संत ज्ञानेश्वर म. चरित्र ९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-९.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

ह्या विद्वत् महान शास्रीमंडळी समोर जाऊन या चार लेकरांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्या कोवळ्या,कोमल बालकांना पाहुन शास्रीमंडळींना मोठं नवल व कौतुक वाटले. ज्ञानोबाचं रुप कसं होत, तर त्यांनीच स्वतःचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात केलेलं आहे.

तो कनकचंपकाचा कळा। कीं  अमृताचा पुतळा। नानि रासिन्नला गळा। कोवळीकाचा।। हां हो जे शारदियाचे बोले। चंद्रबिंब पाल्हेलें। का तेजाची मुर्त बैसलें। आसनावरी।।  अशी ती चार रुपडी नमस्कार करतांना पाहुन धर्माधिकारींनी काय हवं म्हणुन विचारले असतां, आळंदीहुन आणलेले पत्र त्यांच्या हातात दिले. इतर मंडळींनीही पत्र वाचल्यावर, एवढी देखणी मुलं अन् सन्याशाची! म्हणुन गोंधळात पडली.

भानावर येऊन शेवटी धर्माधिकारी त्या भावंडांना म्हणाले, हा प्रश्न आमच्यासाठी नविन आहे, आजवर असं कधी घडलं नाही म्हणुन पैठणमधले विद्वान शास्री गोळा करुन विचारविमर्श करण्यासाठी हा प्रश्न सभेसमोर ठेवावा लागेल. बातमी सबंध पैठणभर पसरली. दुसर्‍या दिवशी सभा भरली. धर्माधिकारी, झाडुन सारे पैठणकर शास्री, पंडीत समेला उपस्थीत झालेत. आणि या सन्यास्यांच्या चार मुलांना बघायला चिक्कार गर्दी झाली. कुणी त्यांना पहायला, कुणी त्यांची थट्टा, टिंगल, शिव्या द्यायला जमा झालेत. अन्  ही चारही भावंड सभेसमोर येऊन हजर झालीत.

यांनी आणलेलं पत्र धर्माधिकार्‍यांनी सगळ्या सभेला वाचुन दाखविले. झालं! पोथ्यांचे बंद सुटले. ग्रंथांची पाणं फडफडायला लागली, सगळ्या स्मृती धुंडाळुन निघाल्यात. पण मार्ग कांही सांपडेना! शेवटी धर्माधिकार्‍यांनी मुलांना सांगीतले की, आम्ही सर्व शास्र शोधली पण तुमच्यासाठी कांही मार्ग सांपडला नाही.म्हणुन तुमची मुंज करतां येत नाही. तुम्ही देवाची मनोभावे भक्ती करावी.

सचोटीने वागावे, भजन किर्तन करुन समाजाचे प्रबोधन करावे. सगळ्यांच्या ठीकाणी समभाव ठेवावा.हे ऐकुन चौघाही भावंडांना खुप आनंद झाला. पण टवाळखोरांना इतका सरळसरळ लागलेला निकाल कांही आवडला नाही.त्यांना विशेष कांहीतरी खरबरीत, विपरीत बोलाचाली अपेक्षित होती. कांहीच न घडतां सहजा सहजी मिटलेलं प्रकरण त्यांना कसं बरं पचनी पडेल? काहीतरी खुसपट काढुन या मुलांना हैराण करावं, त्रास द्यावा असा त्यांचा विचार सुरु होता, तोच ज्ञान्या नावाचा पखालीचा रेडा येतांना टवाळखोरांना दिसला. त्यातला एकजन म्हणाला या दोघांचे नांव एकच आहे, दोघेही भाऊच की जणुं!

ज्ञानोबानं ऐकलं मात्र, तसा तो तेजाचा पुतळा तेजाळत म्हणाला, या रेड्यातील चैतन्य आणि माझ्यातील चैतन्य सर्वात्मक दोन्ही एकच आहे. तो निंदक उठुन पखालवाल्याच्य हातातला आसुड घेतला अन् रेड्याच्या पाठीवर सटासट तडाखे मारायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! प्रत्येक तडाखा रेड्याच्या पाठीवर अन् तांबडा निळा  ऊठावदार वळ ज्ञानोबाच्या पाठीवर! ज्ञानोबाची पाठ सगळी फुलुन निघाली. मग मात्र निंदक हादरले. तरी एकजण धीर धरुन चाचरत म्हणालाच,

हा जादुटोणा, विद्या असुं शकते. तुम्हा दोघांच चैतन्य ऐकच आहे ना, तर तु या रेड्याच्या मुखातुन वेदमंत्र वदवुन दाखवं! ज्ञानोबांनी हसत हसत आव्हान स्विकारले. ज्ञानोबा रेड्याजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवुन म्हणाले,या भूदेवाची तुला आज्ञा आहे. तूं रुग्वेद आणिं ओंकार म्हणुन दाखव. आणि अद्भुत घडलं! अत्यंत स्वच्छ, स्पष्ट स्वरांसहित वेदमंत्रांचा घोष रेड्याच्या मुखातुन सुरु झाला, ॐ अग्निमीळे पुरोहितम्। यज्ञस्य देवमृतविजम्। होतारम् रत्नघातमम्।। हे अद्भुत आश्चर्य पाहुन सर्व पंडीत शास्री पटापट ज्ञानोबांच्या पायी कोसळले. निंदकांनी स्वतःच्या तोंडात मारुन घेतले. सज्जनांना आनंद झाला. एकनाथांनी म्हटलंच आहे…… रेड्यामुखीं वेद बोलविला। गर्व द्विजांचा हरविला। शांतीरुपे प्रगटला ज्ञानोबा माझा।।

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *