संत सोपानदेव चरित्र ३९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ३९.

अनुक्रमणिका


त्यारात्री सोपानांना शांत निश्चिंत स्थिर झोप लागली होती.मुक्ता त्यांच्या अंगावर हात टाकुन जणूं त्याना धरुन ठेवुन निश्चिंत भावनेने शांत निजली होती जागे होते फक्त एकटे निवृत्तीनाथ, या निजलेल्या दोघांकडे अनिमिष नेत्राने एकटक बघत,जणुं या काळजाच्या तुकड्यांना डोळ्यात,मनांत,ह्रदयात साठवुन घेत होते.ज्ञानदेवांनी समाधी घेऊन अजुन पुरता महिनाही झाला नव्हता.आधीच ठरलं होत,एक महिन्याने सोपान आणि नंतर मुक्ता समाधी घेणार हे निवृत्तींना माहित होतं.घडणारं टळणार नव्हतच!हेच तर संचित होतं!पण निवृत्ती दादा?धाकट्या तीन भावडांना निरवल्या नंतरच स्वतचा विचार करायला मोकळे होते.हेच विधिलिखीत,विधिचे विधान होते.सृष्टीचं चक्र उलट्या गतीनं फिरत होतं,निदान निवृत्तींच्या बाबतीत तरी. त्यांच्या डोळ्यांतुन आसवं ओघळत होती फक्त याक्षणीच ते मनसोक्त रडु शकत होते.उद्या तर गंभीर प्रसन्नतेचा मुखवटा धारण करुन सोपाणाला,काळजाच्या तुकड्याला निरोप द्यावा लागणार होता.


त्यांना फुटलेला हुंदका आवरुन शांत निजलेल्या सोपानाच्या केसातुन हात फिरवला.जणूं आईचाच हात फिरत असल्याचा भास होऊन सोपानांना जाग आली.दादांचे ओघळणारे डोळे पाहुन म्हणाले, दादा! तू…तू…सुध्दा?सोपानचा हात हाती घेत म्हणाले,सोपाना!आधी ज्ञानेशा आणि आतां तू आणि नंतर मुक्ता मी थोरला असुन ही उलटी गंगा वाहतांना बघुन काळीज जळतय रे!अरे! मी पण माणुसच आहे ना?थोरला दादा,गुरु, निवृत्तीनाथ म्हणुन स्थितप्रज्ञेचा मुखवटा कितीवेळ आणि कितीदा धारण करुं रे?


सोपाना! या एकांतात रडुन घेऊ दे रे,पोट भर रडु दे रे!आज आतां,या क्षणी तूं माझा मोठा,थोरला दादा हो असे म्हणत त्यांच्या खांद्यावर मान टेकवुन निवृत्तीदा हुंदक्यावर हुंदके देत रडुं लागले.सोपान निःशब्द त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत, थोपटत राहिले.स्वतःला सावरल्यावर, सोपानच्या चेहर्‍यावचे हास्य बघुन,कारण विचारले असतां,सोपानानी लहानपणी घडलेली घटना सांगीतली.एक दिवस तू व ज्ञानदा जंगलात वनभोजनाला गेले होते.मी लहान म्हणुन खुप हट्ट करुनही नेले नव्हते.म्हणुन मी गोपालकृष्णासमोर बसुन त्याच्या जवळ हट्ट धरला की,एक दिवस तरी मला मोठा कर!आणि आज इतक्या वर्षांनी गोपालकृष्णानं माझा तो हट्ट पुरा केल्याचे आठवुन हसु आलं दादा


तिघही उठुन सगळं आवरुन, योगाभ्यास केला.मग मुक्तानं तेल लावुन सोपानांना आंघोळ घातली,ओवाळलं. आतां निघायचय,या पर्णकुटीचा,झोपडी चा,जागेचा शेवटचा निरोप घ्यायचा होता.अंनत आठवणी इथे गुंफल्या होत्या.धीरगंभीर, स्थितप्रज्ञ,शांतपणे गोपालकृष्णाला मिटल्या डोळ्यांनी हात जोडले.नंतर निवृत्तीदादांच्या चरणावर मस्तक ठेवलं. नंतर मुक्ताकडे वळले तर तीच्या दह्याची वाटी व डोळ्यांत गंगा.सोपान म्हणाले, मुक्ते!अग हे भलतच काम करतेस?अगं दहीसाखर त्याच्या हातावर घालतात ज्यानं लवकर परत यायचं असते,मुक्ते मी समाधीस्त व्हायला चाललोय,सरपण आणायला नाही.वेडी कुठली?मुक्ता दह्याची वाटी घेऊन तशीच ऊभी,डोळ्यां तील पाणी तसचं वाहुं देत म्हणाली,दादा हे दहीसाखर तुझ्यासाठी नसुन माझ्या साठी आणलय.. हे दहीसाखर माझ्या हातावर घाल,म्हणजे…मी..मी लवकरच ज्ञानदा व तुझ्याकडे येईन.

समोर वाटी धरुन..दादा घालतोस ना?निश्चयाचा महामेरु निवृत्ती,स्थितप्रज्ञ सोपान दोघेही तीचे हे रुप पाहुन आवाक झाले व दोघांनीही तिला कवेत घेतले.रडत कुणी नव्हत,पण काय नव्हतं त्या मिठीत?आई बाबांची माया,वात्सल्य अनुभवुन मिठी सोडली.बाजुला ठेवलेली वाटी उचलुन सोपानांनी तीच्या हातावर दहीसाखर घालुन क्षणभर खोलवर तिच्या डोळ्यात बघीतले.त्यात फक्त आणि फक्त निश्चय दिसला.आतां ते निश्चिंतमनाने समाधी घेण्यास मोकळं झाले.निवृत्तीदादा पुढे होऊन सोपानाचा हात धरला आणि झोपडीच्या कवाडाकडे पावलं टाकली.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *