सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २६ ते ५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

26-16
जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं? ॥ 26 ॥
पाहू गेले तर, भृगूनें केवढा अपराध केला? पण त्याने केलेला लत्ताप्रहार हा गुरुप्रसादच समजून, भगवंतांनीं संतुष्ट होऊन तें प्रसादचिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. 26
27-16
कीं आंधारें खतेलें अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणें तयातें पऱ्हा सर । म्हणितलें काई? ॥ 27 ॥
किंवा अंधकारानें गच्च भरलेले व्योम सूर्यासमोर आले असतां, त्याने, तू असें मजसमोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय? 27
28-16
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे । तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी ॥ 28 ॥
तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुला करु गेलो त्याची श्रीगुरो, मला क्षमा असावी. 28
29-16
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी । जें उपसाहिलें तयासी । तें आम्हांही करीं ॥ 29 ॥
(तू ध्यानाचा विषय नसतां) ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदांदिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, तें आपण जसे सहन केले, तीच दृष्टि माझ्याबद्दलही असावी. 29
30-16
परी मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलों अपराधु न गणीं । भलतें करीं परी अर्धधणीं । नुठी कदा ॥ 30 ॥
परंतु, तुमचे अखंड गुणगान करावें ह्याची मला अत्यंत हौस वाटते किंवा ही मला खोडच लागली आहे; म्हणून, तो अपराध असे गणू नये; आपण काय वाटेल तें करा; मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावांचून येथून हालणार नाही. 30

31-16
मियां गीता येणें नांवें । तुझें पसायामृत सुहावें । वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलों दैवें ॥ 31 ॥
मी, गीतानामक आपले प्रसादामृत सेवू लागलों तों, मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले. 31
32-16
माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प । तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ॥ 32 ॥
हे प्रभो, मला वाटतें अनंत कल्प माझ्या वाणीला सत्यभाषणाचे तपाचरण घडले आहे. त्याचेच फल म्हणून मला ह्या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. 32
33-16
पुण्यें पोशिलीं असाधरणें । तियें तुझें गुण वानणें । देऊनि मज उत्तीर्णें । जालीं आजी ॥ 33 ॥
मी आजवर असामान्य पुण्याई संपादन केली त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे. 33
34-16
जी जीवित्वाच्या आडवीं । आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥ 34 ॥
देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यांत गुंतून जन्ममृत्युच्या कचाट्यात आड्कलों होतों, ती माझी अवदशा, माझी जीवदशाच आज संपल्यामुळे, सर्व नष्ट झाली आहे. 34
35-16
जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हांजोगी । वानावया जाली ॥ 35 ॥
जी गीता ह्या नांवाने ख्यातनाम्नी (प्रसिद्ध) असून अविवेचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्हीं वर्णन करणच योग्य होय. 35

36-16
पैं निर्धना घरीं वानिवसें । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई? ॥ 36
कल्पना करा, कीं दरिद्रयाच्या घरी महालक्षमीने एकाएक प्रवेश केला तरीही त्याला मग दरिद्री म्हणतां येईल काय? 36
37-16
कां अंधकाराचिया ठाया । दैवें सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे? ॥ 37 ॥
किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थली दैववशात् सूर्य पातला, तर तो अंधकारच ह्या जगाला प्रकाशरूप होत नाही काय? 37
38-16
जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई? ॥ 38 ॥
ज्या परमात्मस्वरूपाचे महिमान पाहू गेले असतां विश्वाला परमाणुइतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाहीं तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाहीं? अगर होणार नाहीं? 38
39-16
तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थें तुवां शिरयाणी । फेडिली ते ॥ 39 ॥
त्याप्रमाणे मी टीका व्याख्यान करावें, ही वस्तुतः आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट होय; परंतु आपणा समर्थाच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली. 39
40-16
म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें । निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ 40 ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल आर्थाप्रमाणे विवरण करीन. 40

41-16
तरी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥ 41 ॥
देवांनी, पंधराव्या अध्यायात अर्जुनाला सकलशास्त्र-सिद्धांत कथन केला आहे. 41
42-16
जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा । सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ॥ 42 ॥
उत्तम वैद्याने अंगांत मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी त्याप्रमाणे ब्रह्म बस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादि अनिर्वचनीय माया ह्या उपाधीच्या संबंधानें, ही त्रैलोक्यरचना कीशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले.42
43-16
आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥ 43 ॥
आणि कूटस्थ (मायारूप उपाधि ज्याला आहे असा) अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहितचैतन्याचेही वर्णन केले. 43
44-16
पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष । दाविलें चोख । आत्मतत्त्व ॥ 44 ॥
नतर उत्तमपुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्तानें केवल शुद्ध जें आत्मतत्त्व (ब्रह्म) त्याचे स्पष्टीकरण केलें 44
45-16
आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट । ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला ॥ 45 ॥
व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान याचेही कथन केले. 45

46-16
म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं । आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ॥ 46 ॥
म्हणून ह्या अध्यायांत निरूपण करण्यासारखे कांहीं उरले नाही, परंतु गुरुशिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू. 46
47-16
एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥ 47 ॥
याप्रमाणे पंधराव्या अध्यायाने अनेक बुद्धिमंताची योग्य समज पडली तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही. 47
48-16
त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥ 48 ॥
असा जो मी “पुरुषोत्तम” त्या माझे वर्म जाणून जो ज्ञानद्वारा मल भेटतो (मद्रूप होतो) तोच सर्वज्ञ होय व त्याची मजविषयींची भक्ति हीच सीमेची (कडेची) भक्ति होय.48
49-16
ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें । तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें ॥ 49 ॥
असें जें त्रैलोक्यनाथ भगवंतांनीं पंधराव्या अध्यायाच्या शेवटीं संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायःज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे. 49
50-16
भरूनि प्रपंचाचा घोंटु । कीजे देखतांचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा ॥ 50 ॥
प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होतांच, द्रष्टयाला दृश्यही आत्मस्वरूपानें दिसू लागते (सर्वात्मभाव होतो) व त्यायोगे जीवाला ब्रह्मात्मभाव येऊन तो आनंदसाम्राज्याचा स्वामी होतो. 50

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading