सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४१ ते ४५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ४१ ते ४५

जैसी का समीरे सकट गति । का सोनया सकट कांती । तैसी शिवेसी शक्ती । आघविचि जे।। ओ 41

अर्थ — वारा आणि गती, सुवर्ण आणि कांती त्याची चमक हे जसे एकच आहे त्याच प्रमाणे शीव आणि शक्ती एकच आहेत. त्यांना अलग करणे शक्य नाही.

शब्दार्थ समीरे = वारा, सोनया = सोने, सकट = एकत्र

विवेचन — हवा वाहू लागली की आपण त्यास वारा म्हणतो. वारा म्हणजेच गती हवेला गती नसेल तर आपण त्यास वारा म्हणत नाही. कारण वारा व गती हे एकत्र येतात तेंव्हाच त्यास वारा म्हणतात. तसेच सोन्याचे आहे सुवर्ण म्हंटले की त्याची चमक सुद्धा त्याचे सोबत येते . किंबहुना जी चमक सोन्यात आहे त्यामुळे सोन्यास किंमत आहे. सोन्याची चमक सोन्यापासून दूर करता येत नाही. सोन्याची ओळखच मुळी त्याची प्रभा, त्याची चमक, त्याची झळाळी आहे. सोने धुळीत पडले तरी ते चमकणार आणि सुंदर कुपीत ठेवले तरीही चमकणार. कारण सोने व त्याची चमक हे एकच आहे. वारा आणि गती, सोने आणि चमक एकमेकांपासून अलग,

वेगळे करणे अशक्य आहे. ते एकच आहेत. तद्वत शिव आणि शक्ती यांना वेगळे करता येत नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. नाण्याला दोन बाजू असतात एक काटा आणि दुसरा छापा. आपण नाणं हातात घेतले तर त्याची एक बाजू दिसली तरी दुसरी बाजू सुद्धा आपल्या हाती येतेच. फक्त काटा किंवा फक्त छापा हातात घेता येत नाही. जीव सृष्टीचे अस्तित्व हे असेच आहे देह शिव आणि प्राण चैतन्य हे एकच आहेत इतके ते एकरूप झाले आहेत. पण सामान्य जिवाच्या हे लक्षांत येत नाही वेड्यासारखे आपण आपल्या देहावर, त्यातून निर्माण होणाऱ्या इच्छा, वासना ह्यांवर प्रेम करतो पण ज्या शक्तीमुळे हा देह टिकून आहे, इच्छापूर्ती होणार आहे त्याकडे दुर्लक्ष होते आणि अपूर्णता वाट्यास येते.

कां कस्तुरी सकट परिमळू । कां उष्मे सकट अनळू । तैसा शक्तीसी केवळू । शिवुचि जो ।। ओ 42

अर्थ — कस्तुरी आणि सुवास अग्नी आणि उष्णता एकच आहेत. त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती यांचे नाते आहेत ते एकच आहेत.

शब्दार्थ परिमळू = सुवास, अनळु = अग्नी

विवेचन — कस्तुरीचा सुगंध कस्तुरीपासून दूर करता येत नाही. भले कस्तुरी बंद डब्यात ठेवा, लपवून ठेवा, की झाकुन ठेवा तिचा सुगंध दरवळत रहातो. मला कस्तुरी पाहिजे पण तिचा सुगंध नको असे कोणी म्हणाला तर ते शक्य नाही. करण कस्तूरीपासून तिचा गंध वेगळा करता येत नाही. तो अविभाज्य आहे . माऊली दुसरे उदाहरण देतात ते अग्नीचे. जेथे अग्नी आहे तेथे उष्णता आहे. कारण उष्णता व अग्नी यांचे अतूट नाते आहे. माऊली ही गोष्ट आपणांस अनेक निरनिराळ्या प्रकारची उदाहरणे देऊन पटवून देतात कारण अध्यात्मिक शिक्षणाचा तो पाया आहे. मी म्हणजे केवळ देह नाही. देहाला चेतना देणारी, देहाला कार्यरत ठेवणारी शक्ती किती महत्वाची आहे, हे लक्षांत घेणे गरजेचे आहे. देहाच्या पालिकडे जाऊन चैतन्याचा अभ्यास, चैतन्याची अनुभूती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिशय सुक्ष्म जाणीव असावी लागते. त्यासाठी ध्यान-धारणा, श्रीगुरूंचे मार्गदर्शन, त्यांची कृपा संपादन करणे अवश्यक असते.

चैतन्य हे निर्गुण आहे, अरुप आहे, पण माऊलीने “अरुपाही दावीन”. असा निश्चय केला असल्याने निरनिराळ्या प्रकारच्या उदाहरणातून आपणांस ते रूप प्रकट करून दाखवत आहे. सामान्य जीव देहभोगांत अडकून पडतो. मी व माझे ह्या भ्रमात सापडतो. देहसुखासाठी आयुष्यभर धडपड करतो पण देह थकतो. त्याचे परिणाम सुख समाधान प्राप्ती यांवर होतो. आत्मसुखाची गोडी त्याला कळत नाही व शेवटी ईश्वरीय आनंदाला पारखा होतो. तसे होऊ नये यासाठी माऊलीचा हा प्रयत्न आहे. मी म्हणजे देह तर आहेच त्याचे सुख-दुःख आहेतच पण त्याहीपेक्षा त्या देहातील शक्ती जी अविनाशी आहे, नित्यनूतन आहे तीसुद्धा मीच आहे. त्यामुळे देहभोगांत न अडकता त्या निरंतर, नित्यनूतन आनंदाची अनुभूती मला प्राप्त झाली पाहिजे, असा ध्यास घेऊन श्रीगुरूशोध, श्रीगुरु प्राप्ती, त्यांची सेवा-साधना करून आत्मसुखाची प्राप्ती सर्वांना व्हावी ही माऊलींचे चरणीं प्रार्थना आहे. महायोग, सिद्धयोग साधनेने हे शक्य आहे.

राती आणि दिवो । पातली सूर्याचा ठेवो । तैसा आपुला सचो वावो । जिये दोघे ।। ओ 43

अर्थ — सुर्यामुळे दिवस आणि रात्र होते हे खरे आहे पण सूर्य दिवस नाही आणि रात्र सुद्धा नाही.

शब्दार्थ — वावो =

विवेचन — शिव आणि शक्तीचे दोनपण किंवा वेगवेगळे असणे हे खरे नाही, तर संपूर्ण चैतन्य जीवन हेच खरे आहे. द्वैताशिवाय जगाची उत्पत्ती असंभव आहे. त्यामुळे ते वेगवेगळे झाले तरी मुळांत ते तत्त्वतः एकच आहे. येथे माऊली फार सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात,” मूळ चैतन्य हे सुर्यासारखे आहे. सुर्यामुळे दिवस आणि रात्र होतात पण सूर्य दिवसही नाही आणि रात्रही नाही. सूर्य दिसतो तो पर्यंत दिवस असतो आणि सूर्य दिसेनासा झाला की रात्र झाली असं आपण म्हणतो पण सूर्य नष्ट होत नाही की उत्पन्न होत नाही. आपणच त्याच्या जवळ किंवा दूर जातो. आपणांस दिवस व रात्र यांचा भास होतो, ते वेगवेगळे भासतात. पण सूर्य त्यापेक्षाही वेगळा स्वयं प्रकाशी, निरावलंबी आहे. आपल्यातील चैतन्यसुद्धा असेच आहे ते जन्मास येत नाही

की मृत्यू सुद्धा पावत नाही. ते देहांत प्राविष्ट होते किंवा देहातून निघून जाते. चैतन्य ज्याला आम्ही आत्मा म्हणतो, प्राण म्हणतो तो देहांत येतो आणि जातो. येथे माऊलींचे वैज्ञानिक शरीरशास्त्र विषयक ज्ञान दिसून येते. पहा गर्भ निर्माण झाला तरी तेथे प्राणाची प्रतिष्ठा लगेच होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो. साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर आपणास तेथे हृदयाचे ठोके जाणवतात. देह निर्मिती वीर्य व त्यापासून स्त्रीबीजाशी संयोग होऊन निर्मिती होते. पण प्राणांची निर्मिती होत नाही. ते मातेच्या प्राणप्रवाहा तून येतो. आणि देह पडतो मृत्यू होतो तेंव्हा सुद्धा देह तसाच राहतो फक्त प्राण प्रवाह थांबतो. याचा अर्थ प्राण येतो किंवा जातो तो निर्माण होत नाही आणि नष्ट सुद्धा होत नाही. येथे अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्पर संबंध लक्षांत येतात. अर्थात ह्या सर्व व्यापापासून चैतन्य, प्राण, आत्मा त्यास काहीही संबोधले तरी ते आपले वेगळेपण राखून आहे.

किंबहुना तिये ।प्रणवाक्षरी विरूढतिये । दशेचीही वैरिये । शिवशक्ती।। ओ 44

अर्थ — शक्ती ओंकार म्हणून शब्दरूप धारण करून जगाचा विस्तार करीत आहे तर दुसरीकडे अन्य कोणतेही रूप हे शत्रू समजून धारण करायला तयार नाही.

शब्दार्थ विरुढतिये = वाढत जाणारे, दशेचीही = रुपाचीही

विवेचन — मूळ चैतन्य शिव आणि शक्ती ह्या दोघांत विभागले जाते किंवा त्यांच्यात आकर्षण निर्माण होते तेंव्हा सृष्टीचा विस्तार होत असतो. त्यांच्यातील संघर्ष व आकर्षण ह्यांची साखळी सातत्याने चालू असते. असे ज्यावेळी घडते तेथे शब्दब्रह्म ओंकाराची निमिर्ती होते. जेव्हा साधक श्रीगुरुंकडून दीक्षा प्राप्त करून संपूर्ण समर्पण भावाने साधनेस बसतो, त्यावेळी तो देहभाव पूर्णपणे विसरून जातो. मी एक शक्तीस्वरूपा चैतन्य आहे हा भाव तेथे प्रकट होतो . त्यामुळे तेथे शब्द, रस, रूप, गंध, स्पर्श असे कोणतेही सापेक्ष ज्ञान तेथे उरत नाही.

केवळ आनंदभाव समाधीचा प्रत्यय येतो. त्याच अवस्थेत रहावे असे साधकाला वाटू लागते. आपोआप ओंकाराचे उच्चारण होते. हा अनुभव अनेक शक्तिपात साधकांना येतो. अनेकांना तर दीक्षेच्या वेळीच श्रीगुरु डोळे मिटून, शरीर ढिले सोडून,श्वासावर लक्ष ठेऊन बसायला सांगताच, श्रीगुरूंची शक्ती क्रियाशील होते. ओंकार जोरात सुरू होतो. शरीरभाव संपतो. शरीराच्या व्याधीसुद्धा जाणवत नाही. उलटपक्षी व्यधी दूर होण्यासाठी अनेक आसने, मुद्रा, क्रिया होतात. संपूर्ण शब्द ब्रह्म ज्या एका ओंकारात सामावले आहे त्याची उत्पत्ती अशी आपोआप होते. अनेक स्तोत्र, पदे, ऋचा यांचे गायन होते. ही सारी त्या शक्तीची किमया आहे. अर्थात हा अनुभवायचा भाग आहे.

हे असो नामरूपांचा भेद शीरा। गिळीत एकार्थाचा उजिरा । नमो तया शिव बाहेरा । ज्ञानदेवा म्हणे ।। ओ 45

अर्थ
— नामरूपांचा कितीही भेद असला तरी चैतन्य जीवन हेच प्रकाशमान आहे. ते संपूर्ण सृष्टीवर एकात्मतेचा प्रकाश पडून गिळंकृत करते. त्या चैतन्यास माझे नमन असो असे ज्ञानेश्वर म्हणताहेत.

शब्दार्थ उजिरा = प्रकाश, गिळीत = गिळंकृत, बाहेरा = चैतन्य

विवेचन — नामरूपाचे सर्व भेद असले, शिवशक्ती यांच्यात आपण कितीही भेद करीत असलो तरी त्यांचे मूळ एकच आहे, ते म्हणजे ‘चैतन्य’. ह्या चैतन्याशिवाय काहीही संभव नाही. त्यामुळेच ह्या विविध अंगी, विविध रंगी सृष्टीत एकात्म काय आहे ? असे कोणी विचारले तर ते फक्त चैतन्य आणि चैतन्यच आहे. देश, वंश, धर्म, जात, पोटजात, लिंग, उपासना पद्धती यामुळे आपणच आपणात भेद निर्माण केले आहेत.

पण या सर्वांच्या मध्ये एक गोष्ट समान आहे, ते म्हणजे चैतन्य आहे. गणिती भाषेत एक ह्या अंकाला ‘कॉमन फॅक्टर’ म्हणतात. याचाच अर्थ विविधतेत एकता काय आहे तर ते आहे, चैतन्य. देश परत्वे, धर्म परत्वे, नाम भिन्नता येते. अमेरिकेत तो जॉन असेल , पाकिस्तानात शोएब असेल, भारतात अनिल असेल, पण ह्या सर्वांमध्ये असणारी प्राणशक्ती मात्र एकच आहे. त्याअर्थाने आपण सारेच त्या चैतन्य मातेची लेकरं आहेत. हाच विश्वात्मक प्राण खरा देव आहे. त्यामुळेच संत म्हणतात जे जे भेटले भूत, ते परमेश्वराचे रूप. अश्याह्या चैतन्यास ज्ञानेश्वर महाराज नमन करतात. आजच्या समाजातील विघटनवादी विचार पाहता, संपूर्ण विश्वाला आवश्यक असणारा विश्व बंधुत्वाचा विचार, समानतेचा विचार, भेदरहित समाजरचनेचा विचार आपली आध्यत्मिक संस्कृती पुरातन काळा पासून देत आली आहे. ह्या विश्वात्मक देवाला कोणीही नाकारू शकत नाही. प्राण नको असे कोण म्हणू शकतो? अहो, हे नाकारायला सुद्धा आपण शिल्लक राहणार नाही. येथे कोणत्याही सगुण देवतेची आराधना ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही. देव अंतरीचा ओळखावा हाच माऊलींचा संदेश आहे.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ४१ ते ४५ समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading