संत ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
हरिपाठाचे नियम

* हरिपाठाचे नियम *

हरिपाठाचे नियम *
1. आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.
2. विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.
3. स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)
4. शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा वारकरी पोशाख असावा.
5. चाली वारकरीच म्हणाव्या. (फिल्मी संगीताच्या) चाली विणेकऱ्याने स्वतः म्हणू नाही, व ईतर भजन्यांना म्हणू देऊ नाही.
6. हरिपाठ हा वैयक्तिक, आणि सामुहिक, म्हणता येतो.
7. हरिपाठ हा खाली बसून, उभ्याने, चालताना, पाउल्या खेळत, घरात, अंगणात, रस्त्यात, मंदिरात, दिंडीत चालतांना, ईतर काम करतांना सुद्धा म्हणता येतो.
8. हरिपाठात पाउल्या खेळतांना स्त्री, पुरुष यांनी सोबत न खेळता पुरुषांनी पुरुषाबरोबर आणि स्त्रियांनी स्त्रिया बरोबर खेळाव्यात.
9. हरिपाठात ईतर भजने, भावगीते, कविता, म्हणू नाही.
10. स्त्रिया आपला नित्यनेमाचा हरिपाठ मासिक पाळीच्या काळात सुद्धा (ग्रंथाला हात न लावता) स्वतः किंवा मागे मागे म्हणू शकतात.
11. हरिपाठात कुणाच्याही तोंडात पान, मावा, गुटखा, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट, नसावे, (तशी जाहीर सुचना हरिपाठ सुरु होण्यापूर्वीच विणेकऱ्याने द्यावी.)
12. हरिपाठ ज्या देवतेच्या मंदिरात/समोर असेल तर त्या देवतेची शेवटी आरती म्हणावयास हरकत नाही. आणि स्थानिक देवतेचा गजर सुद्धा करता येतो.
13. प्रत्येक अभंगाचे शेवटी धृपद (दुसरे चरण) म्हणावे, तशी प्रथा आहे.

गजर

बोला… पुंडलिक वरदे हरी वि..ठ्ठ…ल…..
           पंढरीनाथ भगवान कि जय..!
             श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
                 ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
                    जगद्गुरू तुका…राम महाराज कि जय..!
                       “शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय”

गजर झाल्यावर पुढीलप्रमाणे …….

जय जय राम कृष्ण हरी
भजन कसे म्हणावे.ऐका :>
कसे म्हणावे व्हिडिओ पहा व शिका :येथे क्लिक करा.

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥धृपद॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥
धृपद ॥

(विठोबा रखुमाई भजन म्हणावे.) 
(सर्व अभंगाच्या शेवटी असलेले चरण हे धृपद आहे, ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे.)

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसीहार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर हेची ध्यान ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥ 



देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।
दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥


चहूं वेदीं जाण साहि शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरी आत्मा जीवशिवसमा ।
वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविणे मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।
जेथोनि चराचर हरिसी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




भावेंविण भक्ति भक्तिविंण मुक्ति ।
बळेविण शक्ति बोलू नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित  ।
उगा राहे निवांत शिणसी वांया ॥२॥
सायास करिशी प्रपंच दिननिशीं |
हरिसी न भजसी कवण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥  

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




योगयागविधि येणे नोहे सिद्धि ।
वांयाची उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविणें अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेविंण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरणोपाय ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।
ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखें आला भाग्यें विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद




पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा गोपाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पूर्ण एक नांदे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रह्लादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैंचें कीर्तन घडेल नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान  ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




*रामकृष्ण हरी*
भजन म्हणावे लागते
कसे म्हणावे, व्हिडिओ पाहून शिका.



त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरिवीण धावया नपवे कोणी ॥२॥
पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक |
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



११
हरि उच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामें केलें जपता हरी ॥२॥
हरि उच्चारण मन्त्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणें तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥


१२
तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धि ।
वायाचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येऱ्हवी नाकळे।
करतळी अवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमीवरि ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१३
समाधि हरीची समसुखेविण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशीराजे सकळसिद्धि ॥२॥
ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधि ।
जंव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवा रम्य रमले समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी । १
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप जळती पुढे ॥२॥
हरि हरि हरि मन्त्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१५
एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेता समान श्रीहरी ।
शमदमा वैरी हरी झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहादेही एक ।
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१६
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्णनामी उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्णी ठसा ।
तेणे दशदिशा आत्माराम ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१७
हरिपाठकीर्ति मुखी जरी गाय
हरिपाठ कीर्ति मुखी जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझ्या हाती ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणें काही ॥१॥
त्या नरा लाधले वैकुण्ठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो येथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



विठोबा रखुमाई
चे भजन म्हणावे लागते,
चाल कशी म्हणावी,
पाऊली कशी खेळावी,
यासाठी व्हिडिओ पहा आणि शिका.
जय जय विठोबा रखुमाई त्या साठी
येथे क्लिक करा.



विठोबा रखुमाई
चे भजन म्हणावे लागते,
चाल कशी म्हणावी,
पाऊली कशी खेळावी,
यासाठी व्हिडिओ पहा आणि शिका.
जय जय विठोबा रखुमाई त्या साठी
येथे क्लिक करा.

१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोडी (कोटी) गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योगयागक्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविणे नेम नाही दुजा ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



२०
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जपा ॥१॥
जप तप कर्म हरिवीण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवा मन्त्र हरिनामाचे शस्त्र ।
यमें कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




२१
काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाहे उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिह्वा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कोण वाणी ॥३॥
ज्ञानदेवी सांग झाला नामपाठ ।
पूर्वजां वैकुण्ठ मार्ग सोपा ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥




२२
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि ।
भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥२॥
हरिविणे जन्म नरकचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसि चाड ।
गगनाहुनि वाड नाम असे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

२३
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्वी कळा दावी हरि ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लगती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटीं राम भावशुद्ध ॥१॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुळ शीळ मात ।
भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुण्ठ भुवनी घर केलें ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



२५
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीव जंतूसी केवीं कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुण्ठ केले असे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



२६
एक तत्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्व नाही रे अन्यथा ।
वायां आणिक पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरूनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥



विणेकऱ्याणे खालील सुचना (मोठ्याने द्यावी)

२७
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इन्द्रिया सवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥


वारकरी सांप्रदायिक पद्धतीनुसार विणेकऱ्याणे खाली बसलेल्या सर्वाना ही चाल म्हणेपर्यंत उठून उभे राहण्यास सांगावे.
शक्यतो पायात बूट/चप्पल, तोंडात बिडी, सिगारेट, तंबाखू, पान, गुटखा, मावा, खर्रा, इत्यादीचा त्याग करण्याची स्पष्ट पण आदरपूर्वक (द्वेषपुर्वक नको) सुचना पुन्हा द्यावी.
चाल म्हणण्यासाठी १ व्यक्ती गुणवान असावा (बाहेरून आमंत्रित) जोडीदार स्थानिक (शक्यतो त्याच गावातील) कारण या कृतीने वारकरी सांप्रदायिक सद्भावना वाढते, आणि गुणवानाच्या संगतीने गुणवान तयार होतो. (दररोजच्या हरीपाठासाठी)

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥


ही चालीसाठी व्हिडिओ पहा. येथे क्लिक करा.

पुंडलिक वरदे गजर सामुहिक करावा.

नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।
जळतील पापें जन्मांतरीची॥1॥
न लगे सायास जावें वनांतरा ।
सुखें येतो घरा नारायण ॥धृपद॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥2॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ॥3॥
याविण असता आणीक साधन ।
वाहातसें आण विठोबाची ॥4॥
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि ।
शाहाणा तो धणी घेतो येथें ॥5॥ 

देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ॥
पुण्याची गणना कोण करी ॥२॥धृपद॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ॥
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे ॥
द्वारकेचा राणे पांडवां घरी ॥४॥

चाली साठी व्हिडिओ पहा :
येथे क्लिक करा.

॥इति श्री ज्ञानदेव महाराज कृत हरिपाठ समाप्त॥


सर्व संतांचे हरिपाठ व गुरुपरंपरा अभंग

वारकरी सांप्रदायिक नित्यनेम

दैनिक नित्यनेम

हरिपाठ :- संत ज्ञानेश्वर महाराज
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

    • नमस्कार मराठी या हिंदी भाषा कां उपयोग करे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *