संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण ३ भाग १, २, ३, ४, ५

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*🍃प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,🍃* *☘️भाग-१. तिर्थभ्रमण☘️*

          एकदा ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांच्या भेटीला आले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माऊलीच्या पायावर . डोके ठेवले परस्पर आलिंगन दिले. ज्ञानेश्वर माऊली त्यांना म्हणाले “नामदेव महाराज आपण तर भक्त शिरोमणी आहात. तुम्ही तर खूप पुण्य जोडले. नेहमी केशवचरणासी आहात. प्रेम, सुख, भक्ती तुम्हालाच मिळाली. धन्य धन्य तुमचे पूर्वज आणि तुमचा जन्म धन्य आहे. तुम्ही सर्व वासनांना जिंकले. संसारमाया तोडली. हृदयी विठ्ठलाला बसवले. विठ्ठला व्यतिरिक्त काहीच तुम्हाला दिसत नाही. पत्नी, मुले, घरदार सर्वांविषयी अनासक्त आहात. असे जरी असले तरी जीवनन्मुक्त, ज्ञानी आहात तरी पृथ्वीतलावरील तिर्थस्थळासी भेट द्यावी. तीर्थ यात्रा करावी. आम्हीही तुमच्यासोबत येतो. जेणेकरून तुमची संगत आम्हाला मिळेल. आमचे जीवनाचे सार्थक होईल. आम्ही कृतार्थ होऊ. एवढी आमची इच्छा पूर्ण करा.”

      नामदेव महाराज मनोमन विचार करायला लागल,’आता काय उत्तर देऊ ? मनातच विठोबाचे चरणाचे स्मरण केले. पांडुरंगा तुझ्या चरणीच माझे सर्व सुख आहे. सर्व तीर्थ तुझ्याठायी आहेत. तुला सोडून मी इतरत्र कसा जाऊ ? रंक होऊन तुझ्या व्दारी व्दारपालाचे काम करीन. याच सुखासाठी शरीर वेचले. मायाजाळ तोडले, त्रिभुवनाचे वैभव दुर सारले. पंढरीचा भिकारी झालो. तुझा सहवास म्हणजे कल्पतरूची छाया व कामधेनुचे दुध आहे. तुझ्या पायापाशी मला काहीच कमी नाही”.

       नामदेव महाराज भानावर येऊन ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले, “तुम्ही विठ्ठलाला विचारा, ह्यांची आज्ञा असेल तर मी तुमच्यासोबत तीर्थयात्रेला येतो”. ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांची प्रेमाने स्तुती केली, आणि म्हणाले, “महाराज आपण दोघे आताच जाऊ. पांडुरंगाची आज्ञा घेऊ”. लगोलग, पांडुरंगाजवळ देवळात आले. ज्ञानेश्वर माऊलींनी आपले मनोगत प्रगट केले. पांडुरंग परमात्मा हसले. त्यांचे नामदेव महाराज व निवृत्तीनाथादी संत मंडळीवर निरतिशय प्रेम होते. ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले, “ज्ञानदेवा तुम्ही तर केवळ चिद्रूप ज्ञानशील आहात. स्फटीकासारखे अंतर्बाह्य निर्मळ आहात मग तुम्ही तीर्थयात्रा कशासाठी करता ?” यावर ज्ञानेश्वर माऊली उत्तरले, “पांडुरंगा स्वामी, तुम्ही हे बरे सांगीतले. परंतु आम्हाला वाटते या देहाचे सार्थक व्हावे. नामदेव महाराजांच्या संगतीचे सुख घ्यावे ” ज्ञानेश्वर माऊनींनी विठोबांना नमस्कार केला. पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांकडे पाहून हसले म्हणाले, “नामदेवा तुझे भाग्य केवढे प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वर माऊली तुमचा सहवास मिळावा यासाठी उत्सुक आहेत. ते तुमचा किती आदर करतात, या भाग्यासाठीच खरेतर विष्णुदासाने जन्मास यावे. सुखरूपी जा आणि लवकर या मात्र आमचा विसर पडू देऊ नका. माझ्यावर लोभ असू द्यावा “. पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले, “ज्ञानदेवा तुम्ही तर सर्वज्ञ, सुखमुर्तीच आहात. माझी एक विनंती आहे. तुम्ही नामदेवाचा सांभाळ करा, प्रवासात त्याची काळजी घ्या. त्यांच्या तहानभुकेची काळजी तुम्हीच करावी नामदेव मला फार प्रिय आहे बरे. एक क्षण नामदेवाचा दुरावा मला अप्रिय वाटतो”. असे म्हणून नामदेव महाराजांचा हात ज्ञानेश्वर माऊलींच्या हाती दिला. देवाच्या चरणावर मस्तक ठेवून दोघेही निघाले. भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन नदीपार आले.

#क्रमश…..
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*🍃प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,🍃* *🦞भाग-२ नामदेवांची भक्ति🦞*

           असे बोलत बोलत दोघे सर्व संता सहित काशीव्दार आले. प्रत्यक्ष विश्वनाथ शंकर विश्वेश्वर वेशीजवळ त्यांनी सामोरे आले. भेट झाली. परस्पर आलिंगन दिले, नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांना व काशीनाथांना नमस्कार केला. ज्ञानेश्वर माऊलींचा हात धरून विश्वनाथ गंगेत उतरले. नदीरूपी गंगादेवींनी माऊलीपायी मीठी घातली. *’नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सार्वाठायी ।।’* काही दिवस काशी क्षेत्रात राहील्यानंतर प्रश्चिम प्रभास व्दारका इत्यादी तिर्थांना भेटी संतमेळा परतीच्या प्रवासास निघाला. राजस्थानात (मारवाड) बिकानेरजवळ वालुकामय प्रदेशात आले. तेथे तहानेने व्याकुळ झाले. तेव्हा त्यांना एक विहीर दिसली. पाणी खूप खोल होते. ज्ञानेश्वर माउलींनी लघिमा सिद्धी वापरून आतमध्ये जाऊन पाणी प्राशन केले. नामदेव महाराजांनी आपले नेत्र झाकून पांडुरंगाचे ध्यान केले. विठ्ठलाला समजले.

*’तंव गडगडीत कुप उदके ओसंडीला ।*
*प्रलयांती खवळला सिंधू जैसा ।।’*


ती विहीर तुडूंब वाहू लागली. नामदेव महाराजांनी पाणी प्राशन करून तृषा भागवली. सद्भक्तांच्या कार्यासाठी देव धावून येतो.
      ज्ञानेश्वर माऊलींनी हे कौतुक आपल्या डोळ्यांनी पाहिले. ते नामदेव महाराजांना म्हणाले, “नामदेवा, तुम्ही धन्य आहात. तुमचे कुळ धन्य झाले. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला तुमच्या सहवासाची ओढ लागली. म्हणून ते तुमच्यासोबतच असतात. गाय वनात चरायला जाते परंतु तिचे लक्ष घरच्या वासरा वरच असते. वासराला पाहून गाईला जसा आनंद होतो. तसाच पांडुरंगाला पण तुमच्या भेटीने आनंद होतो. तुम्हाला तीर्थयात्रा करायचे काहीच काम नाही. तुमचे बोलणे ऐकून श्रुतिस्मृति पुराणे वेडे झाले. योग्याचे ध्यान्यांचे विसर्जन झाले. तुमचे प्रेम सोडावे मग कोठे जावे ? व तेथे काय पहावे ? समाधी, लय लक्ष आणि वैराग्य आमच्याजवळ आणुन ठेवले. ऋषी, गण, गंधर्व, ब्रह्मादिक सर्व ज्या अरूपाचे ध्यान करतात, ठाव घेण्याचा प्रयत्न करतात तो पांडुरंग परमात्मा आमच्यासमोर मुर्तीमंत उभा केला”. असे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांना चरणस्पर्श केला. सर्व संत एकमेकांची योग्यता ओळखून होते. हेच यांना प्रसंगावरून दिसून येते.    

#क्रमश…..
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*☘️प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,☘️* *🍃भाग-३ पंढरपुर महात्म्य🍃*

          हा तीर्थयात्रेचा सुखसोहळा करून संतमेळा पंढरीत परत आला. नामदेव महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. “डोळ्यावाटे अश्रुंचा पूर चालला होता. सद्गदित होऊन विठ्ठलाला म्हणाले, विठूराया, मी तुला पहायला बाहेर गेलो, दारोदारी भटकलो. परंतु थकलो, शीन आला. तुझ्याशिवाय मला करमत नाही. अज्ञानी होतो म्हणून फिरलो. जगाच्या पाठीवर कोठेही पंढरीसारखे सुख नाही. तीर्थ उदंड आहे परंतु मला मात्र ओढ चंद्रभागेचीच आहे. माझे डोळे दुसऱ्या कुणा देवाला पाहू शकत नाही. माझे हात दुसऱ्या देवापुढे जोडल्या जात नाहीत. तुझ्याशिवाय माझे पाय, मन दुसरीकडे वळत नाहीत. ज्या गांवी वैष्णवांचा मेळा, गरूडटके, पताका, कुंचे नही त्याला देव म्हणतांना संकोच वाटतो. विटेवर समचरण कोठेच दिसले नाही म्हणुन मला खंत वाटली. त्यावेळी मी तुझ्या चरणाचे स्मरण केले. हे देवा, तुम्हीच माझे माय-बाप, बंधू, कुलदेवता आहात. माझ्यावर कृपादृष्टी ठेवा”, असे म्हणून विठ्ठलाच्या चरणावर लोटांगण घातले.

       निवृत्तीनाथ, सोपानदेव, नरहरि सोनार, विसोबा खेचर, ज्ञानेश्वर माऊली, आदि संतानी नामदेव महाराजांना आलिंगन दिले.रूक्मिणीदेवींनी दोघा भक्तांना ओवाळीले.

        विठ्ठल परमात्मा नामदेव महाराजांना म्हणाले, ‘नामदेवा तू धन्य आहेस. तीर्थयात्रा करून तुम्ही तुमचे आत्महितच केले. सर्व पुण्य पावन तीर्थे पाहिली आणि सर्व वासनाचे प्रक्षालन केले. शोक, मोह, दुःखाचे निवारण केले. जन्माचे सार्थक केले. आता तीर्थयात्रेचे मावंदे करावे. पंढरपूर साक्षात भुवैकुंठ आहे. येथे अन्नदान केल्यास मोठे पुण्य लाभते. म्हणुन तुम्ही षड्रसांनी युक्त अन्नदान करावे. ब्राह्मण बोलावून त्यांना षड्र स अन्नाचे निमंत्रणा भोजन द्यावे”.


       ह्यावर रूक्मिणीदेवी म्हणाल्या, “देवा नामदेवाचा प्रपंच तुम्हीच चालवता. तुम्ही नामदेवा सोबत निमंत्रण द्यायला जा”. मग प्रत्यक्ष देव, नामदेवाचा हात धरून अक्षता द्यायला निघाले. सोबतीला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, जनमित्र सोपान, सावला, जाल्हण, चोखामेळा, बंका आदि संत होते. सनकादीक ऋषीही होते.

       ते ब्राह्मण विठोबांना म्हणायला लागले की “आजपर्यंत आम्ही तुम्हाला पंढरपूरी पाहीले नाही. आपले नाव काय ? तेव्हा विठ्ठलांनी त्यांना सांगीले, माझे नाव विठ्ठल अनंत असून मी नामदेवाचा मित्र आहे. माझे वसतीस्थान देवळात आहे” एवढी खूण सांगूनही त्यांनी ओळखले नाही.

#क्रमश…..
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*☘️प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,☘️**🍃भाग-४ मावंदे🍃*

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

         सर्व अष्टमहासिध्द महाद्वारी सेवेस उभ्या होत्या. त्यांनी सर्व पाकसिद्धी केली. सडासंमार्जन केले. गुढीया, तोरणे लावून देऊळ श्रृंगारले. दारात रांगोळी काढून दिवे लावले. आपापसात म्हणू लागल्या, नामदेवांनी विठ्ठलदेवाला आपल्या भक्तीने वेडे केले. नामदेवाला मंगलस्नान घालून आपल्या हातांनी देवांनी अंगवस्त्रे दिली. सत्यभामा, राही, रूक्मिणी देवींनी पंचारतीने ओवाळीले. सर्व ब्राह्मण भोजनास बसले. निवृत्तीनाथादी संत नामदेवा सोबत बसले. प्रत्यक्ष विठ्ठलाने नामदेवाला घास भरवले. मुखशुद्धी , विडे दिले अशाप्रकारे हा अदभुत मावंदे सोहळा अत्यंत आनंदात पार पडला.

        परंतु यामध्ये एक विचित्र घटना घडली देवाने नामदेव महाराजांचे उच्छिष्ट अन्न मोठ्या प्रेमाने भक्षण केले. तेव्हा उपस्थित लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. ते आपापसात कुजबूज करू लागले, “कोण आहे हे ? खूप सुलक्षणी दिसतात. आता तुम्ही या कृत्याचे गुह्य आम्हाला सांगा. तुम्ही तर धर्म बुडवला. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य क्षुद्र यांच्यापेक्षाही वेगळा वर्ण दिसतो. आता यालाच वाळीत टाकावे. चला आपण सर्व येथून जाऊ. स्नान त्रिपदा जप करून परिमार्जन करू ? असे म्हणून लोक जायला निघाले तेव्हा देवाने त्यांना थांबण्याची विनंती केली. विठ्ठल परमात्मा म्हणाले, “तुम्ही भुदेव आहात माझे ऐका. नामदेव मला खूप प्रिय आहे. तो माझा मित्र आहे. माझा अखंड वास त्याच्या हृदयात आहे, त्याने सर्व विकारांना जिंकले आहे. व्रत, तप, दान ह्या तर कर्मक्रिया आहेत. परंतु एक भुतदया ज्याच्या ठिकाणी आहे तोच माझा भक्त व ज्ञानी आहे.धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्यालाच साधला. चारी मुक्ती त्यांच्या दासी आहेत. त्याने हृदयात मलाच साठवले म्हणून त्याच्या उच्छिष्टाचा मी अधिकारी आहे. सर्व तीर्थासी तारक हे पंढरपूर आहे. याला उपमा नाही. ही नगरी म्हणजे प्रेमाचे भांडारच आहे. येथे जीवन्मुक्त, ज्ञानी पुंडलिक मुनीचा वास आहे. अमृत संजीवनी, पुण्यराशी, पुण्य पावन दक्षिणवाहीनी भीमा नदी येथे आहे. प्रत्यक्ष चंद्रभागा नदी येथे आहे. हिच्या फक्त दर्शनानेच प्राण्यांचे गर्भवासाचा फेरा बंद होतो. स्वर्गीय नदी मंदाकीनी हिला पाहून लाजली. भोगावतीने तर पाताळीच प्रवेश केला. गंगा नदीने भीतीने सहस्त्र भागात विभागून सागरात प्रवेश केला. मुख्य आरोग्याची, भक्तजन भाग्याची, वैराग्याची जन्मभूमी म्हणजे ही पंढरी आहे”.

#क्रमश…..
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*🍃प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,🍃* *☘️भाग-५ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म☘️*

      विठ्ठल परमात्मा आणखी त्या लोकांना सांगतात, ‘तुम्ही मन, चित्त, मलिन करू नये. सर्व जातीधर्माचे भक्त मला प्रिय आहे. उच्च नीच असा भेदभाव माझ्या जवळ नाही. तुम्ही चित्त शुद्ध करा. त्यासाठी पाच प्रकारचे स्नान करावे लागते. पहिले स्नान म्हणजे वाग्रस्नान आहे. नेहमी सत्य बोलणे. कुठलाही स्वार्थ न करता सत्य, मधूर वचन बोलावे. दुसरे स्नान म्हणजे सदा सर्वकाळ अंतर्बाह्य शुद्ध असणे होय. तिसरे स्नान म्हणजे सर्व इंद्रियाचा निग्रह, आत्मसंयम, वासनेला लगाम. चौथे स्नान म्हणजे सर्वाभुती करूणा, दया, माया असणे, पाचवे स्नान म्हणजे शरीरशुद्धी. असे स्नान मनुष्य करीत असेल तर त्याचे दर्शनाने आणखी दुसरे अनुष्ठान करावे लागणार नाही. मनामध्ये विवेक, वैराग्य धरून संताच्या संगती रहावे. जो नेहमी रामकृष्ण हरि मंत्राचा जप करतो. शांति, क्षमा, दया, निजबोध वृत्ती अखंड ज्याच्या जवळ खेळतात. काम, क्रोध, दंभ, लोभ, मत्सर, मद हे दोष ज्याच्यावळ नाहीत तो मला प्रिय आहे. ह्या सर्वगुणांनी संपूर्ण भक्तशिरोमणी नामदेव आहे. म्हणून मी त्याचा ऋणी आहे. म्हणून त्याचे उच्छिष्ट मी भक्षण केले. तो मला प्राणाहून प्रिय आहे.”

      देव मंदिरात निघून गेले. ते विचार करू लागले, मी यांना संतसंगतीचा महिमा माझ्या निजरूप दर्शनानेच पटवून द्यावा म्हणून देवाने पुन्हा भोजनाची निमंत्रणे पाठवली सर्व संत बोलावले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, विसोबा खेचर, सावता माळी, नरहरि सोनार, बंका, गोरा कुंभार, चोखामेळा आदि संत पंगती बसल्या तेव्हा त्या लोकांचा भ्रम देवाने दुर केला. शंख, चक्र, गदा, पद्मधारी रूप त्याना दाखवले. ते लोक लज्जित झाले. त्यांनी क्षमायाचना केली. ते म्हणू लागले, “देवा आम्ही मुढमती अज्ञानी आहोत. यापुढे मात्र आम्ही भेदभाव करणार नाही. आम्हाला सर्वत्र फक्त ईश्वरच दिसत आहे. खरे तर या जगात ईश्वराशिवाय दुसरे काहीच नाही”, ईश्वराचे दर्शन केवळ संतामुळेच झाले. हे त्यांना समजले. त्यांनी सर्व संताना साष्टांग दंडवत घातला स्वत:चा धिक्कार केला.              

      तिथे या सर्व पुण्यपावन संताच्या संगतीत नामदेवांचे किर्तन झाले. देव प्रत्यक्ष तेथे उभे होते. सर्व संत नाचू लागले. देवसुध्दा नाचू लागला.

*”नामदेव कीर्तन की पुटे देव नाचे पांडूरंग ।*
*जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग |*
*अभंग बोलता रंग कीर्तनी भरला ।*
*प्रेमाचेनी छंदे विठ्ठल नाचू लागला।।*


नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला. संतांनी त्यांना सावध केले. कलियुगामाजी ईश्वरप्राप्तीचे सर्वश्रेष्ट साधन म्हणजे किर्तन होय. सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामजप होय. ज्ञानेश्वर माऊलींनी लाह्यांचा प्रसाद वाटला. असा आनदी आनंद चंद्रभागेच्या वाळवंटात झाला.

#क्रमश….
#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading