संत ज्ञानेश्वर म. चरित्र १२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-१२.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

पैठणाला ज्ञानदेवांची झालेली किर्ती ऐकुन व त्यांच झालेल कौतुक पाहुन एक ब्राम्हण चांगदेवाला सांगण्यासाठी तापीतीरी जाऊन  पैठणला झालेल्या सर्व घटनांचा वृतांत कथन केला. एका बारा वर्षाचा मुलगा रेड्यामुखी वेद बोलवतो हे कांही चांगदेवांच्या शिष्यांना पटले नाही, हा ब्राम्हण कांहीतरी थापा मारतो असे वाटुन त्याला मारायला धावले.

चांगदेवांनी त्यांना निवारले, थांबवले आणि काय खरी हकीकत घडली ती सांगायला सांगीतले. ब्राम्हणाने सर्व हकीकत सांगीतल्यावर, बारा तेरा वर्षाचा अगदी लहान बालक असं अघटीत कार्य कसं काय करुं शकतो? याचा अचंबा वाटला, त्यांना  फार अस्वस्थ वाटलं! चांगदेव ताडकन उठले आणि समाधीस्थानी जाउन समाधी लावली. त्यांना दिसले की, चार ज्योती हळुहळु पुढे येताहेत, आणि आपला प्रकाश कमी होत आहे! बावरले, घाबरले ते. बाहेर येऊन शिष्याला कागद, बोरु, शाई आणायला सांगीतले.

काय लिहावे? मोठा पेच पडला त्यांना. चिरंजीव ज्ञानेश्वर लिहिले तर ज्ञानाच्या अधिकाराने मोठे! तिर्थरुप ज्ञानेश्वर कसे लिहावे?चांगदेवांना कांही सुचेना! एकही मायना मनास येईना! शेवटी त्यांना युक्ती सुचली. एक कोरा कागद दोन शिष्यांजवळ देऊन ब्राम्हणासहित आळंदीला रवाना केले.

चौघं भावंड पोहचण्याआधीच पैठणची किर्ती  आळंदीला पोहोचली. पैठण म्हणजे काशी! पैठणच्या धर्माधिकारी व ब्राम्हणांनी यांच्यापुढे लोटांगण घातल्याचे ऐकल्यावर आळंदीकरांना लाज वाटली. या भावंडांचा सत्कार व उदोउदो करण्यासाठी आळंदीकर त्यांची वाट पाहत होते, तोच ब्राम्हणासहित चांगदेवांचे दोन शिष्य पोहोचले. ज्ञानदेवाला चांगदेवाचे पत्र दिले.ज्ञानोबांनी पत्र पाहुन निवृत्तीनाथांना दिले. निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा या पत्राला उत्तर लिही.

आणि ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या वेदान्ताचा अर्क असलेल्या मराठी भाषेत लिहिलं, त्याचं नांव चांगदेव पासष्टी! शिष्यांनी ज्ञानोबांनी लिहुन दिलेलं उत्तर चांगदेवांना नेऊन दिलं ,

स्वास्ति श्री वटेशू। जो लपोनि जगदाभासु। दावी मग ग्रासु। प्रगटला करी। तया पुत्र तूं वटेश्वराचा। रवा जैसा कापुराचा! चांगदेव तुजमज आपणयाचा। बोलु लाख प्रयत्न करुन। खुप डोकं खर्च करुनही पत्राचा अर्थ कांही उमगेना, कांहीच लक्षात येईना!

शेवटी हातात नागाचा चाबुक घेऊन, वाघावर स्वार होऊन वाजत गाजत, बरोबर हजारों शिष्यांचा ताफा, डोक्यावर छत्रचामर असे लवाजम्यासहित गर्जत  चांगदेव आळंदी जवळ आले आलेत.  सकाळची वेळ! चौघ भावंड एका भिंतीवर कोवळी ऊन अंगावर घेत बसली होती. धापा टाकीत लोकांनी लोकांनी येऊन त्यांना सांगीतले की, जिवंत वाघावर बसुन , हाती नागाचा चाबुक घेऊन चांगदेव आपल्या भेटीस येत आहे. चौघही गदागदा हसलीत. मुक्ताबाई म्हणाली, एवढं वय झालं, म्हातारपण आलं, पण अहंकार कांही गेला नाही.

ज्ञानोबा म्हणाले, एवढ्या मोठ्या योग्याला सामोरं तर गेलंच पाहिजे ना! त्यांनी भिंतीला आज्ञा केली. अन् काय आश्चर्य! जड भिंत, निर्जिव भिंत! धावायला लागली. आळंदीकरांना तर  हे अलौकीक पाहुन थक्क झालेत. आणि चांगदेव! त्यांनी ते कौतुक पाहुन क्षणभर स्वतःलाच विसरले. केवढं हे अघटीत? जिवंत वाघाला नमवणं, जिवंत वाघाला खेळवणं हे कठीण असलं तरी एकवेळ प्रशिक्षणाने जमु शकेल,

पण दगडमातीची अचेतन, निर्जिव  भिंतीला ज्याने चालवायला लावले त्यांचा अधिकार केवढा मोठा? चांगदेवांचा सर्व अहंकार गळुन पडला. यांच्यापुढे आपण अगदीच शुद्र! चांगदेवाने पटकण वाघावरुन उडी टाकली व धांवत जाऊन ज्ञानदेवांचे पाय धरले. ज्ञानदेवांनी त्यांना उठवुन मुक्ताईला म्हणाले, मुक्ते! हा घे तुझा मुलगा! मुक्ताईने चांगदेवाला उपदेश केला. चांगदेव कृतार्थ झाले. एकनाथांनी म्हटलेच आहे……

चालविली जड भिंती। हरली चांगयाची भ्रांती। मोक्षमार्गाचा सांगाती। ज्ञानोबा माझा!!

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *