संत ज्ञानेश्वर म. चरित्र ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-८.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची


निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा! कशाला पैठण? कशाला विद्वत्सभा? सोपाणला व मुक्तालाही विचार पटल्याने त्यांनी सम्मतीदर्शक मान डोलावली. पण ज्ञानोबा? ज्ञानोबांचे विचार करण्याची पध्दतच वेगळी! चाकोरी सोडुन जगावेगळं जाणे, धर्माच्या, शास्राच्या बाहेरचे वर्तन त्यांना कसं पटावे? शास्राची आज्ञा झाली व तशीच वेळ आली तर राज्यावरही पाणी सोडावे….. शास्र म्हणेल जें सांडावे.। तें राज्यही तृण मानावे।। कार्याकार्य विवेकी। शास्रेंची करावीं पारखीं।। अगदी हेच तत्व ज्ञानोबा या वेळीही बोलले. दादा! आपला अधिकार मोठा! मी आपल्या समोर अजान! पण दादा! आज नाही तरी उद्या लोकांना आपल्या वागण्यावर शंका न घेता, आपलेच बरोबर आहे असा त्यांना दृढविश्वास येईल.
पण याचा परिणाम? जो तो आपल्या मनाप्रमाणे वागेल. धर्माचं बंधन तुटुन अराजकता माजेल, कुणी कुणाचं ऐकणार नाही. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत राहणार नाही! आणि मग सगळीकडे अधर्माचे राज्य होईल, कुणामुळे? आपल्यामुळे! आपला शुध्द हेतू लोकांना दिसणार नाही, फक्त वागणं तेवढ त्यांना दिसेल. असं होऊ द्यायचं की, धर्माप्रमाणे वागुन जगापुढे आदर्श ठेवायचा?
स्वधर्म अधिकार जातीपरत्वे भेद। उचित तें शुध्द ज्याचें तथा।। म्हणोनियां संती अवश्य आचारावें। जना दाखवावे वर्तोनियां।।प्रत्यवाय आहे अशास्रीं चालतां। पावन अवस्था जरी झाली।।ज्ञानदेव म्हणे ऐका जी निवृत्ती। बोलिली पध्दती धर्मशास्रीं।। शेवटी आपण सांगाल तेच होईल! निवृत्ती गोड हंसले, प्रेमाणे अलिंगण देत म्हणाले, चला आपण पैठणला जायचेय! आणि चौघांचीही पैठणची महायात्रा सुरु झाली.
आळंदी ते पैठण….कोरडा मुलुख, रुक्ष जमीन। हा शंकर-महादेवाचा देश. त्याला रुक्ष, ओसाड! उदास, आवडेल. सुपीक जमीन कशी आवडेल? त्याच भूमीत बसुन आदीनाथ शंकर-ऊमाची तात्वीक चर्चा चालायची.
वर रखरखलेला भास्कर तापतोय, खाली धरती गरम, भाजणारे उसासे टाकतेय. मृगजळाचे वाफारे, हाती कांहीच न लागणारे वाफारे पळताहेत, कुठे पाण्याचा थेंब नाही अशा ओसाडीतुन या चौघांना एकदाचं पैठणला पोहोचलंच पाहिजे. कारण त्यांचा खांद्यावर उद्याच्या धर्माचं राऊळ उभं राहायचंय! यांच्या अंगातुन गळणार्‍या घामातुन उद्याची धर्माची शेती पिकवायचीय! या फुफाट्यांतुन उठणार्‍या पावलांवर पाऊल टाकुन ऊद्याचा महाराष्र्ट निर्माण करायचाय!
वाटेतील कोरडे ठणठणीत ओढे, भकास माळराण, बोडक्या टेकड्या, कोरड्या नद्या, तलखी करीत पावसाची वाट पाहणारी चिराळलेली शेती हे सगळं पार करीत एका संध्याकाळी ही भावंड पैठणला येऊन पोहोचली. त्यांना गोदामाई दिसल्यावर तिच्यात मनसोक्त डुंबुन वाटेत आलेला सर्व शिणभाग निघुन गेला. रात्र एका देवळाच्या ओवरीत काढली.
दुसर्‍या दिवशी ही भावंड पैठणभर फिरुन गोदामाईच्या काठावर बांधलेली कधीकाळीची मोठमोठी देखणी देवळं, जिथं विद्वान ब्राम्हणांच्या वादसभा होत, ते सभामंडप वगैरे पाहुन शेवटी धर्माधीकार्‍यांच ठीकाण त्यांनी शोधुन काढलच!
धर्माधिकारी अन् मोठमोठे शास्री मंडळींची गांवदेवळात विविध विषयांवर वाद सुरु होता. त्या शास्री मंडळीत कुणी सहाशास्री, कुणी दशग्रंथी, कुणी नैय्यायिक, तर कुणी सांख्यशास्री होते.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *