?देव भक्तीचा भूकेला,तो दर्शन घेणार्‍यांना तर पावतोच पण ज्यांच्या ह्रदयांत,मनांत आहे त्यांना जास्त पावतो.नामदेवांच्या समजावण्याने चोखोबांचे मन शांतावलं,आकाशासारखं निरभ्र झाल.

नामदेवांनी त्यांना थोपटल्यावर, त्यांच्या उबदार स्पर्शाने चोखा शांत होऊन मंगळवेढ्याला येण्याचे त्यांच्या कडुन वचन घेऊन नामदेवांचा निरोप घेतला.पंढरपूरला आलेले चोखोबा आणि परत जाण्यार्‍या चोखोबात प्रचंड फरक पडला होता.ह्या घटना आईवडीलांना सांगण्याच्या उत्सुकतेने आत्मविश्वासी वेगळाच चोखोबा मंगळवेढ्यास चालले होते.सर्वांगांनी बदलेले चोखोबा उन्मन्नी अवस्थेत,सदा हसरा चोखोबा कांहीसे गंभीर,विचारी,पोक्त,समंजस मंगळवेढ्या स पोहोचले.त्यांनी समग्र हकिकत आई वडीलांना सांगीतल्यावर ते मोठे झाल्याची जाणीव झाल्याने त्यांच्या लग्नाचे विचार मनांत आले.

चोखोबांचे लग्न!अनेक मुलींचा विचार करतां करतां शेजारच्या गावातील  यमाजीची मुलगी सोयरा काळीसावळी निटस बांध्याची,टपोर्‍या डोळ्याची सोयरा दोघांनाही पसंत पडल्यावर सावित्रीने ८-१० दिवसांनी चोखाजवळ विषय काढल्यावर कांहीसे लाजत म्हणाले,तुमच्या शब्दाबाहेर नाही.सुदामा ने मग वेळ न दवडतां,दोन मण लाकडं फोडुन देण्याच्या कबुलीवर बाळंभटा कडुन मुहुर्त काढुन घेतला.निर्मळाला भावाच्या लग्नावरुन त्याला चिडवु लागली.

चोखोबाचे लग्न ही विठोबाच्या दृष्टीनेही महत्वाची होती.कारण लग्ना नंतर चोखोबा स्थिरावणार होते.अधिक शांत,समंजसपणे भक्तीकडे वळणार होते  महान कार्य त्यांच्या हातुन घडणार होते. त्यासाठी लग्न होणे आवश्यक होते. साखरपुड्याचा समारंभ छान पार पडल्यावर,बाळंभटाने सांगीतल्यानुसार सव्वा महिन्यानंतर तिथी ठरली.साखर पुड्याचा कार्यक्रम आटोपुन ठरवलेल्या बैलगाडीत सारे परतत असतांना,वाटेत समोर भगवी कफणी घातलेला साधु उभा पाहुन सुदामाने बैलाचा कासरा ओढुन गाडी थांबवली.साधुला बघुन सारे खाली उतरुन त्या साधुच्या पाया पडलेत. चोखोबा नमस्कारासाठी वाकली असतां साधुने त्यांच्या खांद्याला धरुन उभे केले.

सगळी दचकली.साधूने स्पर्श केल्यामुळे! दचकलेल्या चोखोबांनी आपली जात,व वस्तुस्थिती सांगीतल्यावर,चेहर्‍यावर हास्य उमटवीत साधू म्हणाले,मी जाणतो तूं जातीने शुद्र असलास तरी एका महान विभूतीच्या सहवासाने तू कर्माने श्रेष्ठ ठरुन तुझ्या जातीत आजवर कुणी  केले नाही असे महान कार्य तुझ्या हातुन घडणार आहे.श्रेष्ठ भक्तांमधे तुझी गणना होणार,सरस्वतीचा पुत्र ठरणार आहेस. प्रत्यक्ष देवालाही तुझ्या संगतीचा मोह पडेल, साधुचे बोलणे ऐकुन चोखोबांचे डोळे पाणावले.सारेच अतर्क्य! साखरपुडा आटोपुन परततांना, साधुचे भेटणे शुभशकुनच वाटला.पुढे साधु म्हणाला,चोखोबा!तुला आणखी एक विलक्षण गोष्ट आज सांगतो,तूं तुझ्या कर्माने तर मोठा होशीलच,श्रेष्ठ भक्त ठरशील,पण या सर्वांवर तुझा विलक्षण मृत्यु मात करेल.तुझ्या मृत्युनंतर दिगंत कीर्ती पावशील,त्यावेळी तुझी खरी श्रेष्ठता लोकांना कळेल.भक्तीची पुण्याई, विचारांची खोली,शब्दांची समृध्दी यातुन तुझे आयुष्य फळेल,फुलेल हा माझा आशिर्वाद आहे असे म्हणुन तो साधु निघुन गेला.परत नमस्कार करायचे भान ही चोखोबाला राहिले नाही.सुदामा सावित्रीला आपला मुलगा भविष्यात घराण्याचे नांव उज्वल करेल ऐकुन अतिशय आनंद झाला.चोखोबा मात्र अंतर्बाह्य थरारुन गेले.साधुने उच्चारलेला शब्द न् शब्द त्यांच्या जाणीवेची कवाडे उघडुन गेले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *