सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

551-13
म्हणौनि समर्थेंसीं वैर । जया पडिलें हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजून असे ॥551॥
म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो.
552-13
नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी । तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना ॥552॥
अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याचे अगोदरच तो पुढे येणार्‍या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो.
553-13
पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥553॥
अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो.
554-13
तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्युचें । निमालें शल्य ॥554॥
अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यू हे काट्यासारखे सलत रहातात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते.
555-13
आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥555॥
जरा = आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणार्‍या म्हातारपणाबद्दल विचार करतो.

556-13
म्हणे आजिच्या अवसरीं । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥556॥
तो म्हणतो, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल.
557-13
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥557॥
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे.
558-13
फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा । तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥558॥
फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल.
559-13
वोढाळाच्या खुरीं । आखरु आतें बुरी । ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा ॥559॥
ओढाळ गुरांच्या खुरांनी जसी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते (म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही) त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल.
560-13
पद्मदळेंसी इसाळे । भांडताति जे हे डोळे । ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥560॥
कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील.

561-13
भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळें । आंसुवाचेनि ॥561॥
भुवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल.
562-13
जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरडे । तैसें पिचडीं तोंड । सरकटिजैल ॥562॥
ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरडा गिरबिडून टाकतात, सरड खोडावरुन खालीवर जात राहतो त्यामुळे डिंक पायाला लागून खोड गुळगुळीत होते त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल.
563-13
रांधवणी चुलीपुढें । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती ॥563॥
स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी साचून) जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील.
564-13
तांबुलें वोंठ राऊं । हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । बोल जेणें ॥564॥
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने (तारुण्यावस्थेत रंगवतो) व ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो,
565-13
तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसहित ॥565॥
त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील.

566-13
कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं । तैसी नुठी कांहीं केली । जीभचि हे ॥566॥
शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने (झडीच्या पावसाने) जशी एकदा गुरे बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठत नाही.
567-13
कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं । तैसा आपत्य तोंडीं । दाढियेसी ॥567॥
माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्‍याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते.
568-13
आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें । तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥568॥
आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वहातील.
569-13
वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥569॥
वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य रहाणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हातार्‍या माकडासारखे बेडौल होईल.
570-13
तृणाचें बुझवणें । आंदोळे वारेनगुणें । तैसें येईल कांपणें । सर्वांगासी ॥570॥
गवताचे बुजगावणे जसे वार्‍याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगात कापरे भरेल.

571-13
पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी । बरवेपणा बागडी । नाचविजैल ॥571॥
पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल. म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल.
572-13
मळमूत्रद्वारें । होऊनि ठाकती खोंकरें । नवसियें होती इतरें । माझियां निधनीं ॥572॥
मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील.
573-13
देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु । सोइरियां उबगु । येईल माझा ॥573॥
अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्‍या-धायर्‍या लोकांना माझा कंटाळा येईल.
574-13
स्त्रियां म्हणती विवसी । बाळें जाती मूर्छी । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥574॥
बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिऊन मूर्च्छित होतील. फार काय सांगावे? मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन.
575-13
उभळीचा उजगरा । सेजारियां साइलिया घरा । शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांतें हा ॥575॥
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्‍या जागरणामुळे, हा म्हातारा पुष्कळांना शिणवील’ असे ते म्हणतील.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading