भाग – २६.
सर्व मंडळी उज्जैन,प्रयाग,द्वारका हस्तिनापूर, सगळीकडे जाऊन सर्व समावेशक अशा भागवत धर्माची पताका रोवुन परत आली.आळंदीला आल्यावर रोजचा दैनंदिन कार्यक्रम सुरु झाला.पण सोपान आतां आत्मध्यानांतच जास्त रमत होते.एक दिवस सोपानांनी एकटाक बसुन हरिपाठाचे अभंग पूर्ण केले.ते इतके तल्लीन झाले होते की,कधी निवृत्तीदादा येऊन त्यांनी लिहिलेली पानं वाचली कळलेही नाही.सोपानाचं सुंदर मोत्यासारखं अक्षर,सुस्पष्ट,नीटनेटकं नितळ वाचतां वाचतां निवृत्तींना भरुन आलं.सोपानदेवाचं सुरेख हस्ताक्षर नेमकी शब्दरचना,सखोल अर्थ आणि अन्वयार्थ म्हणजे पारमार्थिक निर्गुण अनुभूतीचे स्वाभाविक उद्गार होता तो. निवृत्ती नाथांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळु लागले.त्यांना समोर पाहुन सोपान संकोचले.त्यांनी लिहिलेले पान निवृत्ती दादा समोर धरलं त्यांत लिहिलं होतं….
“निवृत्ती सोपान।परिसा भागवत।
पंढरी निवांत। विठ्ठल गाती।।
धन्य तोचि नामा। ज्ञानदेव पाही ।
सनकादिक बाही। उभे देखा ।।
पुंडलिक भक्त। देव मुनी सर्व।
शुध्द चरणी भाव। अर्पिताती ।।
सोपान डीगर । आनंदे नाचत ।
प्रेमे ओवाळित । हरिच्या दासा ।।”
सोपानाचं मन आणि अभंग किती पिरदर्शी आहेत,हे कौतुक त्यांच्या डोळ्यात उमटलं.सोपानाच्या पाठीवरुन हात फिरवला तो स्पर्श त्यांना आई सारखा जाणवला.
आतां माधुकरी किंवा घरांतील कामे कमी झाल्यामुळे सोपानांना वेळ आणि एकांत मिळु लागला.मग एकांतात त्यांच मनन,चिंतन,वेद,उपनिषदं,शांडिल्यभक्ती सुत्र,मनुस्मृती,नारदसुत्र,चण्डीशतक,
तैत्तिरीयारण्यक,याज्ञवल्कस्मृती,रामायण महाभारत इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करुं लागले.न समजणार्या मुद्यांची चर्चा करुन निवृत्तीदादाकडुन समजावुन घेत व मग लिखाण सुरुं करत.विठ्ठलभक्तीचा, नामजपाचा महिमा,रामकृष्ण हरिचा जप जपामुळे मिळणारा मोक्ष याचं अत्यंत मार्मिक शब्दरचनेतुन विवेचन करत. त्याचं काहीही लिहुन झालं की,पहिला श्रोता मुक्ताई असे.मग ते लिखान निवृत्ती दादांना दाखविल्यावर त्यांचे कौतुकाचे बोल ऐकले,पाठ थोपटली की,सोपानांना बळ येत.आत्मविश्वासाला पाठबळ मिळायच.एक दिवस निवृत्तीनाथ,ज्ञानेशा मुक्ताईला सोपानांच्या स्वतंत्र विचारांची बैठक समजली.झालं असं की,ब्राम्हण समाजाचे कुलाचार आणि संस्काराबद्दल चर्चा सुरु होती.ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण.
म्हणुनच ब्रम्ह जाणण्यासाठी तशी मनोधारणा,मानसिक बैठक तयार होण्या साठी व्रतबंधनासारखे,उपनयन संस्कार ब्रम्हचर्याचं पालन होणं गरजेचं आहे,पण सोपानांना तितकसं पटलेलं नाही हे त्यांच्या चेहर्यावरुन दिसलंं म्हणुन निवृत्तीदादांनी विचार व्यक्त करण्यास सांगीतल्यावर, सोपान म्हणाले,ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण हे जरी सत्य असले तरी,फक्त ब्राम्हणकुळात जन्माला आला म्हणुन तो ब्रम्ह जाणेलच असं नाही.कुणी अंत्यज ब्रम्ह जाणुन घेऊ इच्छित असेल किंवा जाणत असेल तर,त्याचेवर उपनयनासारखे संस्कार व्हायलाच हवे अशी सक्ती,बंधनं नसावी.
भक्तीच्या अधिष्ठानावर समतेची संकल्पना उभी राहिली तर समाज अधिक सशक्त,निरोगी होईल असे विचार सोपानांनी नेमक्या व चपलखपणे मांडले हा विचार सिध्द होण्यासाठी…
“कर्माचे पेटार।किती वहावे शिरी।
लटके गा मुरारी । न जाय आझे ।।
घे कर्मसी दोरी । तुजची वाहिन ।
नित्यता सेविन । चरण तुझे ।।
न होता परीपूर्ण । बाधतसे बाधा ।
एक तू मुकुंदि । आम्हा पुरे ।।
सोपान म्हणे । कर्म ब्रम्र एक ।।
वेदाचा विवेक । ब्रम्ह एक ।।
पृथ्वी सोवळी । आकाश सोवळे ।।
मन हे ओवळे अभक्तांचे ।।
ब्रम्ह हे सोवळे । न देखो वोवळे ।
असो खेळेमेळे । इथे जनी।।
ब्रम्हांड पंढरी ।सोवळी ही खरी ।
तरसी निर्धारी । एक्या नामे ।।
सोपान अखंड । सोवळा प्रचंड ।
न बोले वितुंड । हरी वीणा ।।”
अशी चपलख अभंगरचना सोपानाने करुन दाखविली.त्यांची तिव्र प्रतिभा व बुध्दीमत्तेची झेप पुर्ण झाल्याचे पाहुन दोघे भाऊ व मुक्ता सुध्दा आवाक झालेत. हा धाकटा भाऊच नाही तर,बुध्धीमान व्यक्तीत्व आहे याची जाणीव झाली.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

[…] संत सोपानदेव चरित्र २६संत सोपानदेव चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव चरित्र २९संत सोपानदेव चरित्र ३० […]
[…] संत सोपानदेव चरित्र २६संत सोपानदेव चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव चरित्र २९संत सोपानदेव चरित्र ३० […]