भाग – २७.
सोपानांची प्रतिभा पोर्णिमेच्या चंद्रासारखी तेजस्वी आणि पूर्णरुप झाली होती.सतत स्वतःला विकसित,स्वतःच ज्ञान परिपूर्ण करण्याचा प्रयत्न,एकलव्या प्रमाणे स्वतःच स्वतः शिकुन ज्ञान संपादन करण्याची त्यांची धडपड पाहुन निवृत्तींना कौतुक वाटले.सोपानाचं अध्ययन चालु होतं.ज्ञानदादानं तर समाजच्या उध्दारासाठी वाहुन घेतलं. त्यांची ‘ज्ञानेश्वरी’ लिहुन झाल्यावर, निवृत्तीदादांच्या आदेशानुसार “अमृतानुभव” लिहिला.हा ही ग्रंथ त्यांच्या अलौकिक बुध्दी वैभवाची आणि दैवदुर्लभ प्रतिभेची साक्ष होती.सोपानांच ही ज्ञानेश्वरी वाचन सुरु असतांना त्यांच्या मनांत कांही शंका निर्माण झाल्यात आणि त्या शंकेला तोंड फोडलं चोखा मेळांनी.सोपान ज्ञानेश्वरी वाचुन अर्थ सांगत होते.चोखोबा,सावतामाळी,जना बाई, त्यांच्या भोवती बसले होते.ज्ञानेशा निृवत्तीदादा व नामदेव बाहेर गेले होते.
चोखोबा म्हणाले!देवा!ज्ञानेश्वरी तुम्ही वाचुन अर्थ सांगतां म्हणुन आम्हाला समजते.पण ज्ञानोबा माऊलीची भाषा वैभव एवढं मोठ आहे की,वाचतांना डोळे दिपून जातात नुसती वाचुन कोणालाच समजत नाही.त्यावेळी सोपान कांही बोलले नाही,पण निवृत्तीदादांशी चर्चा करुन कांहीतरी करावं असं मनी पक्क केलं
एक दिवस सोपानांनी धीर धरुन
निवृत्तीदादांना म्हणाले,दादा! ज्ञानदादांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यापुर्वी…
“माझी मराठीची ये बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। असं वचन श्रोतृवृदांना दिलं आणि ते राखलही ज्ञानदादाची मराठी भाषा अमृतालाही जिंकेल,अमृताची अविट माधुरी, चिरंजिवित्व,शुध्दत्व आहे पण दादा!त्याच बरोबर अमृताची अप्राप्यताही आहे दादा!ज्ञानेश्वरीची मराठी म्हणजे, ज्ञान दादाच्या प्रतिभेचा,अभिजात मराठी भाषेचा शुध्द बावणकशी,चोख अविष्कार आहे,पण दादा! या मराठी भाषेचं रुप प्राकृत आहे.नागरी बोलणार्यांना वा समजणार्यांना ही भाषा समजणं कठीण जातय.ज्ञानेश्वरी तील ज्ञान अगाध,विशुध्द,पण प्राकृतात असल्यामुळे सर्वसामान्य मानसाला,बहु जन समाजाला समजायला कांहीसं दुर्बोध आहे,आकलनापलिकडे आहे.
म्हणुन सामान्य जनांना अधिक जवळचं सुलभ,सोयीचं वाटेल अश्या सोप्या भाषेत लिहिले तर सामान्य जनता आनंद उपभोगु शकतील.नपेक्षा सर्वसामान्य नागरी जनांच्या हातात ज्ञानेश्वरी देणं म्हणजे अनभिज्ञ असलेल्या अभिमन्युला चक्रव्युहाचा भेद करायला पाठवण्या सारखं आहे.दादा!सामान्य जनांना समजेल अशी सोपी सुलभ भगवद् गीता पर करतां आली तर नागर जनांत ती अधिक भावेल,सोपी सुलभ वाटेल ना?
सोपांनांनी आपले म्हणने इतके मुद्देसूद, उत्तम विश्लेषण,सुसंगतपणे सांगीतल्या वर निवृत्तीदादांना पटले व आनंदही झाला.ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी व अमृतानुभवचं इतकं लिखान झाल्यावर त्यांना परत लिहायला सांगणं योग्य नाही हे जाणुन निवृत्तीदादा सोपानांना म्हणाले तुला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे शिवाय अर्थ व अन्वयर्थही जाणतोस,तर तूंच कां करत नाहीस?
दादा जमेल मला?सोपानांचा आर्त स्वर,विचारण्यांतील प्राणाणिकपणा, निवृत्तीदादांच्या मनाला स्पर्शुन गेला!नव्हे तूंच लिहावसं अशी माझी इच्छा आहे सोपानाss!तूं नामस्तोस्र,हरीपाठाचे अंभग रचलेस,आतां असं कांही तरी तुझ्या हातुन घडुं दे की,तुझं नांव चिरंजीव होईल.तूं श्रीमद् भगवद् गीतेवर तुझ्या सोप्या,सुलभ शब्दांत टीका लिहावीस अशी माझी इच्छा आहे.ठीक आहे दादा!ज्ञानदादा इतकी अलौकीक बुध्दीमत्ता,अभिजात प्रतिभा नाही माझे कडे,पण तुमच्या आशिर्वादाने मी जरुर प्रयत्न करीन
.त्यासाठी आई बाबांची जीथे पर्णकुटी आहे त्या सिध्दबेटावर एकांतात जाऊन राहुं इच्छितो.तेवढ्यात आंत आलेले ज्ञानदादा म्हणाले,मलाही तिथे जाण्याचा मोह होतो.पण माझे अजुन कार्य अपुर्ण आहे.मुक्ता मात्र वेगळं म्हणाली,सोपानदादा तिथे तुला आई भेटेल,तीला सांग,मुक्ता आतां सर्वच बाबतीत तरबेज झाली.निवृत्तीदादा,ज्ञान दादांच्या पायांवर मस्तक ठेवले,मुक्ताईचा निरोप घेऊन सिध्दबेटावर जाण्यास निघाले.सन्यासानंतर परत गृहस्थाश्रम स्विकारल्यावर जिथे आईबाबांचा संसार फुलला,त्या आळंदीपासुन जवळच असलेल्या या रमणीय सिध्दबेटावर सोपान पोहोचले.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

[…] सोपानदेव चरित्र २६संत सोपानदेव चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव […]
[…] सोपानदेव चरित्र २६संत सोपानदेव चरित्र २७संत सोपानदेव चरित्र २८संत सोपानदेव […]