सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

226-16
तृणाचेनि इंधनें । आगी धांवे गगनें । थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधु ॥ 226 ॥
गवताच्या मोळीचा जाळ जसा तात्काळ आकाशांत उंचवर जातो, किंवा डबक्यांतील माशाला जसा सागर तुच्छ वाटतो. 26
227-16
तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें । एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ॥ 227 ॥
एखादे दिवशीं मिळणाऱ्या परान्नावर जसें दारिद्रयाने मातावे त्याप्रमाणे, स्त्री, धन, विद्या, स्तुति, मान वगैरे क्षणिक अनुकूल गोष्टींनीं जो उन्मत्त होतो. 27
228-16
अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडें मूर्ख ॥ 228 ॥
अभ्रांच्या छायेच्या प्राप्तीवर विश्वासून निदैव्याने आपले घर मोडावें, किंवा, मृगजलाची नदी पाहून मुर्खाने आपले जलसंचय फोडावे. 28
229-16
किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं ॥ 229 ॥
किंबहुना, संपत्तीच्या वगैरे योगाने अशा प्रकारें डोळ्यांवर जो धूर चढतो तो दर्प म्हणावा, हे वचन मुळींच अन्यथा नव्हे. 29
230-16
आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु । जगीं एक तेजसु । सूर्युचि हा ॥ 230 ॥
आणि सर्व लोकांचा वेदांच्या ठिकाणीं विश्वास असून ते ईश्वर हीच जगांत पूज्य वस्तु आहे,असे विश्वासाने मानितात, व जगांत सर्वांत तेजिष्ठ व्यक्ते एक सूर्यच होय. 230

231-16
जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणें निर्विवाद । जगा पढियें ॥ 231 ॥
जगांतील लोकांच्या इच्छेची सीमा म्हणजे एक सार्वभौम, (पृथ्वीची मालकी) पद हीच होय; तसेच केव्हांही मरण येऊ नये हीच सर्वांची नित्य इच्छा असते. 31
232-16
म्हणौनि जग उत्साहें । यातें वानूं जाये । कीं तें आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे ॥ 232 ॥
वगैरे कारणांस्तव वेदाची व ईश्वराची थोरवी कोणी वर्णन करू गेल्यास ज्याच्या चित्तांत मत्सर उत्पन्न होऊन जो स्वतःबद्दलच्या प्रतिष्ठेच्या बुद्धीने फुगतो. 32
233-16
म्हणे ईश्वरातें खायें । तया वेदा विष सूयें । गौरवामाजीं त्राये । भंगीत असे ॥ 233 ॥
आणि म्हणतो-ईश्वर वगैरे आम्ही गिळून बसलों आहों,वेद वगैरे आम्हीं मारून टाकले आहेत, व श्रेष्ठांतील श्रेष्ठ रक्षण करणाराचाही आम्ही पराभव करू.33
234-16
पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेनें आपांपती । वैरी केला ॥ 234 ॥
पतंग ज्याप्रमाणे दीपज्योतीचा द्वेष करितो, काजवा जसा सूर्यप्रकाशाचा तिटकारा करितो, किंवा टिटवीने जसा समुद्राशीं वैरभाव जोडावा. 34
235-16
तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे । बापातें म्हणे मज हे । सवती जाली ॥ 235 ॥
त्याप्रमाणे अभिमानाच्या भरी भरून ज्याला ईश्वराचे नांव घेतलेलेही (सामर्थ्यवान् म्हणून) सहन होत नाही किंवा जो स्वत:च्या पित्यालाही हा जेथे तेथे एक सवतीप्रमाणे प्रतिबंधच आहे असे मानितो. 35

236-16
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥ 236 ॥
असा फाजील मानाच्या भावनेने खुंटयाप्रमाणे ताठ झालेला व अभिमानाने कोणासही न लेखणारा जो, तो खरोखर नरक प्राप्तीचा सीधा रस्ताच होय. 36
237-16
आणि पुढिलांचें सुख । देखणियाचें होय मिख । चढे क्रोधाग्नीचें विख । मनोवृत्ती ॥ 237 ॥
आणि दुसरा सुखी आहे असे पहातांच ज्याचे मन क्रोधाग्निविषाने संतप्त होतें. 37
238-16
शीतळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा ॥ 238 ॥
उकळणारे तेलांत थंड पाणी टाकले असतां जसा भडका उडतो किंवा चंद्रोदय पाहून कोल्हा जसा मनांत तडफडतो. 38
239-16
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥ 239 ॥
ज्याच्या उदयानं सर्वं विश्वाचे व्यापार सुरू होतात,तो प्रातःकाळ येतांच पापी घुबडाचे जसे डोळे फुटतात ! (त्यास दिसेनासें होतें ) 39
240-16
जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट । दुधाचें काळकूट । होय व्याळीं ॥ 240 ॥
रात्रीच्या विश्रांतीनंतर पहांटेचा काळ साऱ्या जगास सुखकर वाटतो खरा; पण तोच चोरांना प्राणसंकटाचा वाटतो किंवा, दुधा सारखा पवित्र व मिष्ट पदार्थही सापास पाजिला असतां जसें विष बनते. 240

241-16
अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ॥ 241 ॥
अगाध अशा सागराच्या पोटांतही वडवानल अधिकच भडकतो व त्याला जशी कधी शांति लाभत नाही. 41
242-16
तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें । तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥ 242 ॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या, विनोद, ऐश्वर्य व सौभाग्य जों जों दृष्टीस पडेल तों तो ज्याचा राग वाढतो तो “क्रोध” होय असे समज. 42
243-16
आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणें ते वृष्टी । इंगळांची ॥ 243 ॥
ज्याचे मन म्हणजे जणु सर्पाचे वसतिस्थान होय, ज्याची दृष्टि बाणाग्रांसारखी तीक्ष्ण (असहिष्णु) व ज्याचे भाषण जणु अग्निवर्षाव होय. 43
244-16
येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत । ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ॥ 244 ॥
ज्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवताप्रमाणे कांपणाऱ्या, असे ज्याचे अंतर्बाह्य व्यापार दुसऱ्याला झोंबणारे असतात. 44
245-16
तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण । आतां आइक खूण । अज्ञानाची ॥ 245 ॥
तो पारुष्याची (काठिण्य) मूर्ती असून मनुष्यांतील अधम मनुष्य होय असे जाण. आतां अज्ञानाची लक्षणे सांगतों, ती श्रवण कर. 45

246-16
तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा । कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥ 246 ॥
तरी शीत किंवा उष्ण स्पर्शाची दगडाला जशी भिन्नत्वातें जाण नसते किंवा रात्र आणि दिवस हा भेद जात्यंधाला जसा ज्ञात नसतो. 46
247-16
आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । कां परिसा पाडु नेणें । सोनया लोहा ॥ 247 ॥
अग्नि भडकल्यावर त्याला जसा भक्ष्य काय किंवा अभक्ष्य काय हा विचार नसतो किंवा सोने व लोखंड हा भेद जसा परिसाला माहित नसतो. (भेद पहाण्यासाठी स्पर्श होतांच लोह लोहत्वाला मुकते म्हणून). 47
248-16
नातरी नानारसीं । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखों नेणें ॥ 248 ॥
किंवा अनेक प्रकारच्या रसांत प्रवेशूनही पळी जशी त्यांतील एकाहि रसाची चव जाणत नाही. 48
249-16
कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखीं । तैसे कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें ॥ 249 ॥
किंवा वाऱ्याला वाहतांना मार्गाच्या योग्यायोग्यतेची जशी परीक्षा नसते, तसें कर्तव्य काय की अकर्तव्य काय इत्यादि विवेक ज्याला कधीही शिवत नाही असा अंध असतो. 49
250-16
हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ । देखे तें केवळ । मुखींचि घाली ॥ 250 ॥
हें चांगलं, हे घाणेरडे वगैरे कांहीही न जाणतां बालक जसे हाताला लागेल तें तोंडांत घालते. 250

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *