सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी १२६ ते १५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

126-10
पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥126॥
तसेच गुरुशिष्याच्या एकांतात, ज्या एका अविनाशी वस्तुविषयींच्या रहस्याची चर्चा होते, ती चर्चा ते भक्त मेघगर्जनेप्रमाणे त्रैलोक्यांत गर्जून सांगतात.
127-10
जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें । दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥127॥
ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलून विकसित झाली असतां, आपल्या ठिकाणचा सुवास ती गुप्त ठेउं शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत ती आपल्या सुवासाचे भोजन घालते.
128-10
तैसेंचि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥128॥
त्याप्रमाणेच ते ज्ञानीभक्त, सर्व विश्वांत मोकळ्या मनाने, माझ्या गुणादि वर्णनाचे द्वारा, माझ्या सगुण स्वरूपाचे जगांत निरूपण करतात. निरूपण करतां करतां प्रेम दाटून येऊन, ते निरूपण करणेंहि विसरतात व त्यांत जीवभाव व शरीरभावही विसरतात.
129-10
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥129॥
अशा निःसीम प्रेमामुळे त्यांना रात्र व दिवस यांचाही विसर पडतो व असे ते आपणच आपले ठिकाणी संपूर्ण सुखरूप होऊन राहतात.
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते॥10.10॥

130-10
तयां मग जें आम्ही कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥130॥
मग जी कांही स्थिती, अर्जुना ! आम्ही त्यांना प्राप्त करून द्यायची, ती मुळांत असलेली निःसीम स्थिती त्यांनीच प्राप्त करून घेतली असते, पहा.

131-10
कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥131॥
कारण थोर योध्द्या अर्जुना ! ते ज्या मार्गाने जायला निघाले, त्या मार्गाची सुखरूपता पाहिली असतां स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा ठरतात.
132-10
म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणियें ॥132॥
म्हणून भक्तांनी जे प्रेम धरलें, तें आमचें देणें होय असे प्रसिध्द झालें, पण प्रेम आम्ही द्यायचे असतें, हेहि त्यांनीच रूढ केलें, असे म्हणावे लागतें.
133-10
आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें । आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ॥133॥
आतां यानंतर एवढे व्हावे की, ज्यांचे माझे ठिकाणी असलेलें प्रेम निःसीम वाढेल आणि कालांतरानेहि तें प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते.
134-10
लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्‍नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥134॥
अर्जुना ! अत्यंत लाडक्या मुलाला, आई आपल्या प्रेमळ दृष्टीची खोळ करून, मूल खेळत असतां जशी ती त्याच्या पाठीमागें धावत असते,
135-10
तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जा.यें ॥135॥
व तें लाडके मूल जो जो खेळ बोटाने दाखवून मागेल, तो तो खेळ ती तान्हुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते, त्याप्रमाणे मीहि आपल्या भक्ताच्या भक्तिप्रेमाच्या निःसीम भूमीकेचे संरक्षण करीत असतो.

136-10
जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ॥136॥
ज्याप्रेमस्थितीचे पोषण केले असतां ते मला सुखाने प्राप्त होतील, अशा रितीने तिचें पालन पोषण करणें हेच मला विशेषतः आवडतें.
137-10
पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । कां जे प्रेमळांचें सांकड । आमुते घरीं ॥137॥
असो पण बा अर्जुना ! भक्ताला माझे अत्यंत प्रेम असतें व मलाहि त्याचा अनन्यतेची गोडी असते. कारण आमच्या घरीं— म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी निःसीम प्रेम करणार्‍या प्रेमळ भक्तांचाच दुष्काळ आहे.
138-10
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले । आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें । लक्ष्मियेसीं ॥138॥
हे पहा अर्जुना ! स्वर्ग व मोक्ष हे दोन मार्ग मी प्रगट केलें असून, ते दोन्ही मार्ग त्यांच्या— म्हणजे माझी सकाम व निष्काम उपासना करणार्‍यांच्या — आचरणांच्या प्रवाहांत ठेविले. आणखी लक्ष्मीसह त्यांच्या कामना पूर्ण करण्याकरितां शरीरहि झिजविलें.
139-10
परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळालागीं देख । ठेविलें जतन ॥139॥
पण मीपणाचे जाणीवेवांचून असणारे व न विटणारें असें जें केवळ प्रेमसुख आहे, तें तसेच आपल्या प्रेमळ भक्ताला देण्याकरितां जपून ठेविलेले असतें.
140-10
हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥140॥
अर्जुना ! आम्ही आपल्या प्रेमळ भक्तावर आपल्यासाठीच इतकें प्रेम करतो, पण ह्या, शब्दाने सांगण्यासारख्या गोष्टी नव्हेत.
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता॥10.11॥

141-10
म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ॥141॥
अर्जुना ! मज सगुणस्वरूप झालेल्या आत्माचें प्रेम, हेच ज्यांनी आपल्या जीवंत राहण्याचे ठिकाण केले आणि माझ्यावांचून जेवढे कांही आहे असें वाटतें, तें सर्व खोटें मानलें.
142-10
तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चालें ॥142॥
हे उत्तम योध्द्या अर्जुना ! या त्याच्या यथार्थ विवेक ज्ञानरूप कापराच्या अल्पज्योतीचा, मग मीच मोठा टेंभा होऊन पुढे पुढे चालतो.
143-10
अज्ञानाचिये राती- । माजीं तमाचि मिळणी दाटती । ते नाशूनि घालीं परौती । करीं नित्योदयो ॥143॥
आत्मविस्मृतिरूप अज्ञानाचे रात्रीमध्ये नानाप्रकारच्या अज्ञानरूप अंधःकाराच्या मिळणीची दाटी होत असते, ती निःशेष नाहीशी करून, मी भक्ताचे ठिकाणी नित्य अशा ज्ञानरूप प्रकाशाचा उदय करून देतों.
144-10
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ॥144॥
याप्रमाणे सर्व प्रेमळ भक्तांचा प्रियतम जो परमात्मा श्रीकृष्ण, त्याने अर्जुनाला असे म्हटले असतां अर्जुन म्हणतो, देवा ! माझे मन अत्यंत समाधान पावलें आहे.
145-10
अहो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा । जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥145॥
अहो जी भगवंता ! ऐका. माझ्या अंतःकरणांत जो संसाररूपी केरकचरा साचला होता, तो तुम्ही झाडून नाहीसा केला, म्हणून मी आईच्या जठररूपी लाक्षागृहांतून मुक्त झालों म्हणजे जन्ममरणापासून मुक्त झालो.

146-10
जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हातां चढलें । आवडतसें ॥146॥
हे श्रीकृष्ण प्रभो ! आज मी आपल्या डोळ्यांनी आपला जन्म दिवस पाहिला आणि वाटेल तसें आयुष्य माझ्या हातीं आलें — म्हणजे मी जन्ममरणरहित अविनाशीस्वरूप झालों.
147-10
आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ॥147॥
देवाच्या मुखाने माझ्यावर बोधामृतरूपी वचनाची कृपा झाली, म्हणून तें वचन ऐकून आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाच्या भाग्यदशेस प्रारंभ झाला.
148-10
आतां येणें वचन तेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ॥148॥
आतां तुझ्या या वचनाच्या अर्थरूप ज्ञानप्रकाशाने आंतील व बाहेरील अज्ञान- अंधःकार नाहीसा झाला, म्हणून आतां तुझें खरें स्वरूप मी पाहात आहे.
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्॥10.12॥

149-10
तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम । पवित्र तूं परम । जगन्नाथा ॥149॥
ज्या ठिकाणीं संपूर्ण महाभूतें विश्राम पावतात ते परब्रह्म तूंच आहेस. हे जगन्नाथा ! तू अत्यंत पवित्र आहेस.
150-10
तूं परम दैव त तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा । दिव्य तूं प्रकृतिभावा- । पैलीकडील ॥150॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर या तिन्ही देवांचे श्रेष्ठ दैवत तूंच आहेस. सांख्यांचा पंचविसावा असंग पुरुष तूंच आहेस आणि प्रकृतीच्या पलीकडे जी दिव्य तेजोमय वस्तु सांगितली आहे, तीहि तूच आहेस.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *