संत सोपानदेव चरित्र ४१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका

अंतिम भाग- ४१.


सोपानदेव म्हणाले,निवृत्तीदादां सारखा गुरु,ज्ञानदेवांसारखा मार्गदर्शक आणि मुक्तासारखी बहिण लाभली.ती अमची माय बनुन सांभाळ करीत आहे. नामदेवकाका,गोरोबाकाका,सावता,सेना चोखोबा,जनाबाई यांच्या सारख्या विभूतींचा,विठ्ठलभक्तांचा सहवास लाभला आणि भक्तीची महती पावलों पावली कळत गेली.वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या निमित्याने भारत भर यात्रा झाली.आणि माझं इवलसं अनुभव विश्व संपन्न झालं.या सर्वांमुळे माझं जीवन धन्य,कृतार्थ झालं या सर्वांचा मी ऋणी आहे.जीवनकार्य संपल्यावर ज्ञानदादांनी समाधी घेऊन आम्हाला मार्ग दाखवला त्या ज्ञानसूर्याची मी सावली,मूळ रुपाला सोडुन राहुच शकत नाही म्हणुन आपण सर्व मला अनुमती द्या.आज्ञा द्या.नकळत कांही चुकलं माकलं असेल तर लेकरुं समजुन पोटांत घाला.माझा पांडुरंग बोलावतोय, निरोप द्या आतां.


सोपानांचा चेहरा आगळ्या वेगळ्या तेजानं उजाळला होता.सगळ्यांनी त्यांच्या पायावर झोकुन दिले.नामदेवांनी इतकी घट्ट मिठी मारली की,जणूं ते सोपानांना जाऊच देणार नव्हते.काय नव्हतं त्या मिठीत?सोपानांना अडवण्या ची जिद्द,वियोगाचे दुःख,असाह्यता, विरहाची वेदना,इतक्या लहान वयातील स्थित प्रज्ञतेचं कौतुक,अलौकिक बुध्दी सामर्थ्यता,केललं वंदन,सहवास लाभला म्हणुन वाटलेली धन्यता ह्या सार्‍या भावना होत्या.जनाबाईंनी पुढे होऊन मिठी सोडवली.भानावर आलेल्या नामदेवांनी मोठ्या निग्रहाने अश्रू पुसुन गजर सुरु केला.रामकृष्णहरी,रामकृष्ण हरी,रामकृष्ण हरी….
भोजनाची सिध्दता झाली होती. पंगत बसली.नामदेवांना दिसले,विठ्ठल रुख्माई स्वतः वाढत होते.निृवृत्तीदादा व मुक्ताई सोपानांना भरवत होती.ज्ञानदेव! ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य! ज्ञानसूर्याचा अस्त झालाच होता,मग त्याची सावली तरी मागे कशी राहणार?


दादा!चलायच ना? भावसमाधीत मग्न असलेल्या निवृत्तीदादांच्या खांद्याला स्पर्श करत सोपान म्हणाले.निवृत्तींनी स्वतःला आवरुन सोपानाचा एक हात धरला व दुसरा मुक्ताईनं धरला.आणि नागेश्वर मंदिरामागे निश्चित केलेल्या समाधी स्थानाकडे तिघांचेही पावलं पडु लागले.
नामदेवांची चार मुलं म्हादा,विठा, नारा आणि गोंदा व आणखी कांही लोकां मिळून समाधीस्थान तयार केलं.धीमी पण ठाम,निश्चयी पावलं टाकत सोपान समाधीस्थळी जात होते.लोकं फुलं अक्षता उधळत होते,बायाबापडे पायावर लोटांगण घेत चरणधूळ मस्तकी लावत होते.समाधीस्थळ आलं.मुक्ताईच्या हाता तील पंचारतीचं तबक घेऊन गंध,अक्षता अधळुन आकाश,धरणी,नदी,सूर्य,वायुंना ओवाळुन पंचमहाभूतांची पूजा केली.

निवृत्तीदादांना गुरु म्हणुन ओवाळलं. पुजा केली.हात जोडुन म्हणाले,गुरु माऊली!तुम्ही माझं जीवन धन्य केलेत. आतां आज्ञा देऊन माझं संजीवन धन्य करा.परमात्म्यात विलिन होईपर्यंत धैर्य कायम राहिल असा आशिर्वाद द्या.धीर गंभीरतेचा मुखवटा गळून आवेगाने सोपानाला कवेत घेतलं.मस्तकावर अक्षतांचं प्रक्षेपणं केलं.आपली सारी ऊर्जा एकवटुन सोपानाच्या मस्तकात सोडली.सोपानांच्या चेहर्‍यावरील निश्चितता पाहुन निवृत्ती समाधान पावले. मुक्ता जणूं पुन्हा लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरली.त्या दोघांचं एकजीव असणं बघुन,नामदेव,जनाबाई, व मंडळीं च्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या.


सोपानांनी समुदायाला हात जोडुन मान झुकवुन नमस्कार केला. अखेरचा…अगदी अखेरचा….समाधी स्थानाला सामोरे झाले.निवृत्तीदादांनी सोपानाचा हात धरला.दुसरा हात नामदेवांनी.पायर्‍या उतरुन समाधी स्थानाजवळ आले.दोघांचीही नजरभेट घेऊन नजरेनेच निरोप घेतला.समाधी स्थानाला नमस्कार करुन,समाधीसाठी तयार केलेल्या आसनावर पद्मासन घालुन सोपान बसले.उच्चरवाने ओंकार नाद केला.सोपानांनी पद्मासन सोडुन वज्रासन घातलेलं बघुन निवृत्तीदादा व नामदेव जडशील पावलांनी हलकेच पायर्‍या चढुन वर आले.बाजुला ठेवलेली शिळा विवराच्या तोंडाशी लावली.ओकांर ध्वनी अजुनही निनादत होता.निवृत्ती दादांच्या कुशीत नामदेव व मुक्ता शिरली. त्यांना अश्रूंचेही भान राहिल नाही.


निवृत्तीदादा पुटपुटत होते.माझा सोपान,ज्ञानसूर्याची सावली असणारा माझा सोपान!ज्ञानसूर्याची सावली, ज्ञानसूर्यात विलिन झाली.या जगाच्या अंतापर्यंत तो ज्ञानसूर्य आपल्या तेजाने तळपणार होता.आणि त्याची सावली सुध्दा!होय! ज्ञानसूर्याची सावली सुध्दा!!!
समाप्त!!


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *