सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

251-14
तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे । तियेविषयीं धांवे । घेती करणें ॥251॥
त्याप्रमाणे शास्ञनिषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याची इंद्रियसुद्धा त्याच दिशेने धाव घेतात.
252-14
मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे । निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें ॥252॥
हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो, सन्निपातापासुन बरळतो आणि हा कोणाची ओळख असो अथवा नसो कोणासही भुलत असतो.
253-14
चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे । ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि ॥253॥
त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते. पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात.
254-14
किंबहुना ऐसैसीं । इयें चिन्हें तम पोषीं । जैं वाढे आयितीसी । आपुलिया ॥254॥
फार काय सांगावे? जेव्हा तमोगुण आपल्या स्वाभाविक गुणांसह पूर्णपणे वाढला जात असतो, तेव्हा जीव अशा लक्षणांचा पोषणकर्ता ठरतो.
255-14
आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी पडे खागें । तरी तेतुलेनि रिगे । तमेंसीं तो ॥255॥
आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले, तर तो तमोगुणी पुरुष तितक्याच तमोगुणासह पुन्हा देहरुपी घरट्यामध्ये जन्म घेतो.

256-14
राई राईपण बीजीं । सांठवूनियां अंग त्यजी । मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे? ॥256॥
मोहरी पेरल्यानंतर काही दिवसात तिचे रुपातंर एका झाडामध्ये होते. त्यावेळेस त्या झाडास येणारी फळे त्या मोहरीशिवाय दुसर्‍या एखाद्या रसाळ फळाची येणार आहेत काय?
257-14
पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां । कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥257॥
ज्याप्रमाने अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन (अग्नीपासून दिवा लावल्यावर) मग तो पहिला अग्नी जरी विझला तरी विझेना का? कारण की ज्या नविन ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी असनार आहे.
258-14
म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें । देह जाय तैं मागौतें । तमाचेंचि होय ॥258॥
म्हणून तमाच्या तमोगुणाच्या संकल्पाला बांधून (म्हणजे तामस संकल्प करीत असताना) जर त्यास मृत्युरुपी देहाचे गाठाडे बांधावयास लागले असता.त्यास पुन्हा तामसयोनीतच देह मिळतो. अथवा जन्म प्राप्त होतो.
259-14
आतां काय येणें बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे । तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ॥259॥
आता हे पुष्कळ बोलून काय करायचे आहे? ज्या मानवदेही तमोगुण वाढुन ज्यावेळी त्यास मृत्यु ओढावला जाता. त्यावेळी त्याच्या हातुन घडलेल्या पापकर्माप्रमानेच त्याला पशु-पक्षी अथवा झाड किंवा कृमी-किटकाचा जन्म त्यास प्राप्त होतो.
260-14
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें । तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौतसमो ॥260॥
याच कारणाकरता जे सत्वगुणापासून किंवा चांगल्या गुणापासुन उत्पन्न होते त्यास श्रुतींमध्ये सुकृत म्हटले जाते.

261-14
म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ॥261॥
म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय.
262-14
मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी फळलिया । जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें ॥262॥
मग राजस ज्या क्रिया आहेत, त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे आहेत कारण की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात तरी त्या क्रियांचे फळ दु:ख हे असते.
263-14
कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख । तैसें तें राजस देख । क्रियाफळ ॥263॥
अथवा कडूनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर असतात, पण आत विषासारख्या कडू असतात. त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज.
264-14
तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके । विषांकुर विखें । जियापरी ॥264॥
ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते.
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥14.16॥
श्लोकार्थ -: -: 👉सात्विक (सुकृत) कर्माचे निर्मल सत्वप्रधान फल मिळते, असे ज्ञाते सांगतात. राजस कर्माचे फल दु:ख व तामस कर्माचे फल अज्ञान असते.
(सात्विक-राजस-तामस कर्माचे फल)
265-14
म्हणौनि बा रे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना । जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं ॥265॥
म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनमानाला हेतू आहे, तसा सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे,

266-14
आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण । आपुलें विस्मरण । अद्वैता जेवीं ॥266॥
ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप-विस्मरण हे जसे जीवदशेस येण्याचे कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे.
267-14
मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा । पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ॥267॥
शहाण्या अर्जुना, मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन दोषसमुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे.
268-14
ऐसें विचाराच्या डोळां । तिन्ही गुण हे वेगळवेगळां । दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ॥268॥
तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले.
सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥14.17॥
*श्लोकार्थ -: -:सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही तर अज्ञान सुद्धा उत्पन्न होते
(सत्व-रज-तम यापासून होणारी निर्मिती)
269-14
तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढ पतनीं । सत्त्वावांचूनि नाणीं । ज्ञानाकडे ॥269॥
तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले.
270-14
म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती । सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी ॥270॥
म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा (आर्त जिज्ञासू, अर्थार्थी या तीन भक्तींचा) त्याग करून (ज्ञानी भक्त) ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणपर्यंत सात्विक वृत्तीने रहाण्याचा निश्चय करतात.
ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । क्षजघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः-॥14.18॥
*श्लोकार्थ -: -::-* सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी (स्वर्गादि लोकी) जातात, रजोगुणी पुरुष मध्येच (मनुष्यलोकी) रहातात. निंद्य गुणांमधे असलेले तामसी पुरुष अधोगतीला पशुपक्ष्यादिकांच्या जन्माला जातात.
(सत्व-रज-तमाचे फल)


271-14
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें । ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ॥271॥
त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने त्यांचे जगणे व मरणे असते, ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात.
272-14
इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे । तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं ॥272॥
याचप्रमाणे जे रजोगुणात जगतात व मरतात ते मृत्युलोकात मनुष्य होतात.
273-14
तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें । जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ॥273॥
त्या मृत्युलोकात सुखदु:खाची खिचडी, देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. व जेथे, ज्या मृत्युलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही.
274-14
आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥274॥
व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात, ते नरक भूमीला जाण्याचा दाखला घेतात.
275-14
एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ॥275॥
अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादि तिन्ही गुण ऊर्ध्वादिगतींना कसे कारण आहेत, हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *