संत सोपानदेव चरित्र ३०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ३०.

अनुक्रमणिका


श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगीतले तेच सोपानाने नागरी मराठीत लिहिलं .. मी जयाचा मातापिता।पितामह श्रेष्ठ कर्ता
मी पवित्र ओंकार असता ।
ऋग,यजु,साम,वेद मी । आणि भगवंताचे हे सर्वव्यापक अधिष्ठान बघुन सोपानाचे डोळे भरुन आले.भगवंतांनी भक्ताला दिलेला दिलासा म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुनिश्चितपणे जगण्यासाठी दिलेलं पाठबळ होतंं.सोपान गहिवरुन लिहितात…
आणिक ठायी मन न घालिती ।
माझे चिंतने उपासना करीती ।
त्याचा योगक्षेम निश्चिती।मी चालविता होय ।।” यापेक्षा भगवद् भक्ताला आणखी काय पाहिजे? त्या सर्वसाक्षी दयाळु परमेश्वरानं दिलेलं अभिवचन भगवद् भक्ताला जगण्याचं साधन आहे. नऊ अध्याय होत आले आणि सोपानाला वाटलं,या अनुवादात आपली नाममुद्रा घालावी.हे सोपानाने लिहलं हे वाचणार्‍यास समजावं,ही भगवद् गीता सर्वसामान्यांना समजावी म्हणुन नागरी मराठी भाषेत अनुवाद केला हे कळेल. नवव्या अध्यायाच्या शेवटी लिहितात…


“ऐसे गृह्य जाण।अर्जुनाप्रती सांगे श्रीकृष्ण। सोपान म्हणे श्रोतिया लागुन। सादरे श्रवण करावे. ।।”
नववा अध्याय लिहुन झाला आणि सोपानांना निवृत्तीदादांची खुप आठवण येऊं लागली.लिहिलेले दाखवायला ते अतिउत्सुक होते.मुक्ताई व ज्ञानदादाची पण!निवृत्तीदादांचं मार्गदर्शन,ज्ञानदादाचं समजावणं,मुक्ताचं छेडणं ही राहुन राहुन आठवायला लागलं.त्या आठवणीतच ते निद्रेच्या अधिन झाले.
सोपान गाढ,शांत झोपलेल असतांना एक विलक्षण घटना घडली.

सोपानांच्या समोर एक दिव्र स्री आली. तिची मुद्रा अत्यंत तेजस्वी होती.चेहर्‍या भोवती वलय,डोळ्यांत स्निग्ध भाव,चार बाहु,एका हातात वीणा,दुसर्‍या हातात लेखणी,तिसर्‍या हातात पांढर्‍या फुलांची माळ,आणि चौथा हात आशिर्वादासाठी उचललेला,चेहर्‍यावर प्रसन्न स्मित होतं. तिनं अत्यंत प्रेमानं हाक मारली.सोपानs ए सोपानsss उठ बाळ उठ! ए सोपानs तिच्या हाकेनं सोपान खडबडुन जागे होऊन उठुन बसले.हात जोडुन वंदन केलं.प्रणाम माते! ती स्री म्हणाली, “सोपान! तूं हाती घेतलेलं कार्य अतिशय अपूर्व आहे.परमार्थाच्या,अध्यात्माच्या मार्गावरुन जाणार्‍यांना तुझं हे लेखन म्हणजे सोपान ठरणार आहे.अध्यात्माची उंची गाठण्यासाठी चढायला सोपा सोपान! तुझं हे कार्य युगानुयुग लोकांच्या स्मरणांत राहिल.

जोपर्यंत या पृथ्वीतला वर श्रीकृष्णाचं अस्तित्व अधिष्ठित असेल श्रीमद् भगवद् गीतेचं स्थान लोकांच्या मनात सुस्थापित असेल तोपर्यंत तुझं हे कार्य आबाधित राहील.तूं साक्षात शारदा, सरस्वतीचा पुत्र आहेस.माझा तुला आशिर्वाद आहे.कार्यसिध्दीभवः!”एवढं बोलुन ती स्री अंतर्धान पावली.सोपान भान हरपल्या स्थितीत तसेच बसुम होते. मनांत विचारांची आवर्तने थैमान घालत होती.लिहायला घेतल्यापासुन त्यांच्या मनाला रुखरुख वाटत होती की,आपलं हे लिखाण कितपत योग्य झालय?निवृत्तीदादा आल्याशिवाय,अभिप्राय समजणार नाही.कुणी दिशादर्शक, मार्ग दर्शक नसल्यामुळे सोपान मनातुन थोडे अस्वस्थ होते,पण आज प्रत्यक्ष शारदेनं, सरस्वती मातेनं स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्टांताने ह्रदय भरुन आलं.प्रसन्नता मना वर पसरली.


भल्या पहाटे सोपानांना जाग आली.उठुन बसुन चेहर्‍यावर हात फिरवला व डोळे उघडले.आणि ते एकदम दचकलेच!बाजुला पांढर्‍या फुलांची माळ होती.म्हणजे रात्रीचं ते स्वप्न नव्हतं तर?प्रत्यक्ष सरस्वतीमाता इथं आपल्याला भेटायला आली होती.हे सत्य की,सत्याचा आभास?त्यांनी पांढर्‍या फुलांची माळ उचलली.छानशी मंद सुंगध होता,ताजी टवटवीत असलेली ती माळ स्वर्गीय भासत होती.म्हणजे नक्कीच शारदामातेच्या हातातील माळ आपल्याला कृपाप्रसाद म्हणुन दिली याची त्यांना खात्री पटली आणि हाती घेतलेले कार्य बहुजनांना उपयुक्त ठरेल हे लक्षात आल्यावर त्यांना अतिव समाधान वाटले.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading