संत सोपानदेव चरित्र ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ४०.

अनुक्रमणिका


या तिघांना बोलावण्यासाठी झोपडी च्या दाराशी आलेल्या नामदेवांनी घडलेला हा सारा प्रसंग डोळ्यांनी बघीतला आणि कानाने ऐकला तरीही आपण प्रत्यक्षात पाहतोय की, स्वप्नात?ही चार भावंड या भूतलावरची आहेत की नाही याबद्दल त्यांना नेहमीच शंका वाटायची.
घराच्या अंगणांत पुष्कळ मंडळी जमली होती.तिघंही बाहेर येताच जमलेल्या मंडळींनी सोपानांचा जयजय कार केला.त्या सगळ्यांना हात जोडुन नमस्कार केला.शेवटचे आश्रयगृहाला वंदन केले आणि ठामपणे पावलं उचलली.सगळीच निघाली सासवडला. नामदेवांनी डोळे पुसले.आणि मुखातून निघाले.
“आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे ।
नाममार्गे वळगे निघे राया ।।
नाम परब्रम्ह नाम परब्रम्ह ।
नित्य रामनाम जपीजेसू !!
अंतरिच्यामुखे बाहिरीलिया वेखें ।
परब्रम्ह सुखे जप तुझे ।।
सोपान निवांत रामनाम मुखांत ।
नेणे दुजी मात हरिवीण ।।


रामकृष्णाच्या गजरांत सगळेच गात होते. वेदना मांडत होते,नामदेव हे सगळं मुक पणे पाहत होते,ऐकत होते.पुढे निवृत्तीदा, सोपान,मुक्ताई चालत होते.नामदेवांना आठवलं,सोपान-मुक्ताईंचं गुळपीठ.मुक्ता म्हणायची…तात आणि माति।गेलात येथुन।तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा।
निवृत्ती ज्ञानेश्वर।कोरान्नांचे अन्न
सांभाळी सोपान । मजलागी ।।
वाटेत लोकं या तिघांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी गर्दी करत होते, धडपडत होतेे.सोपानकाकांसोबत गोरोबा,सावता,सेना!जनाबाई,चोखोबा, परीसा,नामदेव अशी अनेक संत मंडळी होती.नामदेवांनी सासवडसंबंधी दृष्टांत झाल्याचे सांगीतल्यावर सगळ्याच्याच मनात एकच प्रश्न आला की,समाधीसाठी सासवडच कां?शेवटी गोरोबांनी विचारल्यावर नामदेव बोलण्याआधीच मुक्ता म्हणाली,सगळ्यांनाच या प्रश्नाचे उत्तर सासवडला पोहोचल्यावर मिळेल. सर्व मंडळी दिवस कलेस्तोवर सासवडला पोहोचली.
आळंदीला इंद्रायणीचा आशिर्वाद तर,सासवडला कर्‍हा नदीचा.जणूं आळंदीला गंगा तर सासवडला सरस्वती.
एरवी शांत असलेल हे छोटसं गांव आज मात्र गजबजलं होतं.सासवडला नदीच्या काठी असलेल्या श्रीनागेश्वर मंदिराच्या पाठीमागची जागा समाधीस्थळ म्हणुन निश्चित केले होते.


दुसरा दिवस उजाडलाच मुळी गजराच्या प्रतिध्वनीनं!समुदाया समोर सोपानकाका नतमस्तक होऊन,हात जोडुन उभे होते.निवृत्तींनी “सोपानदेवी” ग्रथ उचलुन मस्तकी लावला आणि मुक्ता च्या हाती दिला.आणि समूहाला संबोधीत झाले…आज माझी अवस्था नेत्रहीन व्यक्तीसारखी झाली आहे,ज्याचा एक नेत्र तर आधीच गेलेला,आणि दुसरा जाण्याच्या मार्गावर आहे.


सासवड मोठं पुण्यश्र्लोक स्थान आहे.भोगवतीसारखी सरीता आणि कर्‍हा सारखी सरस्वती इथे वाहते आहे. श्रीविष्णुंच्या आज्ञेवरुन,सृष्टीनिर्मितीचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणुन ब्रम्हदेवांनी इथे तपश्चर्या करीत असतां,ब्रम्हदेवाचा कर्‍हा म्हणजे कलश धक्का लागुन लवंडला, त्यातलं सांडलेलं जलतीर्थ म्हणजेच ही कर्‍हा नदी!मंडळी,हा सोपान ब्रम्हदेवांचा अवतार आहे हे त्यानं आपल्या शांत संयमी स्वभावाने आणि अलौकिक बुध्दी मत्तेने सिध्दही केलंं आहे.म्हणुनच जिथं ब्रम्हदेवांनी तप केलं तिथंच सोपानदेव समाधी घेणार आहे.


सासवड म्हणजे सात वाड्यांनी मिळुन बनलेलं नगर!त्यात एक संवत्सर म्हणुन एक मोठी वाडी होती.म्हणुन याचं नांव संवत्सर नगर असही आहे.या नगरी ला इंद्रनील पर्वत म्हणजे राम-रावण युध्दात लक्ष्मणाला मुर्च्छा आल्यावर, हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलुन आणत असतांना त्या पर्वताचा एक भाग निखळुन इथं पडला,तोच हा इंद्रनील पर्वत!या इंद्रनील पर्वतावरच्या गर्द वनराईत इंद्राने म्हणजे पुरंदरांनही तप केलं होतं म्हणुन तो पुरंदर पर्वत म्हणुनही ओळखल्या जातो.म्हणुन सोपान इथं समाधी घेत आहे.सासवड हे मुळचं पुण्य क्षेत्र,आतां ते तिर्थक्षेत्र होणार!समाधी साठी सासवडच कां?या प्रश्नाचे उत्तर लोकांना मिळाले होते.निवृत्तीनाथांचं बोलणं संपल्यावर त्यांनी सोपानाकडे बघीतलं त्यांच्या नजरेतला आदेश जाणुन सोपान समुदायाला हात जोडुन मस्तक झुकवुन वंदन करुन बोलायला सुरुवात केली.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *