संत ज्ञानेश्वर म. चरित्र ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-५.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

विठ्ठलपंत रखुमाईसह एकांतात सिध्दबेटावर राहायला गेलेत पण विघ्नसंतोषी लोकांना कसं बरं बघवेल? त्यांचा धर्म बुडत होता ना! त्यांना जेवढ छळतां येईल ते सगळं केलं. जाता येता विठ्ठलपंताची टिंगल टवाळी करणे, झोपडी समोर घाण टाकणे, बांधल्या गायीला काठीने मारणे, फुल झाडं, वेली, तुळशीचे रोप उपटुन टाकणे, झोपडीचे बासे होळीत जाळणे असा जाच होत असुनही ते डगमगले नाही. ठामपणे उभे राहिले. याच कालावधीत सिध्दोपंत व पत्नि नीराबाई इहलोक सोडुन गेलेत. त्यांनी हाही घाव सहन केला.

विठ्ठलपंतानी गीता, रामायण, भागवत, महाभारत वाचावं व रखुमाईला सांगाव. दोघेही रामकथेत हरीकिर्तनात, प्रभुच्या चिंतनात तल्लीन व्हावं, असेच दिवस चालले असतांना शके ११९० ला एके दिवशी सकाळी एका गोजीरवाण्या पुत्ररत्नाचा जन्म  झाला. नांव निवृत्ती ठेवले. तीन वर्षांनी शके ११९३ मधे ज्ञानीयांचा राजा ज्ञानेश्वर जन्माला आलेत. शके ११९६ मधे सोपान व शके ११९९ मधे मुक्ताईने जन्म घेतला. जनाबाईने अपरंपार भक्तीने म्हटले आहे…….सदाशिवाचा अवतार! स्वामी निवृत्ती दातार। महाविष्णुचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर। मुक्ताबाई मूळमाया! दासी जनी लागे पाया।।

या देवाघरच्या चिमण्या ज्योतींचं बालपण कसं गेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. ज्ञानेश्वरांचे आईवर अपरंपार प्रेम! त्यांनी ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायात आईचा महिमा कृतज्ञतेने वर्णीत केला आहे. या चिमण्या जिवांचा सन्यास्याची पोरं म्हणुन हेटाळणी करीत, अतोनात छळ केला. पण विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना सोशिकता सहन करणं शिकवलं. मुलांचा होत असलेला छळ पाहुन विठ्ठलपंत मुलांना घेऊन, निवृत्ती आठ वर्षाचा, सहा वर्षाचा ज्ञानोबा, सोपान चार, तर मुक्ताई दोन वर्षाची रखुमाईसह तिर्थाटनाला निघालेत. कुण्या देवळांत मुक्काम करावा, मिळेल ते जेवावे. रात्री विठ्ठलपंत मुलांना रामायण, भारत ऐकवावे. चारही बालकं उमलुं पाहणार्‍या जणुं कमळाच्या कळ्याच! त्यांचा सुगंध चहु बाजुंनी पसरला. ज्ञानोबाची निरिक्षण शक्ती अफाट होती. दृष्टी मोठी तिक्ष्ण! ते सर्वीकडचं निरीक्षण करुन पाहिलं ते लक्षात ठेवीत असे.

विठ्ठलपंत सर्वांना घेऊन भीमाशंकर, अगस्तीञृषींचा आश्रम, प्रवरेचा संगम, कळसुबाई पाहुन सर्वजण नाशिकला पोहोचले. त्रिंबकेश्वराचं दर्शन झाले. शेजारीच ब्रम्हगिरी! यावरच महादेवाने जटा आपटल्या व गंगेच अवतरण झालं तीच ही गोदामाई, या ब्रम्हगिरीला पदक्षिणा घालण्याच्या संकेतानुसार सर्वांनी दर्‍या खोर्‍या, डोंगर, गहन रान, नानापरीचे जनावरं, ओढे, जाळ्या, कांटे, रस्ता सांगायला कोणी नाही, असा खडतड  प्रवास करत प्रदक्षिणा पुर्ण केली.

देवानं रचलेलं सृष्टी सौंदर्य पाहत निवृत्ती मागे राहिले. मंडळी पुढे निघुन गेली होती. तोच अचानक मोठा वाघ त्यांच्या अंगावर आल्यामुळे निवृत्ती तीथेच असलेल्या गुहेत शिरले.निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीचा शत्रु!  गुहेत शिरल्याबरोबर तीथे गुहेत योगेश्वर गहिनीनाथ! निवृत्ती त्यांच्या पायांवर डोके ठेवले. त्यांनी निवृत्तीला जवळ असलेलं अद्वयांनंदाच वैभव, सर्व ज्ञान दिलं. आणि त्याची समाधी लागली. तिसर्‍या दिवशी त्यांच्या मुद्रेवर ज्ञानाचं तेज झळाळलं. सर्वजण त्यांना शोधत होतीच. नंतर सर्व मंडळी आळंदीला परतली. पण गावांतल्या कुटाळांनी झोपडीचे तीन तेरा वाजवले होते. परत विठ्ठलपंतांनी सगळं उभारलं नव्याने. नव्या उमेदीने पुनः समाधानाने दिवस कंठु लागलेत, पण निंदकांना त्यांचे सुख कसे बरं वाटेल? मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

देवाच्या साक्षीने सिध्देश्वरासमोर मुंज करण्याचे ठरविले. विठ्ठलपंत  ग्रामजोशीकडे मुंजीची अनुज्ञा घ्यायला गेल्यावर अनुज्ञा तर दिली नाहीच पण त्यांना अतिशय अपमानकारक बोलुन, सन्यासाच्या मुलांची मुंज करतां येणार नाही असे सांगीतले. विठ्ठलपंतानी निर्दोष मुलांसाठी खुपच गयावया केल्यावर सिध्देश्वरासमोर ग्राम सभेत त्यांना देहांताची शिक्षा फरमावण्यात आली. विठ्ठलपंताच्या डोक्यावर जणुं वीजच कोसळली. ही चिमणी पोरं उघडी पडतील, काय खातील? कुठं राहतील? कोण आसरा देणार यांना?

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *