संत सोपानदेव चरित्र ३८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ३८.

अनुक्रमणिका


नामाची घायाळ,विकल परिस्थिती बघुन,सोपानदेव म्हणाले,अहो काका! उत्पत्ती,स्थिती,लय हा तर सृष्टीचा नियम आहे.प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्याच पालन करावं लागतं.सागा बघु पांडुरंगाचा आदेश!ऐका मंडळी…ह्रदयाचा दगड आणि मनाचा कातळ करुन ऐका…
“देव म्हणे नामया।मार्गशीर्ष गाठ ।।
जावे सासवड।उत्सवासी।
सोपानासी आम्ही।दिधले वचन।
चला अवघे जण। समुदाय ।।” नामदेवांनी देवांचा आदेश सांंगीतला व चेहरा झाकुन घेतला.सर्वांच्या मनातील शंका शेवटी गोरोबाकाकांनी विचारलाच!
नामदेवांनी पांडुरंगाचा आदेश सांगीतला खरं,पण अर्थ मात्र कुणालाच कळला नाही.शेवटी सोपान म्हणाले,हा आदेश माझ्यासाठी आहे.मंडळी!मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवडला हा तुमचा सोपान समाधी घेणार आहे.

कडकडुन अंगावर वीज कोसळावी तसं सर्वांना झाला. सगळ्यांचंच भान हरपलं,जणुं स्मशान शांतता पसरली.जेव्हा भानावर आले, अर्थ कळला तेव्हा दुःख आवरेनासे झाले कांही गडबडा लोळु लागले.कांही मातीत डोक आपटुन घेऊन लागले.चोखोबा,
गोरोबाकाका,जनाबाई यांनी सोपानाकडे धाव घेऊन त्यांचे पाय पकडुन विनवणी करुं लागले.माऊलीच्या समाधीचा आघात नुकताच सोसला होता.ती जखम अजुन ओली होती,भरलेली नव्हती तोच हा दुसरा आघात.जनाबाई म्हणाली अरे सोपानकाका!पोरा तूं सुध्दा सोडुन जाणार?अरे!माऊली गेल्याचं दुःख कसं तरी सहन केलं,पण आता तूं पण?आईनं टाकल,बापानं मारल आणि पावसानं झोडलं तर कुणाला सांगायचय?आम्हाला पोरकं करुन जाणार?कुणी कुणाला सावरायचं हेच समजेनासे झाल!पण निवृत्तीदादा आणि मुक्ताई शांत,तटस्थ स्थितप्रज्ञ होते.सोपान नामदेवाना म्हणाले,काका! ज्ञानदादा समाधीस्त झाले तेव्हा तुम्हीच मला सावरले होते ना आतां तुम्हीच असे गलितात्र झालात तर, मला व या सगळ्यांना कोण धीर देणार?


माझं जीवित कार्य पुर्णत्वास गेल्यामुळे या नश्वर जीविताची इच्छा नाही.सासवड ला समाधी घेण्याची इच्छा आहे.काका! सासवडला प्रस्थान करण्याची तयारी करा.सोपानांचा प्रत्येक शब्द नामदेवांच्या ह्रदयावर घाव घालत होते.सोपानकाका ही माऊली प्रमाणे “निश्चयाचा महामेरु” आहेत हे जाणुन थरथरत्या,गहिवरल्या, रडवलेल्या आवाजात म्हणाले,माऊली समाधीस्त झाले तेव्हा मुक्ताईला सांभाळायला तुम्ही होते,आतां तिला कोण आवरणार?स्थितपूर्ण शब्दात सोपानकाका म्हणाले,मुक्ता तर कधीच मुक्त झालीय,अगदी ज्ञानदा समाधीस्त झाले तेव्हाच!ती फक्त माझ्या मुक्तीसाठी थांबलीय!काका!आतां तुम्हीच स्वतःला आवरा.सासवडला कर्‍हेचं पठार,कर्‍हेचं पाणी आमची प्रतिक्षा करतय.

नामदेवादी संत मंडळीना वंदन करुन ते निघुन गेले. या ईश्वरी अवतारांचा सहवास मिळाला म्हणुन स्वतःला सुदैवी समजावं की,यांना आपल्यालाच समाधीस्थानी न्यावं लागतं म्हणुन दुर्देवी? या प्रश्नाचं उत्तर नामदेव शोधत राहिले. सोपानकाका समानी घेणार ही वार्ता वार्‍यासारखी पंचक्रोशीत समजली आणि लोकांच्या जखमेची खपली पुन्हा निघाली.दुसर्‍या दिवशी अगदी पहाटे पासुनच सासवडच्या रस्त्यावरुन माणसांचे लोंढेच्या लोंढे चालले होते. त्यांच्या तोंडी माऊलीचे अभंग,सोपान काकांचे हरिपाठ,रामकृष्णाचा जप होता. टाळ मृदुंगाच्या गजरांत अवघा आसमंत निनादत होता.सोपानकाकांचा समाधी सोहळा याचि देही याचि डोळा बघण्या साठी अवघी सृष्टी सासवडला धाव घेत होती.नामदेवांनी रात्रीच त्यांची मुलं नारा, विठा,म्हादा व दहा माणसं समाधीस्थाना ची व्यवस्थेसाठी पुढे पाठविले होते.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *