संत ज्ञानेश्वर म. चरित्र १३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-१

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

ज्ञानेश्वरांनी ठरविले की, या सर्व भक्तांना कुठ तरी एकत्रीत करुन त्यांना कांही तरी नेम नियम लावणे आवश्यक आहे, त्याशिवाय हे सर्व मोकाट सुटतील, कांहीच धरबंध राहणार नाही. त्यांना आठवलं पंढरीचा पांडुरंग! लहानपणी वडीलांसोबत पाहिलेलं देखणं रुप, गोपाळाचा वेश, हरी आणि हरविष्णू आणि शंकर, दोन्ही देव एकाच ठीकाणी! विष्णुने शंकराला मस्तकावर धारण केललं! अशी दोघांची एकता.

जणूं ब्रम्हच वाट चुकुन पंढरीला आले. पुंडलिकाने विटेवर उभं करुन ठेवलं!पांडुरंगाची ज्ञानोबाला आठवण झाली. आणि त्यांना ब्रम्हानंद झाला. अभंगात ते म्हणतात….माझीया जीवाची आवडी। पंढरपुरा नेइन गुढी।। गोविंदाचे गुणी बोधिलें। पांडुरंग मन रंगलें।। पंढरपुरला गुढी नेऊन तिथल्या वाळवंटात नाचाव! तो पंढरीचा निळा! लावण्याचा पुतळा, त्या विठ्ठलाच्या गुणांनी त्यांना वेड लागलं होतं. ते इतके उताविळ झाले की, क्षणाचाही विलंब न लावतां केव्हा पंढरपुरला जाऊन माझ्या माहेरला कडकडुन भेटेन? कधी अलिंगण देईन? आणि सगळा संसार सुखमय करुन टाकीन एवढे आतुर झाले होते.

ज्ञानोबा सोबत सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव आणि भक्तांचा मेळावा कार्तिक एकादशीसाठी पंढरपुरला निघालेत. त्यावेळी पंढरपुरला संत नामदेवाचा मोठा महिमा, पाटीलकी होती. पांडुरंगाचा मोठा लाडका भक्त! एकटा नामदेवच नाही तर त्याची दासी जनाबाई जी आपल्याबरोबर देवाला दळण, कांडण करविणारी! नामदेवाने ज्ञानदेवाची व ज्ञानदेवाने नामदेवाची किर्ती ऐकली होती, त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटायला मोठे आतुर, उत्सुक झाले होते.

चंद्रभागेच्या वाळवंटात या संताची  गाठ पडली. ज्ञानानं भक्तीला भेटावं, योगानं प्रेमाला अलिंगन द्यावं, तसं नामदेव व ज्ञानोबांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारली. आणि काय आनंद वर्णावा! भजन, कीर्तनाची धुमाळी सुरु झाली, भक्तीरसाची गंगा दुथडी वाहायला लागली. अपुर्व प्रेमाचा पुरच आला तिथं! कधी नामदेवाने अभंग किर्तन करावे, तर कधी ज्ञानोबांनी! हा सर्व सोहळा जनाबाई स्वतः अनुभवत होती. तिने तिथली गंमत लिहुन ठेवली.

चंद्रभागेच्या वाळवंटांत भक्तांचा अफाट मेळावा गोळा झालेला, नामदेव काल्याचे किर्तन करीत आहे आणि ज्ञानदेव स्वतः भक्त गोपाळांना लाह्या वाटताहेत. जनाईच्या आग्रहास्तव ज्ञानदेव अभंग गाताहेत, गोड गळा, अपुर्व रंग, मिटलेल्या कमळासारख्या मोठ्या डोळ्यातुन मोत्याच्या धारा वाहताहेत……

जीवाचिया जीवा। प्रेमभावाचिया भावा।तुजवाचोनि केशवा। अनु नावडे।।

अन् किर्तनात असा कांही रंग भरला की, स्वतः परमात्मा किर्तनात उभा राहुन नाचायला लागला….

एकचि टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी।ज्ञानराजा माझा गोपाळांसी लाह्या वाटी।। नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग।। अभंग बोलतां रंग किर्तनी भरिला। प्रेमाचिया छंदे विठ्ठल नाचु लागला।।

ज्ञानोबांनी पंढरीच्या सगळ्या संताना वेड केले, मोहवुन टाकले. नामदेवाला विसोबा खेचरकडुन गुरुपोदेश घ्यायला लावुन कृतार्थ केले. जनाबाईला आईचे सुख मिळाले नसल्यामुळे ज्ञानोबाचे दर्शन झाल्यावर त्यांच्या रुपाने तीला आई लाभल्याचा आनंद झाला. ती म्हणाली, आई तूं माझी आंधळ्याची काठी, कुण्या सिध्देश्वरात अडकुन राहालास रे! मी तुझी अपंग पाडस! तुझी माझी चुकामुक झाली, डोळ्यांत प्राण आणुन वाट पाहत होती. तीने एवढा आकांत केला की, या जन्मी मरुन जावं आणी ज्ञानाचा सागर ज्ञानाईच्या पोटी जन्म घ्यावा.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *