संत चोखामेळा म. चरित्र ३५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग  – ३५.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

लवकरच नामदेव पंजाबकडे तीर्थाटनाला निघुन गेले.चोखोबांनी पुन्हा नामस्मरणांत व दीपमाळेच्या बांधकामात स्वतःला झोकुन दिले. अनंतभटा कडुन विठ्ठल ही तीन अक्षरे लिहायचे शिकुन,दीपमाळेच्या प्रत्येक वीटेवर कोरली होती.विठ्ठल त्यांच्या प्रत्येक श्वासात वसला होता.त्यांना खात्री होती,एक दिवस विठ्ठल आपल्याला भेटायला नक्की येणार!आणि झालेही तसेच.चोखोबा विठ्ठलाचे नामस्मरण करत दीपमाळ बांधण्याच्या कामात व्यग्र असतांना एक वाटसरु चोखोबांकडे येऊन म्हणाला,चंद्रभागेच्या या तीरावर दीपमाळ कशासाठी बांधताहात?कोण बघणार?दिवे कोण लावणार? चोखोबा म्हणाले,या तीरावर नेहमी अंधार असतो. दीपमाळ बांधुन पूर्ण झाल्यावर या तीरा वरचा सगळा अंधःकार उजळून निघेल. या दीपमाळेच्या प्रकाशात त्या तीरावर च्या विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन रात्रं दिवस होईल.दीपमाळ बांधुन पुर्ण करणे माझ्या जीवनाचे ध्येय असुनअंतिम श्वासा पर्यंत करणारच!वाटसरुने विचारले तूं इथे एकांतात कां राहतोस?माझ्या देवाचा व गुरुंचा तसा आदेश आहे.माझ्याकडुन विठ्ठलाचे नामस्मरण उत्कटतेने,निष्ठेने व्हावे,लक्ष विचलित होऊ नये म्हणुन इकडे राहण्याचा आदेश दिला व त्याचे मी पालन करतोय!

कांही क्षण स्तब्धतेत गेल्यावर चोखोबांनी मान वळवली आणि भान हरपुन बघतच राहिले.हात कमरेवर ठेवुन सावळ्या चेहर्‍यावर मिष्किल हास्य खेळवत साक्षात पांडुरंग उभा होता. चोखोबांना कळेना हा भास की सत्य? त्यांनी आपले चिखलाने बरबरटलेले हात गालावर मारुन घेतले.चेहर्‍यावर लागले ला चिखल पाहुन पांडुरंग खदखदुन हसायला लागला.भानावर येऊन त्यांनी  विठ्ठलाच्या पायावर लोटांगण घातले. अविरत ओघळणार्‍या अश्रूंनी चरणावर अभिषेक केला.विठोबाने खांद्याला धरुन उभे करुन मिठीत घेतले.हुंदके देत चोखा म्हणाले, देवा! तूंं आलास?मी वाटच बघत होतो.तूं आलास? खरच आलास? भान हरपुन चोखोबा नाचायला लागले. आणि चोखोबांच्या शब्दांची अंगभर प्रभावळ लेवुन विठ्ठलही नाचायला लागला.कवतिकाचं कौतुक,अप्रुपाचे अप्रुप पाहण्यासाठी आकाशांत देवगणांनी एकच गर्दी केली.आणि नाचणार्‍या विठ्ठलाला बघण्यासाठी व बेभान झालेल्या चोखोबांना आशिर्वाद देण्यासाठी सहस्र जलधारांच्या रुपानें लक्षावधी थेंब वेगाने खाली आले. पडणार्‍या पावसाची जाणीव न झालेला विठोबा,चोखोबांंच्या अभंगाने प्रसन्नचित्त होऊन तसाच नाचत राहिला.चोखोबांना भान आल्यावर स्वतः चिंब भिजले होते पण विठोबाचे पितांबर,उत्तरीय सर्व कांही चिंब चिंब भिजले होते.

चोखोबांनी पावसांत नाचणार्‍या विठोबाच्या हाताला धरुन खोपटांत आणले.साठीला आलेला चोखोबा जणूं परत लहान झाला. भाकर्‍या थापणारी सोयरा एकटाच हसणार्‍या,बडबडणार्‍या चोखोबाकडे बघतच राहिली.तीला म्हणाला,अशी काय बघतेस? अग!देव,पांडुरंग माझा विठोबा आपल्या घरी आलाय!अरे चोखा मला भूक लागलीय,तुझ्या घरची भाकरी उसळ,मिरचीचा ठेचा खायचाय!सांग तुझ्या सोयराला.अग! भराभर भाकरी, चवळीची उसळ,मिरचीचा ठेचा कर, आज आपला पांडुरंग आपल्या घरी जेवायला आलाय.बोलणं ऐकुन सोयरा बघतच राहिली.चोखोबा! स्वयंपाक होई स्तोवर कडूलिंबाच्या झाडाखाली बोलत बसु या!स्वयंपाक झाल्यावर तिथेच वाढुन आणायला सांग.चोखोबा,ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडाबद्दल,नामदेवांबद्दल भरभरुन बोलु लागला.आपल्यावर झालेला अन्याय,शिक्षेबद्दल,ब्राम्हण असुनही ज्ञानदेवांनी कसे जवळ केले, संत मंडळींनी अभंगासाठी कसे उद्युक्त केले असे बोलणे सुरु असतांनाच,नवर्‍या ला दुखवायचे नाही म्हणुन सोयरा दोन ताटं वाढुन घेऊन आली.एका अस्पृश्याच्या झोपडीतील ठेचा,भाकरी विठ्ठल चवीने खात होता.एवढ्यात देवाला ठसका लागला.देवा! हळू जेवा.तिखट झालं का ?सोयरा अग! लवकर दही आण!देवाला ठसका लागला.अग! रोज गोडधोड खाणारा,त्याला एवढं तिखट कसं सोसेल त्यांचे ओरडणे ऐकुन धावतच ती एका वाडग्यात दही घेऊन आली.तीला वाटले, चोखोबाला ठसका लागला असेल असे वाटुन दही वाढायला पुढे आली,तोच आंधळी झालीस का?जरा बघून चल की देवाच्या अंगावर दही सांडशील,या गोंधळात तीचा पाय अडकल्याने वाडगा हिंदकळला आणि थोडेसे दही सांडला,ते बघुन ओरडत म्हणाले,इतकं सांगुनही देवाच्या पितांबरावर दही सांडवलेच ना?

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *