सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी २०१ ते २१० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

201-7
तेविंचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । किजो देवा ॥201॥
त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यांत जो वेळ चालला आहे, तोही मला सहन होत नाही. म्हणून, देवा लवकर सांगा
202-7
ऐसा मागील पडताळा घेऊनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविंचि माजीं शिरऊनि । आर्ती आपुली ॥202 ॥
याप्रमाणे, मागील प्रत्यंतर घेऊन, पुढल्या अभिप्रायावर दृष्टि ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले.
203-7
कैसी पुसती पाहें पां जाणीव । भिडेची तरी लंघों नेदी शीव । ये-हवीं कृष्णहृदयासी खेंव । देवों सरला ॥203 ॥
अर्जुनाची प्रश्न करण्याची काय शैली आहे पहा! की मर्यादेचे उल्लंघन न करिता श्रीकृष्णाच्या ह्रदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला!
204-7
अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥204 ।
अहो, श्रीगुरूंना ज्या वेळेस पुसावयाचे, त्या वेळेस अशाच मर्यादेने पुसावे लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सव्यसाची अर्जुनच जाणतो.
205-7
आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ हरीचें बोलणें । हें संजयो आवडलेपणें । सांगेल कैंसें ॥205 ।
आता त्यांचे ते प्रश्न करणे, आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरिचे उत्तर देणे, हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा.


206-7
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मऱ्हाटी । जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाये ॥206॥
जी गोष्ट नीट मराठी भाषेत सांगितली जाईल, तिच्याकडे नीट लक्ष द्या. असे की, ज्या योगानें कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल,
207-7
बुद्धिचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा । अक्षरांचियाचि भांबा । इंद्रियें जिती ॥207॥
बुद्धिरूप जिभेने त्या शब्दांचा रस न चाखतां अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तगतील.
208-7
पाहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परी वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥208॥
पहा की,मालती पुष्पाच्या कळ्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल, परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणानें डोळ्यांना सुख होणार नाही कां?
209-7
तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवां । लेसा जाईजे ॥209॥
त्याचप्रमाणे, मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील, व मग त्वरीत सिद्धांताच्या गांवाला जातील.
210-7
ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥210॥
अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते, ते ऐका, असे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात.
।। इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां विज्ञानयोगोनाम सप्तमोऽध्यायः ।।7।।
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 30 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 210 ॥——संपुर्ण—–

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *