संत चोखामेळा म. चरित्र ४४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ४४.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

अंतिम भाग

मंडळींनी आणलेल्या पालखीत अस्थीकलश ठेवण्यांत आला आणि टाळ मृदुंगाच्या तालावर अवघ्या जनसमुदाया ने एकच गजर केला…”विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।।” संत चोखामेळा की जय गजरा च्या ध्वनीने विठ्ठलाच्या पायाखालची वीट थरारली.चंद्रभागा उसळून सार्‍या वाळवंटभर पाणीच पाणी झालं.आकाश छेदत गेलेल्या गजराने वीज तळपली. ढगांचा गडगडाट झाला.आणि लक्षावधी थेंबांमधुन काळे मेघ अश्रू ढाळू लागले. कोसळणार्‍या जलधारा,सोसाट्याचा वारा,विजांचा कडकडाट या सर्वाचा चोखोबांच्या अस्थीमहायात्रेला जमलेल्या समुदायावर कांहीच परिणाम झाला नाही बघतां बघतां गावाबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतून निघालेली महायात्रा गावातल्या मधल्या चौकात आली.पालखी चौकाच्या मध्यभागी ठेवली.एरवी आपली सावली कोणावर पडुन अपला विटाळ होईल या भितीने रस्त्याच्या कडेने चालणार्‍या, चोखोबांच्या अस्थींच्या पालखीच्या सावलीवर तरी डोके ठेवायला मिळावे म्हणुन जो तो धडपडत होता.पण हे सारं चोखोबांच्या मृत्युनंतर!या विरोधाभासाचे नामदेवांना मोठे नवल वाटले. चौकात ठेवलेल्या पालखीचे दर्शन अवघ्या पंढरपूरातील अस्पृश्य वस्ती, ब्राम्हणआळी,वैश्य,मराठा,सर्वच थरांतील लोकं नमस्कारासाठी धडपडत होते.आयुष्यभर या सगळ्यांना चोखोबा जोहार घालीत होते,आज त्याच लोकांना चोखोबांचे चोखपण,निर्मळपण समजले होते.सगळे पाहुन चोखांचा मेहुणा,शिष्य बंकाने त्यांच्या निर्मळपणाची साक्ष देतांना म्हटलेला अभंग नामदेवांना आठवला….. “चोखा चोखा निर्मळ।तया अंगी नाहीमळ चोखा सुखाचा सागर।चोखा भक्तीचा आगर।।चोखा प्रेमाची माऊली।चोखा कृपेची साऊली।चोखा मनाचे मोहन।बंका घाली लोटांगण

पालखीमधे ठेवलेल्या चोखोबांच्या अस्थीकलशाची कर्ममेळाने यथासांग पुजा केली.आणि एकवार सारं पंढरपूर गजराने दुमदुमुन गेले.बघतां बघतां पालखी महाद्वाराजवळ आल्यावर नामदेवांनी पालखी तिथंच ठेवायला सांगीतली.पण आज सर्वांच्याच आग्रहाने पालखी सभागृहात नेण्याचे ठरले,पण काय आश्चर्य! पालखी तसूभरही हलेना. सर्वांना नवल वाटले.महाद्वाराबाहेर जीथे विठ्ठलाच्या दर्शनाची आस बाळगुन चोखोबा उभे राहत असत,नेमकी तिथेच पालखी ठेवल्या गेली होती.चोखोबा कधीही त्या महाद्वारांतुन आंत गेले नव्हते आज त्यांच्या अस्थीनेही जायला नाकारले.मृत्युनंतरही त्यांचे आत्मभान सुटले नव्हते.पालखी हलेना म्हणुन श्रीधरपंतानी पुढे काय करायचे विचारल्यावर,नामदेव म्हणाले,पांडुरंगा च्या दर्शनार्थ इथेच तासन् तास ते तिष्ठत उभे राहत.जिथे त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या त्याच ठीकाणी,त्याच जागी त्यांना चिरविश्रांती हवी आहे,हाच या घटनेचा अर्थ होतो.श्रीधरपंत! महाद्वारा च्या पायरीशी,इथच याच ठीकाणी चोखोबांची समाधी बांधु या!नामदेवांनी विठूनामाचा गजर सुरु केला.शेकडों आवाज त्यांत मिसळले.विठ्ठलाच्या कानावरही गजर गेला.अस्थीकलश आत आणण्याची वाट बघत होता.पण नाही आला.आणि विठुराया समजला,समाजा ने घालुन दिलेले नीतीनियम आयुष्यभर काटेकोरपणे सांभाळणार्‍या चोखोबांनी मृत्युनंतरही नियम तोडले नाही.त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.महाद्वाराच्या पायरीजवळ चोखोबांच्या समाधीच्या तयारीत शेकडों हात गुंतले होते.अचानक नामदेवांचे लक्ष वरच्या पायरीकडे गेले, तिथे विठ्ठलरुख्मिणी उभे असलेले दिसले नामदेवांनी धाव घेऊन विठ्ठलाच्या चरणा ला मिठी मारुन स्फुंदुन स्फुंदुन रडु लागले.मंदिराच्या वरच्या पायरीवर डोके ठेवुन नामदेव कां रडत आहे?कुणालाच कळेना.सगळीजणं स्तब्ध झालीत,पण तरीही त्या निरव शांततेत कापर्‍या बारीक आवाजांत “विठ्ठल विठ्ठल ” नाद ऐकु येत होता.नक्कीच चोखोबा!नामदेवांनी देवाकडे बघीतले,त्याच्याही नजरेत तेच भाव दिसले.नामदेवांनी विठ्ठलाचे चरण सोडुन,खाली पालखीकडे धाव घेतली.विठ्ठलाचा नामजप पालखीत ठेवलेल्या अस्थीकलशातुन येत होता. त्यांनी कलशावर डोके ठेवले.अविरत आसु वाहत होते.नामघोषाला सुरुवात केली.आणि नामघोषाने सारे आकाश भरुन गेले.तिन्हीसांज व्हायच्या आंत समाधी बांधुन झाली.

नामदेवांनी व कर्ममेळाने अस्थी कलश बांधलेल्या समाधीच्या अंतःस्थळा वर ठेवुन विठ्ठलनाम कोरलेला दगड ठेवुन अंतःस्थळ झाकुन घेतले.जनाबाईने समाधीवर तेवती पणती ठेवली.विठ्ठला चा व चोखोबाचा गजर करत लोकं आपापल्या घरी गेले आणि नामदेव गर्भागारात! देवा! एक प्रश्न मनांत सलत आहे, त्याचा खुलासा हवाय!विठूराया!चोखोबां ची तुझ्यावरील निस्मीम,सखोल भक्ती मी जाणतो.तरीही त्यांच्या अस्थीतुन तुझ्या नामजपाचा नाद कसा उमटत होता?तो एक पापभीरु मनुष्य,योग,हटयोग, कुंडलिनी जागृती,परकायाप्रवेश या बाबतीत कोणतही ज्ञान नसतांना तुझ्या नामाचा उद्घोष त्यांच्या अस्थीतुन व्हावा हे कसे?नेमका काय अर्थ?पांडुरंग प्रसन्न हसत म्हणाले,नामया!तुझ्यात आणि त्यांच्यात खुप फरक आहे.तुझी योग्यता, सखोलभक्ती त्यांच्यापेक्षा मोठी असली तरी,तुझ्या भक्तीचं स्वरुप सर्वव्यापी, ज्ञानी,बहुश्रुत व्यासंगी आहे.भक्तीबरोबर ज्ञानाने परीपुर्ण अशी अभंगरचना करुन वारकरी संप्रदायाची धूरा समर्थपणे खांद्यावर पेलुन,तीर्थाटनातुन दूरवर पसरवण्याचा प्रयत्न केलास,म्हणुनच तूं सर्वव्यापी असुन तुझ्या व्यक्तीमत्वाला अनेक कंगोरे,संतपणाचे अनेक पैलू आहेत.तूं संतश्रेष्ठ आहेस.याउलट चोखोबाचे आहे.त्यांचा प्रत्येक श्वास, विचार,ध्यान,धारणा मी आहे.माझ्या शिवाय त्यांच्याकडे दुसरं कांहीच नव्हतं. त्यांच जगनही मीच व जगण्याचं कारण ही मी च होतो.माझ्या नामजपाचा ध्यास त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत भिनला होता. माझं नाव त्यांचा प्राण,अस्तित्व होतं. म्हणुनच त्यांच्या सार्‍या अवयवांतु माझं नांव झिरपत झिरपत अस्थीमधे भिनल्या गेलं.त्यांच श्रेष्ठत्व होतं माझ्या घेतलेल्या ध्यासात,स्वतःला माझ्यात केलेल्या समर्पनात.म्हणुनच अस्तित्वहीन अवस्थेतही त्यांच्या अस्थी माझं नांव जपत होत्या. जो पर्यंत माझं नाव उच्चारलं जातय,जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे. पंढरपूर भक्तिचं अधिष्ठान आहे तो पर्यंत चोखोबाचं नांव उच्चारलं जाणार, समर्पित अस्तित्व भक्तांना प्रेरणादायी ठरणार आहे. कांही क्षणांनंतर दोघांची नजर समोर गेल्यावर,समाधीजवळ चोखोबा उभे होते.दोघांची नजर आपल्याकडे वळलेली पाहुन,खाली झुकुन दोघांनाही जोहार घातला.नामदेवांच्या मनांत चोखोबांचे शब्द रुंजी घालत होते….”जोहार मायबाप जोहार।मी विठोबा रायाचा महार। हिशोब देतो तारोतार।दयाळू मायाळू बाप करा। येईल मुजरा निजसत्वे मी मायबाप विठूपाटलाचा मी महार। चोखामेळ्याचा हा जोहार। जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार ।।” चोखोबा अंतर्धान पावले आणि दोघांचेही डोळे अश्रूंनी भरुन आले. अशा या श्रेष्ठ भक्ताला कोटी कोटी प्रणाम!! !!   समाप्त !!

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *