संत एकनाथ महाराज हरिपाठ संपूर्ण वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


हरिचिया दासा हरी दाही दिशा ।
भावे जैसा तैसा हरी एक ॥१॥
हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ.२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥
हरिरुप झालें जाणणे हरपले ।
नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं ।
एका जनार्दनी हरी बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला ।
व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥
नको नको मान नको अभिमान ।
सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥२॥
सुखी जेणे व्हावे जग निववावे ।
अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तीबळें ।
जगाचिया मेळे न दिसती ॥४॥
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी ।
एका जनार्दनी ओळखिले ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


ओळखिला हरि धन्य तो संसारी ।
मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहीत ॥१॥
सिध्दी लावी पिसे कोण तया पुसे ।
नेले राजहंसे पाणी कायी ॥२॥
काय ते करावे संदेही निर्गुण ।
ज्ञानाने सगुण ओस केले ॥३॥
केले कर्म झाले तेचि भोगा आले । |
उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एकाजनार्दनी नाही यातायाती ।
सुखाची विश्रांति हरीसंगे ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥



जें जें दृष्टीं दिसे ते ते हरिरुप ।
पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव ।
तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत ।
अनंतासी अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य‍ अंती अवघा हरि एक ।
एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव शिव दोन्ही ।
एका जनार्दनी ऐसे केले ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


नामाविण मुख सर्पाचे ते बीळ ।
जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचें जिणे ।
यातना भोगणे यमपुरी ॥२॥
हरीवीण कोणी नाही सोडविता ।
पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥३॥
अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती ।
साधुचे संगती हरि जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही ।
एका जनार्दनी पाठ केली ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


धन्य माय व्याली सुकृताचे फळ ।
फळ ते निर्फळ हरीवीण ॥१॥
वेदाचेंही बीज हरि हरि अक्षरें ।
पवित्र सोपारे हेचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम धर्म दान ।
नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचे सार नाम मुखी गाता ।
हरी हरी म्हणता कार्यसिद्धी ॥४॥
नित्यमुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी ।
एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


बहुता सुकृती नरदेह लाधला ।
भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥
बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म ।
न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनेक जन्मांचे सुकृत पदरीं ।
त्याचे मुखी हरी पैठा होय ॥३॥
राव रंक हो का उंच नीच याती ।
भक्तिवीण माती मुखी त्याच्या ॥४॥
एका जनार्दनी हरी हरी म्हणता ।
मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


हरिनामामृत सेवी सावकाश ।
मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्यनामघोष जयाचे मंदिरी ।
तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणशी तीर्थक्षेत्रा नाश आहे ।
अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजी कोटि वेळां सृष्टी ॥
होती जाती दृष्टी पाहे तोचि ॥४॥
एकाजनार्दनी ऐसे किती झाले ।
हरिनाम सेविलें तोचि धन्य ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


भक्तिवीण पशू कशासी वाढला ।
सटवीनें नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशी ।
हरी नये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता ।
काय उत्तर देता होशील तू ॥३॥
अनेक यातना यम करवील ।
कोण सोडवील तेथे तुजला ॥४॥
एका जनार्दनी सांगताहे तोंडे ।
आहा वाचा रडे बोलताचि ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

॥ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ॥

१०
स्वहिता कारणें संगती साधूची ।
भावे भक्ति हरीची भेटी तेणे ॥१॥
हरी तेथे संत संत तेथे हरी ।
ऐसे वेदचारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ नाकळे ।
तेथे हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष ।
वेदें नाही ऐसे सांगितले ॥४॥
वेदाचींही बीजाक्षरे हरि अक्षरे दोन्ही ।
एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।
आनंद पदीं जया म्हणती हरि ॥१॥
सत्पद निर्गुण चित्प‍द सगुण ।
सगुण निर्गुण हरि पायी ॥२॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तू‍वरी ।
गीतेमाजी हरि बोलियेलें ॥३॥
हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी ।
अभिमानियांसी गर्भवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐंशी पदे तिन्ही ।
एका जनार्दनी तेचि झाले ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१२
नाकळे ते कळे कळे ते नाकळे ।
वळे तें नावळे गुरुवीण ॥१॥
निर्गुणी पावलो सगुणी भजतां ।
विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
बहुरुपी धरी संन्याशाचा वेष ।
पाहून तयास धन देती ॥३॥
संन्याशाला दिले नाही बहुरुप्याला ।
सगुणी भजला तेथें पावे ॥४॥
अद्वेताचा खेळ दिसे गुणागुणीं ।
एका जनार्दनी ओळखिले ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१३
ओळखिला हरि साठविला पोटी ।
होता त्याची भेटी दु:ख कैचे ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी ।
मुखी गाता हरी पवित्र तो ॥२॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय ।
हरि मुखे गाय नित्य नेमें ॥३॥
कामक्रोध लोभ जयाचे अंतरी ।
नाही अधिकारी ऐसा येथे ॥४॥
वैष्णवांचे गुह्य काढीले निवडूनी ।
एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१४
हरि बोला देतां हरि बोला घेतां ।
हसतां खेळतां हरि बोला ॥१॥
हरि बोला गातां हरि बोला खातां ।
सर्वकार्य करितां हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती ।
देहत्यागाअंती हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडता हरि बोला कांडता ।
उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनी हरि बोला विजनी ।
एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१५
एक तीन पांच मेळा पंचविसांचा ।
छत्तीस तत्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या येणे झाला जीव ।
मायोपाधि शिव बोलिलेति ॥२॥
जीव शीव दोन्ही हरीरुपी तरंग ।
सिंधु तो अभंग नेणे हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे ।
रज्जूंवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानी ।
एका जनार्दनी हरी बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१६
कल्पने पासूनी कल्पिला जो ठेवा ।
तेणे पडे गोवा नेणे हरी ॥१॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची ।
इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावे ते जवळी हरिचे चरण ।
सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी ।
घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनी सांपडली खूण ।
कल्पना अभिमान हरी झाला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१७
काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे ।
वांझेसी डोहळे कैंचे होती ॥१॥
अंधापुढे दीप खरासी चंदन ।
सर्पा दुग्धपान करुं नये ॥२॥
क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैंचा ।
व्यर्थ आपुली वाचा शिणऊं नये ॥३॥
खळाची संगती उपयोगासी नये ।
आपणा अपाय त्याचे संगें ॥४॥
वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळुनी ।
एका जनार्दनी तेचि भले ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥


सर्व संतांचे हरिपाठ गुरूपरंपरा आरत्या
॥ जय जय विठोबा रखुमाई ॥

१८
न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।
मंडूकी वटवट तैसे तें गा ॥१॥
प्रेमावीण भजन नाकावीण मोती ।
अर्थावीण पोथी वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाहीं ठाव म्हणे मी अहेव ।
भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापावीण भाव कैसा राहे ।
अनुभवें पाहे शोधुनिया ॥४॥
पाहतां पाहणे गेले ते शोधूनि ।
एका जनार्दनी अनुभविलें ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

१९
परिमळ गेलिया वोस फूल देठीं ।
आयुष्या शेवटी देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे ।
अजूनि किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊनि सावध ।
काहीतरी बोध करी मना ॥३॥
एक तास उरला खट्वांगरायासी ।
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरी तयाला साधनीं ।
एकाजनार्दनी हरी बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२०
करारे बापांनो साधन हरीचे ।
झणी करणीचे करुं नका ॥१॥
जेणें नये जन्म यमाची यातना ।
ऐसिया साधना करा कांही ॥२॥
साधनाचे सार मंत्र बीज हरी ।
आत्मतत्व धरी तोचि एक ॥३॥
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम ।
एक हरिनाम जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनी न घ्यावा संशय ।
निश्चयेंसी होय हरीरुप ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२१
बारा सोळा जणी हरीसी नेणती ।
म्हणोनि फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला ।
हर्ष जया झाला तेणे मुखें ॥२॥
वेद जाणू गेला पुढें मौनावला ।
तें गुह्य तुजला प्राप्त कैंचे ॥३॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा ।
दास सदृगुरुचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणी ।
एका जनार्दनी हरी बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२२
पिंडी देहस्थिति ब्रह्मांडी पसारा ।
हरिवीण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥
शुक याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी ।
हरीसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
यारे यारे धरुं हरिनाम तारुं ।
भवाचा सागरु भय नाही ॥३॥
साधुसंत गेले आनंदी राहिले ।
हरिनामें झालें कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनी मांडिले दुकान ।
देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२३
आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करुं कोणत्या गोष्टीचा ।
पति लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसे नाही ॥३॥
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे ।
कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२४
दुर्बळाची कन्या समर्थानें केली ।
अवदशा निमाली दरिद्र्याची ॥१॥
हरिकृपा होता भक्ता निघती दोंदे ।
नाचती स्वानंदे हरिरंगी । १२ ॥
देव भक्त दोन्ही एकरुप झाले ।
मुळीचे संचलें जैसे तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती ।
ओवाळीतां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पचि मुराला ।
तोचि हरी झाला ब्रह्मरुप ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

२५
मुद्रा ती पांचवी लाऊनियां लक्ष ।
तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे ॥१॥
कानीं जे पेरिलें डोळां ते उगवलें ।
व्या‍पक भरिलें तोचि हरी ॥२॥
कर्म उपासना ज्ञान मार्गी झालें ।
हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय ।
हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणे येथुनि ।
एका जनार्दनी हरी बोला ॥५॥

हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृपद॥

॥ भानुदास एकनाथ ॥ भानुदास एकनाथ ॥
संत एकनाथ महाराज हरीपाठ समाप्त

संत एकनाथ महाराज संपूर्ण

वारकरी नित्यनेम

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *