सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २५१ ते २७१ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

251-8
आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं । तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥251॥
देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनांव सुद्धा रहात नाही. मग असे पहा की, कोणच्या वेळेस कशाचा लय होतो.
252-8
मग मार्गातें कासया शोधावें । कोणें कोठूनि कें जावें । जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥252॥
जर देश, काल इत्यादि गोष्टी तो आपणच होऊन राहीला आहे, तर मग कोणीकडून कसे जावे? इत्यादि ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध कां करावा?
253-8
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथींचें आकाश लागे नीटे वाटे । वाटा लागे तरि गगना भेटे । एऱ्हवीं काय चुके ॥253॥
आणि ज्या वेळेस घट फुटतो, त्या वेळेस त्यांतील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय?
253-8
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारूचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥254॥
हे पहा -खरी गोष्ट अशी आहे की, त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो; येरव्ही घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे.
255-8
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें । तया सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥255॥
अशा ज्ञानाच्या साधनाने, आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही


256-8
याकारणें पांडुसुता । तुवां होआवे योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपणपां होईल ॥256॥
यास्तव, हे पंडुसुता, तूं योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमीं आपोआप ब्रह्मस्वरुपता प्राप्त होईल.
257-8
मग भलतेथ भलतेंव्हा । देहबंध असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥257॥
मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हां देह असो वा जावो. परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही.
258-8
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे । माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥258॥
तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही, तसेच सृष्टीच्या स्थितींत स्वर्ग व संसारसुख यांच्या मोहानें कधी फसत नाही.
259-8
येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पाहें । निजरूपा ये ॥259॥
त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. कारण, तो विषयोपभोगाला तोलून पाहून ब्रह्मरूपाला मिळतो.
260-8
पैं गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥260॥
हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग मिळतो, ते सुख त्याज्य मानून तो दूर लोटतो.
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥8. 28॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः ॥8॥
। सच्चिदानन्दार्पणमस्तु ।

261-8
जरी वेदाध्ययनाचे जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कीं तपोदनांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥261॥
जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला, अथवा यज्ञ करून पुण्य पेरून ठेविले, किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले,
262-8
तया आघवां पुण्याचा मळा । भार आंतौनि जया ये फळा । तें परब्रह्मा निर्मळा । सांटी न सरे ॥262॥
अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने व्यापून गेला, तरी त्या निर्मळ ब्रह्माचा बरोबरी कोणाच्यानेंही करवत नाही.
263-8
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळां न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥263॥
जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यांत घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्ताकरता वेदयज्ञादि साधने करावी लागतात;
264-8
जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥264॥
जे स्वर्गसुख विटत नाही, व संपतही नाही, भोगणाराच्या इच्छा पूर्ण करते, व जे महासुखाचे (ब्रह्मसुखाचे) धाकटे भावंडच होय,
265-8
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका ॥265॥
अशाप्रमाणे वरकांती दिसनारे ते सुख, व जे मरणानंतरच प्राप्त होते, आणि जे शंभर यज्ञ करूनही साध्य होत नाही


266-8
तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानती कौतुकें । तंव हळुवार आवडे ॥266॥
योगोश्वर दिव्यदृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहूं गेले असतां त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे सुक्ष्म वाटते.
267-8
मग तया सुखाची किरीटी । करुनियां गा पाउटी । परब्रह्मचिये पाटीं । आरूढती ॥267॥
मग अर्जुना, त्या स्वर्गसुखाची पायरी करून ते ब्रह्मपदावर चढतात.
268-8
ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनेयोग्य । योगियांचे भोग्य- । भोगधन जें ॥268॥
याप्रमाणे स्थावरजंगमाचे मुख्य भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधाना करण्यास योग्य, व योग्याची उपभोग घेण्याची वस्तु,
269-8
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । तो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥269॥
जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ति, जो सर्व विश्वातील प्राणिमात्राचे जीवन, जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा,
270-8
जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रति बोलिला ॥270॥
जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा, व यादवकुलाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला बोलला.
271-8
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे ॥271॥
असा कुरुक्षेत्रांतील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका.
।। इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अक्षरब्रह्म योगोनाम् अष्टमोऽध्याय: ।।8।।
—————संपुर्ण————
ज्ञानेश्वरी अध्याय 8 समाप्त

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *