गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ

गुरुपरंपरेचे अभंग सूची
  1. सद्गुरूराये कृपामज केली
  2. माझिये मनींचा जाणोनियां भाव
  3. घालुनियां भार राहिलों निश्चितीं
  4. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
  5. आदिनाथ उमा बीज प्रगटले
  6. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
  7. अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां
  8. अवघाची संसार सुखाचा करीन.

सुचना:
या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे गडद-जाड (बोल्ड) रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे. 

सत्य गुरुराये कृपा मज केली ।
परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।
मस्तकीं तो जाणा ठेविला कर॥ध्रु॥

भोजना मागती तूप पावशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांहीं कळे उपजला अंतराय ।
म्हणोनियां काय त्वरा जाली ॥३॥
राघव चैतन्य कैशव चैतन्य ।
सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुलें सांगितलें नाम ।
मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥


माझिये मनींचा जाणोनियां भाव ।
तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणें गुंफ़ा कांहीं कोठें ॥ध्रु.॥

जाती पुढें एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेटे ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू ।
कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥


घालुनियां भार राहिलों निश्चितीं ।
निरविलें संतीं विठोबासि ॥१॥
लावूनियां हात कुरवाळिला माथा ।
सांगितली चिंता न करावी ॥ध्रुपद॥

कटीं कर समचरण साजिरे ।
राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥
खुंटले सायास आणिक या जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आतां तें करीं अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥ 


माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।
आपणचि देव होय गुरू ॥1॥
पढियें देहभाव पुरवी वासना ।
अंतीं तें आपणा पाशीं न्यावें ॥धृ.॥

मागें पुढें उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवाराया ॥2॥
योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी ।
वाट दावी करीं धरूनियां ॥3॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं ।
पाहावें पुराणीं विचारूनी ॥4॥


आदिनाथ उमा बीज प्रगटले ।
मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ।।१।।
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ।।२।।

वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ।
ठेवा जो लाधला शांतीसुख ।।3।।
निर्व्दंव्द नि:शंक विचरता मही ।
सुखानंद हृदयी स्थिरावला ।।४।।
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख ।
देऊनी सम्यक अनन्यता ।।५।।
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्ण नामे ।।६।।


आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।१।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।

गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजाविले ।।3।।


अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां ।
चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥

एका जनार्दनीं एकपणें उभा ।
चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥


अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।3।।
बापरखुमादेवीवरू विठ्ठालाची भेटी ।
आपुल्या संवसाठी करुनी ठेला ।।४।।


आमचे सर्व ग्रंथ डाऊनलोड करा.
येथे क्लिक करा


श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा |
इतरांचा लेखा कोण करी ||१||
राजयाची कांता काय भीक मागे |

मनाचिया जोगे सिध्दी पावे ||२||
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला |
काय ऊणे त्याला सांगा जोजी ||३||
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |
आता उद्धरलो गुरुकृपे ||४||

गुरुपरंपरेचे अभंग समाप्त

ज्ञानराज ..माउली.. तुकाराम
कसे म्हणावे: व्हिडिओ पहा.

सर्व संतांचे हरिपाठ व गुरुपरंपरा अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *