संत सोपानदेव चरित्र ३५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ३५.

अनुक्रमणिका


दुसर्‍या दिवशीचा सूर्य उदासपणे उगवला.ज्ञानदादा आपल्यात नाही हा विचारच सहन होत नव्हता.पण निवृत्तींना सावरावेच लागले.योगाभ्यास झाला,पण घरांत सोपान,मुक्ताची चाहुल लागेना म्हणुन त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.अनेक आशंका मनात आल्या. ज्ञानेशांनी घेतलेल्या संजीवन समाधी नंतर मनाला झालेले दुःख,यातना, काळजाला पडलेली भेग,ह्रदयाच्या झालेल्या चिंध्या,मोठ्या भावाआधी धाकट्याने आषुष्य संपवल्याने झालेले क्लेश आणि ज्ञानेशाच्या समाधीमुळे सैरभैर झालेल्या लोकसागराला आवरण्यासाठी करावी लागलेली धडपड या सगळ्यांचा तान असह्य होऊन एक प्रकारची त्यांना ग्लानी आली होती.

तेवढ्या वेळांत ही मनाने कोलमडलेली पोरं कुठ गेली असेल?कांही भलत सलत तर केलं नसेल ना?अशाच सैरभैर अवस्थेत आर्त आवाजांत त्यांनी नामदेवां ना हाक मारली.नामयाss ही पोरं कुठंच दिसत नाही रेss कुठे गेली असतील? समाधीनंतर खंबीरपणे सावरणार्‍या निवृत्तींची विकल अवस्था बघुन,नामदेव त्यांच्या हाताला धरुन सर्वीकडे शोधुनही न दिसल्याने ते ज्ञानेशांच्या समाधीस्थळी आलेत.त्या परिसरांतील निरव शांततेत त्यांना बारीकसा आवाज कानांवर पडला आवाजाच्या रोखाने गेल्यावर अजान वृक्षाच्या पाठीमागे सोपान-मुक्ता रडत रडत कुणाशी तरी बोलतांना दिसले.


सोपान बोलत होते,अरे ज्ञानदादा! संजीवनी समाधी घेऊन तूं परमार्थाचं सर्वौच्च शिखर गाठलस,पण आम्ही पांगळे झालो,पाय गेले म्हणुन नव्हे तर, वाटा संपल्या म्हणुन!सोपानांनी घुसमटुन हुंदका दिला तोच मुक्ता म्हणाली,आई बाबा म्हणजे काय? हे कळायच्या आधी ते सोडुन गेले,पण तुम्हा तिघांमुळे उणीव कधी भासली नाही.जिथं मायेचं प्राणतत्व ममतेची ऊर्जा नाही अशी निर्वात पोकळी म्हणजे पायाखाली जमीन नाही.आज आम्ही खरे निराधार,पोरके झालो.पोरके!
दोघांचे बोलणे ऐकुन निवृत्ती धावतच दोघांजवळ जाऊन त्यांना मिठीत घेत म्हणाले,अरे! माझा आधार नाहीसा झाला म्हणुन काय झाले?मी तुमचा आधार नाही कां?चला बाळांनो घरी चला घरी चला…


निवृत्तीदांच्या आश्वासक स्पर्शाने दोघांचाही बांध फुटला आणि आणखीन रडुं कोसळले.रडत रडत मुक्ता म्हणाली, दादा आम्ही ज्ञानदादाला खूप विनवलं, हट्ट धरला,पण तो आला नाही तो नाहीच आला रेss !तिचे डोळे पुसत निवृत्तीदादा म्हणाले,मुक्ते! समाधीस्त झालेला ज्ञानेशा परत या मर्त्य लोकांत प्रवेश करेल असं तुला वाटलच कस?आणि समजा तो परतलाच तर प्राणभयानं आला,हे तुला चालेल?सोपाना-मुक्ता! संजीवनी समाधी घेऊन परमार्थाचं शिखर ज्यानं गाठलं, तो ज्ञानदेव पुन्हा या ऐहिक मार्गात परतलेला चालेल तुम्हाला?नाही ना? तेव्हा त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करुं नका.उलट त्याची पारमार्थिक वाटचाल सुखनैव व्हावी म्हणुन स्वतःला आवरा,सावरा. तुमचा ज्ञानदा आत्मानुभवी होता.म्हणुन त्यानं भक्तीतील प्रेमसुखाचा,मुक्तितील आत्मसुखाचा आणि समाधीतल्या संजीवकाचा अनुभव घेतलाय.तेव्हा आतां दुःख आवरा.ज्ञानेश्वराचे सहानुभवी व्हा आणि घरी चला.


ज्ञानदादाच्या वियोगानं काळजात उठलेला दाह,मनांत उसळलेला आगीचा डोंब,ह्रदयाला जाळणारा लाव्हा,निवृत्ती दादांच्या शीतल शब्दांच्या सिंचनाने शांत झाले.सोपान-मुक्तानं मोठ्या निग्रहाने डोळे पुसले आणि दृढनिश्चयाने घराकडे निघाले.नामदेवांच्या मनांत आले,ही पोरं मोठी झाली की, पोरकी झाली?
त्यानंतर मात्र सोपान-मुक्तानं डोळ्यातून पाणी काढलं नाही,पण हसूही उमटले नाही.सोपान आधीच कांहीसे अबोल,शांत,संयमी,आतां तर ते आणखी अबोल झाले.सोपान-मुक्ताई एकमेकांशी खोटे खोटे मुखवटे घातुन जपतांना बघून एवढे खंबीर निवृत्तींना मात्र गलबलुन यायचं!ज्ञानदादाला समाधी घेऊन आठ दिवस झाले पण दुःख तसुभरही कमी झाले नाही.


नामदेवादी संतमंडळी रोज येत,विषय ज्ञानदादाचाच असायचा.त्यांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,चांगदेव पासष्टी यावर रोज चर्चा होत असे.ज्ञानदादा किती व्यापक ठसा उमटवुन गेले याची पदोपदी नव्हे क्षणोक्षणी जाणीव व्हायची.सर्व निघुन गेले की, सारं रिकामं रिकामं वाटायच, घर खायला उठायच!


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *