घुबड लक्ष्मीचे वाहन कसे बनले ? शुभ कि अशुभ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌹 घुबड 🌹
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

घुबडाचे वेदकालीन नाव उलूक आहे. पुराणात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे.
हिंदू समाजात घुबड दिसणे किंवा त्याचे ओरडणे अशुभ मानतात.
अनर्थाचे पूर्व चिन्ह म्हणून त्याचा पुष्कळदा उल्लेख केलेला आढळतो.
घुबड हा सर्वांत बुद्धिमान निशाचर आहे.
घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच असते.


घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धन – संपत्तीचे प्रतिक मानले जाते.
खरे तर बहुतेक लोक याला घाबरतात.
या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते.
बहुतांश मान्यता अशी आहे की तो तांत्रिक विद्यांसाठी काम करतो.
घुबडाच्या बाबतीत देश विदेशात अनेक प्रकारच्या विचित्र धारणा पसरलेल्या आहेत.

अधिक संपन्न होण्यासाठी लोक दुर्मिळ प्रजातीच्या घुबडांची नखे, पंख इत्यादी घेऊन तांत्रिक कार्य करतात. काही लोक तर दिवाळीच्या रात्री याचा बळी देखील देतात. या सगळ्यामुळे या पक्षी प्रजातीवर मोठे संकट आले आहे. प्रत्यक्षात असे केल्याने उरली सुरली लक्ष्मी देखील निघून जाते आणि मनुष्य आधीपेक्षा जास्त संकटात अडकतो.


जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा हा जागा असतो. त्याला आपली मान १७० अंश फिरवता येते. रात्री उडताना याच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही आणि त्याच्या पापण्या कधीही मिटत नाहीत. घुबडाचे हु हु हु उच्चार करणे एक मंत्र आहे.
घुबडाची नजर अतिशय तीक्ष्ण असते. दुसरा गुण म्हणजे त्याचे नीरव उडणे, अजिबात आवाज न करता. तिसरा गुण म्हणजे शीतल ऋतूत देखील उडणे. चौथा त्याचा गुण आहे त्याची तीव्र श्रावण क्षमता. पाचवा गुण म्हणजे अति धीम्या गतीने उडता येणे. घुबडाचे हे गुण असे आहेत जे इतर कोणत्याही पक्षात नाहीत. त्याचे हे गुण पाहूनच आता वैज्ञानिक त्याच प्रकारची विमाने बनवण्याच्या मागे आहेत.


घुबड एक असा पक्षी आहे जो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. तो असताना शेतात उंदीर, साप, विंचू येऊ शकत नाहीत. त्याशिवाय लहान मोठ्या किड्यांना खाणारा हा पक्षी आहे. भारतात जवळ जवळ ६० प्रजाती आणि उप-प्रजातींचे घुबड आढळतात.


घुबड असा बनला लक्ष्मीचे वाहन
प्राणी जगताची संरचना केल्यानंतर एक दिवस सर्व देवी देवता पृथ्वीवर फिरण्यासाठी आले. जेव्हा पशु पक्षींनी त्यांना असे पृथ्वीवर पायी फिरताना पहिले तेव्हा त्यांना ते चांगले वाटले नाही आणि ते सर्व एकत्र होऊन त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले तुमच्या द्वारे उत्पन्न होऊन आम्ही धान्य झालो आहोत. तुम्हाला धरतीवर जिथे जायचे आहे तिथे आम्ही घेऊन जाऊ. कृपया तुम्ही आम्हाला आपल्या वाहनाच्या रुपात निवडून आम्हाला कृतार्थ करावे. देवी देवतांनी त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आपल्या वाहनाच्या रुपात निवडायला सुरुवात केली. जेव्हा लक्ष्मीची पाळी आली तेव्हा ती विचारात पडली की कोणत्या पशु अथवा पक्षाला आपले वाहन म्हणून निवडावे. त्याच दरम्यान पशु आणि पक्षांमध्ये देखील लक्ष्मीचे वाहन बनण्यासाठी चढाओढ लागली. इकडे लक्ष्मी विचार करत होती आणि तिथे पशु पक्षांमध्ये लढाई सुरु झाली.


यावर लक्ष्मीने त्यांना शांत केले आणि सांगितले की प्रत्येक कार्तिक अमावास्येला मी धरतीवर फिरण्यासाठी येते. त्या दिवशी मी तुमच्यापैकी एकाला माझे वाहन बनवेन. कार्तिक अमावास्येच्या दिवशी सर्व पशु पक्षी लक्ष्मीच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा लक्ष्मी पृथ्वीवर आली तेव्हा घुबडाने आपल्या तीक्ष्ण नजरेने तिला पहिले आणि तीव्र गतीने तो तिच्याजवळ पोचला आणि तिला प्रार्थना केली की तुम्ही मला तुमचे वाहन बनवा.


लक्ष्मीने चहुबाजूला पहिले तेव्हा तिला कोणताही पशु किंवा पक्षी दिसला नाही तेव्हा तिने घुबडाला आपले वाहन बनवले. तेव्हापासून घुबड लक्ष्मीचे वाहन आहे. तेव्हापासूनच लक्ष्मीला उलूक वाहिनी म्हटले जाते.
वास्तविक ते लक्ष्मीपेक्षा अलक्ष्मीचे वाहन म्हणणे जास्त सयुक्तिक ठरते. अलक्ष्मी अर्थात अयोग्य लक्ष्मी. अयोग्य मार्गाने आलेली लक्ष्मी.
अलक्ष्मी ही मागच्या दाराने येणारी आहे. ती अवकृपेचे लक्षण आहे. ती दारिद्य्र घेऊन येते. ती दुष्ट किंवा काळी शक्ती घेऊन येते. ती व्यक्तीची अवनती करते. ती घरावर अवकळा आणते म्हणूनच तिचे वाहन वर्णिले घुबड.


घुबड हा पक्षी आहे. तो उडत येणार. त्यावर बसून समजा लक्ष्मी आली, तर ती आपल्या घरी वरून, आकाशातून येणार. लक्ष्मीला आपल्या घरापर्यंत आणणारे ते घुबड उतरेल कुठे ? तर आपल्या घराच्या छतावर, घरावरच ना? लक्ष्मी तर घरात येईल, पण लक्ष्मीवाहन घुबड कुठे बसेल ? घरावर. आणि शास्त्राचा सिद्धान्त आहे-
‘ज्या घरावर घुबड बसते ते घर बसते.’
लक्ष्मी तर हवीच, पण घुबड तर नको. आता काय करायचे ? घुबडाशिवाय लक्ष्मी कशी आणायची ? कशी आणायची पेक्षा ती तशीच का आणायची ? तर घुबडाचे गुण किंवा अवगुण पाहायला हवेत.


घुबड हा निशाचर पक्षी आहे. त्याला ‘दिवाभीत’ म्हणतात. अर्थात, तो प्रकाशाला घाबरतो. रात्रीच्या अंधारातच उडतो. वेगळ्या शब्दांत लपतछपत, सगळ्यांच्या नजरा चुकवत, सगळे निद्रिस्त असताना घुबड उडते. अर्थात, त्यावर बसून येणारी लक्ष्मीही तशीच असणार ना ?
रात्री घुबड उडते ते भक्ष्य टिपण्यासाठी. घुबड हा मांसाहारी पक्षी आहे. अर्थात, त्याच्या प्रत्येक उडण्यात कुणाचा तरी अंडेरूपी वंश नष्ट होणार किंवा पिलूरूपातील असाहाय्याचा लचका तोडला जाणार, हे निश्चित! अशा वृत्तीच्या वाहनावर बसून येणारी ‘लक्ष्मी’ तशीच असणार ना ? मग अशा संपत्तीला लक्ष्मी कशी म्हणाल ? अत: ती ‘अलक्ष्मी.’ अपमार्गाने, इतरांना दु:ख देत आलेली संपत्ती. ती घुबडवाहिनी असते.


अशा घुबडाला टाळायचे कसे ? तर त्यासाठी देवतांची एक खास रचना पाहा. लक्ष्मीचे वाहन घुबड, विष्णूचे वाहन गरुड. पण, दोघांचे एकत्रित रीत्या घुबडावर चित्र कधी पाहिले का ? पार्वतीचे वाहन सिंह, शंकराचे वाहन नंदी. पण, दोघे मिळून सिंहावर बसून आले असे वर्णन तरी वाचले का ? नाही ना ? दोघे मिळून नंदीवर बसून येतात. तसेच लक्ष्मी नारायण हे दोघे मिळून गरुडावर बसून येतात.


नेमका हाच मुद्दा चिंतनीय आहे. दोघांना मिळून बोलवा. मग ते गरुडावर येतात. लक्ष्मी तर येते, पण घुबड तर नसते. अर्थात, लक्ष्मी जेव्हा लक्ष्मीपतीसह येते तेव्हा ती अलक्ष्मी नसतेच. लक्ष्मी भगवंतासह हवी. ईश्वरी अधिष्ठानासह यावी. दैवी गुणांनी यावी. दैवी मार्गाने यावी. मग ती घुबडावर येत नाही, अलक्ष्मी ठरत नाही.

पौराणिक पक्षी

पौराणिक पक्षी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *