संत ज्ञानेश्वर म. चरित्र ७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-७.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

मुक्ता नदीवरुन आल्यावर कळले की, ज्ञानोबादादा दार घट्ट लावुन आंत स्वतःला कोंडुन घेतले. तीने मन घट्ट केले, ही आपली परिक्ष्राच आहे असं समजुन डोळे पुसले व गोड शब्दात दाराशी जाऊन म्हणु लागली…… हात आपुला आपणा लागे। त्याचा करुं नये खेद।। जीभ दातांनी चावली। कोणे बत्तीशी पाडली।। अरे! जग जर संतापाच्या आगीने पेटले, तर आपण पाण्याने विझवावे, लोकांनी केलेल्या शब्दांच्या तलवारीने चौफेर केलेल्या मार्‍याला उपदेश मानावा. कारण जग म्हणजे काय रे? ब्रम्हाच्या सुताने विणलेला कापड, ते ब्रम्ह आपलं रुप! मग कशाला रागावलास? उघड की रें दार!

योगी पावन मनाचा। साही अपराध जनांचा।। विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावे पाणी।। शब्दशस्रें झाले क्लेश। संती मानावा उपदेश।। विश्वपट ब्रम्हदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।। अरे दादा! साधुपण कां सोपं आहे? लोखंडाचे चणे खावे लागतात, तेव्हा कुठे ब्रम्हपद मिळते. अरे! तूं ज्ञानाचा देव! तूं कोपलास तर जगात सगळा अंधार होईल ना! तुझी लडीवाळ मुक्ता तुला हाक मारत्येय! मुक्तेसाठीही दार उघडणार नाहीस कां? हे सर्व ऐकतांना ज्ञानोबाचा राग दूर होत होता. मन निर्मळ होऊन आसवांच्या वाटे संताप वाहुन जात होता. ज्ञानोबा झडझडुन उठला , धावत त्यानं दार उघडुन बाहेर उभ्या असलेल्या निवृत्तीच्या पायावर कोसळला. नंतर मुक्तेला मिठीत घेऊन माझी मुक्ता! माझी मुक्ताई! डोळे पुशीत पुटपुटला.

गावातली सगळीच मंडळी काही दुष्ट नव्हती. कांही सुष्ट लोकांना या चार मुलांचा होत असलेला छळ सहन न होऊन दुःखी होत असत. शेवटी एकाने मोठी हिंमत करीत त्यांच्या कुटीकडे आला, त्यावेळी ज्ञानोबांनी रचलेला अभंग म्हणण्यात दंग होता. बाकी भावंड ऐकत होते. तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहुल लागली म्हणुन निवृत्तीने बाहेर येऊन पाहिले असतां त्यांना बाहेर एक गृहस्थ उभा दिसला. त्याला आंत बोलावले, तो गृहस्थ आंत आल्यावर म्हणाला, तुमचा होणारा छळ पाहवल्या जात नाही, म्हणुन मी तुम्हाला कांही सांगायला आलो.

तुम्ही गांवकर्‍यांसमोर उभे राहुन त्यांना म्हणावं, “आम्हाला प्रायश्चित देऊन पावन करुन घ्यावे”. सांगीतल्याप्रमाणे त्यांनी कबुल केले. गांवकर्‍यांची सभा सिध्देश्वराच्या समोर भरली. आणि त्यांच्या समोर उभी होती ही चार भावंड! निवृत्ती हात जोडुन म्हणाले, आपल्या आज्ञेनुसार आमच्या आई वडीलांनी प्रायश्चित घेऊन आम्हाला पोरके करुन गेलेत. आतां त्यांच्या ठायी तुम्हीच आहात. आम्हाला सरतं करुन घेण्यासाठी आम्ही काय करावं ते सांगावं!

आळंदीकर विचारमग्न होऊन विचार विनिमय करुं लागलेत. पोथ्या, ग्रंथ पाहिले, पण सन्यासांच्या मुंजी करायला कुठं कांही आधार सांपडेना! शेवटी सर्वानुमते दक्षिण काशी असलेल्या पैठण क्षेत्री या मुलांना पाठवायचं ठरविले. पैठणकरांनी जर यांना शुध्द करुन घेतले तर इथल्या धर्मधिकार्‍यांना कांहीच हरकत नसणार! आळंदीकरांनी विद्वतसभेसाठी पत्र देऊन मुलांना शुध्दीकरणाकरितां एकमताने पैठणला पाठवण्याचे निश्चीत केले. चौघही भावंड कुटीत परतलेत.

इंद्रायणीकाठी बसुन निवृत्ती ज्ञानदेवांची चर्चा करुं लागले. ज्ञानोबांनी आतां काय करायचे विचारल्यावर शांतपणे डोळे मिटुन निवृत्ती म्हणाले, पैठणच्या विद्वानांकडुन कोणता आणि कोठला निकाल आणायचा? आपली मुंज करतां येईल की नाही? ज्ञानोबा मुंज कोणाची करायची? कुणी करायची? आपण ना ब्राम्हण, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शुद्र! ज्ञानोबा  आपण देव, यक्ष, किन्नर, त्रृषी आणि निशाचरही नाही. आप ? तेज? वायु? आकाश? पृथ्वी? या पंचमहाभुत, यापैकी एकही नाही. सगुन होऊन प्रगटलो नाही की, निर्गुन होऊन प्रगटलो नाही.आम्ही अविनाशी ब्रम्ह! अव्यक्त चैतन्य! जे सगळ्यात भरुन आहे ते!

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *