सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३१ ते ३५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ३१ ते ३५

ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा । जिये सदैवाचिया लीला । दाखविला ।। ओ 31

अर्थ –चैतन्य शक्तीला एकच एक रूप घेऊन राहणे शक्य नाही . तसेच शक्तीला अनंतरुपे घेऊन ती मिरवण्याची आवड आहे. ती हा खेळ सदैव खेळत आपल्या लीला दाखवत असते.

शब्दार्थ दुकाळा= दुष्काळ, सदैवचिया = भाग्यवानाच्या

विवेचन — चैतन्य शक्ती बहू आयामी व अनेकविध कार्य करणारी आहे. ही सर्व कार्य पार पाडण्यासाठी तिला अनेक रूपे घ्यावी लागतात. जसे माणसाला पोट भरण्यासाठी गहू, तांदूळ आहेत. पण म्हणून कोणी सरळ गहू किंवा तांदूळ खात नाही. त्या गव्हापासून रवा बनवून कोणी शिरा करेल, किंवा मैदा बनवुन त्यापासून केक बिस्कीटे बनवून ते खाईल. तर काही त्याची कणिक बनवुन त्यापासून पोळी, थालिपीठ, उप्पीट बनवून त्यापासून आपले उदर भरण करेल. वस्तू एकच गहू, पण त्याचे रूपे वेगळी, त्यांची चव वेगळी, त्यांची नावेही वेगळी, उपयोग वेगळे. येथे तर त्या चैतन्य शक्तीला संपुर्ण विश्वाचे पालन पोषण करावयाचे आहे.


अनेक लहान मोठे कार्य तिला करावे लागतात. ती एकच एक रूप कसे घेऊ शकेल? ज्या प्रकारचे कार्य असेल तसे रूप घेऊन ती प्रकट होते व कार्य करीत असते, या साऱ्या तिच्या लीला आहेत. ज्याप्रमाणे विद्युत शक्ती आहे. पाणी गरम करायचे असेल तर तिला गिझर च्या स्वरूपात कार्य करावे लागते आणि पाणी थंड करायचे असेल तर फ्रीज च्या स्वरुपात उपयोगात आणावे लागेल. अन्न शिजवण्यासाठी ती ओव्हन होते, घर उजळवून टाकण्यासाठी दिवा किंवा ट्यूब होते. हे सर्व कार्य त्या एकाच विद्युत शक्ती वर चालते पण कार्यानुरूप तिचे रूप, नाम, उपयोग, वापर सारेच भिन्न आहेत. पण वीज गेली तर हि सर्व उपकरणे बंद पडतात. सऱ्यांचे कार्य थांबते. त्याचप्रमाणे चैतन्य शक्ती ही संपूर्ण विश्वाची आधारभूत शक्ती आहे, जनरेटींग पावर आहे. तिला अनेक रूपे, अनेक आकार,अनेकविध गुणांच्या सहाय्याने प्रकट व्हावे लागते. ज्या जीवाची जी गरज आहे, तसे ती रूप घेते. लक्षांत घेतले पाहिजे वीज उपयोगी आहे, गरजेची आहे म्हणून कोणी विजेची तार हातात धरत नाही. कारण तसे केले तर शॉक लागतो. तसेच ही ईश्वरीय शक्ती सर्वांना मिळाली आहे पण त्याचा यथायोग्य वापर नाही केला तर ती देखील विनाशी रूप सुद्धा घेऊ शकते.

अंगाचिया आटणिया । कांतू उवाया आणिला जिया । स्वसंकोचे प्रिया । रूढविली जेणे।। ओ 32

अर्थ
— चैतन्य शक्तीने धारण केलेल्या नामरूपाच्या आटणीत ( देहांत ) चैतन्य शक्तीचा उदय होतो. शक्तीने नामरूपाचे सांसारिक अंग धारण केले परंतु त्यामुळेच लाजून तिने अंगाचा संकोच केला आहे. ती सूक्ष्म बनली आहे. मनुष्याच्या मनांत नामरूपाचे सांसारिक चक्र सुरू झाले व तेच जास्त रूढ झाले.

शब्दार्थ — आटणी = साचा, मुस

विवेचन –चैतन्य शक्ती किंवा प्राणशक्ती ही अदृश्य आहे ती दिसत नाही त्यामुळे ती ज्या रूपांत प्रकट होते त्याच नामरूपाने आपण तिला जाणून घेतो. पूर्वीचेच उदाहरण घेऊ आपण फ्रीज आणला त्यामुळे आपणांस थंड पाणी मिळाले असे आपण म्हणतो तेंव्हा फ्रिजचे महत्त्व लक्षात येते. पण पाणी थंड करण्याचे काम फ्रिजने केले का? सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल, पाणी थंड झाले ते विद्युतशक्ती मुळे पण हे आपल्या लक्षात येत नाही.किंवा आपण तसे म्हणत सुद्धा नाही. विद्दुत शक्ती जेंव्हा फ्रीज मध्ये प्रवेश करते तेंव्हा त्या शक्तीचा संकोच होतो व तिचे कार्य फ्रीज थंड करणे हे संपन्न होते. त्यामुळे पाणी गार होते. पण जर विद्दुत प्रवाह खंडित झाला तर ? फ्रीज आहे, पाणी आहे तरीही पाणी थंड होण्याचे कार्य होणार नाही. म्हणजेच पाणी थंड करण्याचे कार्य विद्दुत शक्तीने केले पण फ्रिजचे रूप धारण केले म्हणून ते साध्य झाले.

आपण जेव्हा मी लेख लिहिला असे म्हणतो तेंव्हा माझ्या देहाने जरी हे कार्य केले असले तरी त्या चैतन्यामुळे मी लिखाण करू शकलो हे विसरता येणार नाही.आपणांस आठवत असेल लोकशाहीर विठ्ठल उमप एका कार्यक्रमात गात होते. वाद्य मेळ उत्तम होता, साऊंड सिस्टीम चालू होती. नेहमीच्या ठसक्यात गाणे चालू होते. पण गाता गाता उमप कोसळले उमप यांचा देह स्टेजवर होता पण गाणे थांबले होते. क्षणभरापूर्वी जो देह सुंदर गात होता तो आता गाऊ शकत नव्हता कारण त्यातील प्राण, चैतन्य निघून गेले होते. ती शक्तीच उमप यांच्या देहाच्या माध्यमातून गात होती. ही प्राणशक्ती ज्या देहांत प्रवेश करते त्याच नावा रूपाने प्रसिद्ध होते. जेव्हा माणसाच्या मनात विचार व त्यांच्यातील रूप, नामादी भेद यांचा विलय होतो तेव्हा ह्या प्राणशक्तीचा साक्षात्कार होतो, जाणीव होते.

जियेतें पहावयाचिया लोभा ।चढा द्रष्टूत्वाचिया क्षोभा । जियेतें न देखत उभा । आंगचि सांडी ।। ओ 33

अर्थ
— ह्या चैतन्य जीवनाची मजा अशी आहे की ह्या शक्तीच्या आधारेच संपुर्ण विश्वाची उभारणी झाली आहे. ती उभारणी पहावी अशी इच्छा त्या शक्तीला आहे पण ती स्वतःला पाहू शकत नाही.

शब्दार्थ द्रष्टूत्वाचिया= दृश्यमान, दिसणे , क्षोभा = विकृती, स्फुरण

विवेचन — चैतन्यशक्तीचा प्रभाव फार मोठा आहे. तिने आपल्या इच्छेने संपूर्ण जगाचा पसारा निर्माण केलाय पण ह्या शक्तीलाही एक मर्यादा आहे.ज्याप्रमाणे आपण आपणांस पाहू शकत नाही तसेच ही शक्ती सुद्धा स्वतःच निर्माण केलेली निर्मिती पाहू शकत नाही. सागरात प्रचंड मोठ्या लाटा उत्पन्न होतात. त्यांची ताकदही फार मोठी असते. त्सुनामी सारख्या लटा तर हजारो लोकांचे प्राण घेते.

अनेक घरे उध्वस्त करू शकते. मोठमोठी जहाजे उलटी पालटी होऊन जातात पण सागर स्वतः ह्या लाटा कधीच पाहू शकत नाही . तद्वत ही प्राणशक्ती संपूर्ण विश्व उत्पन्न करते पण ती हे जग पाहू शकत नाही. विज्ञानाने खुप प्रगती केली असे आपण नेहमी म्हणतो. सोनोग्राफी, अँजिओग्राफी, एक्सरे यासारखी उपकरणे बनवली. शरीराच्या अंतर्गत भागांचे चित्रण करता येऊ लागले पण हया सर्वांची कर्ती करविती शक्ती तिचे चित्रीकरण अजूनही आपण करू शकलो नाही. त्या शक्तीला पाहू शकलो नाही, मग ही शक्ती स्वतःला कशी पाहू शकेल? कारण ती आहे निर्गुण, निराकार. किंचितही क्षोभ, स्फुरण तिला चालत नाही. त्यामुळेच स्वतःला पाहण्याची इच्छा सुद्धा तिची पूर्ण होत नाही.

कांतेचिया भिडा । अवलावो जगा एवढा । आंगविला उघडा । जियेविण ।। ओ 34

अर्थ
— चैतन्य जीवनाने आपल्या अर्धांगिच्या आग्रहाखातर भिडे पोटी हा विश्वाचा पसारा मांडला. पण जर चैतन्य शक्तीने हा पसारा आवरला तर हा विवस्त्र होतो, उघडा पडतो.

शब्दार्थ कांता = बायको, अर्धांगिनी,

विवेचन — जगाचा संपूर्ण पसारा दृश्यमान भाग हा त्या चैतन्यावर अवलंबून आहे. किंबहुना एकोsहं बहुस्यामी ह्या तिच्या इच्छेपोटी हा पसारा मांडला गेला आहे. पण जिच्यामुळे हे जग निर्माण झाले. तिनेच आपला हा पसारा जर आवरून घेतला , स्वसंकोच केला तर मात्र जग उघडे पडेल. जग पुन्हा शून्यवत होईल. आपणांस कितीही प्रिय व्यक्ती असली तरीही ती व्यक्ती असेपर्यंत म्हणजेच त्या व्यक्तीत प्राण असेपर्यंत ती आपणास हवी हवीशी वाटते. पण एकदा त्या देहा मधुन प्राणशक्ती निघून गेली किंवा प्राणशक्तीने तो देह सोडला की आपण त्या देहाला कवटाळून बसत नाही.

काही काळा पर्यंत त्या देहाबद्दल आसक्ती राहतेही पण नंतर त्या देहाची दुर्गंधी येऊ लागली किंवा त्या देहाचे विघटन होऊ लागले की त्या देहाची विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त होते. मग आपले प्रेम त्या देहावर होते का? का त्या देहांत असलेल्या प्राणशक्तीवर होते ? नक्कीच त्या प्राणशक्तीवर आपले खरे प्रेम होते. त्या देहांत प्राण, चैतन्य असेपर्यंत ते कार्यरत असते . म्हणजेच ह्या विश्वाचा पसारा त्या केवळ प्राणशक्तीनेच मांडला आहे हे आपल्या लक्षात येते. त्या शक्तीच्या असण्या-नसण्यावर ह्या देहाचे असणे-नसणे किंबहुना संपूर्ण विश्वाचेच अस्तित्व तिच्यावर अवलंबून आहे. पण त्या शक्तीने स्व संकोच केला तर ? तर विश्वाचे सुद्धा विघटन होईल. ते उजाड पडेल, उघडे पडेल, पोरके होईल.

जो हा ठेवोवरी मंदरुपे। उवाईलपणेचि हरपे । तो झाला जियेचेनि पडपे । विश्वरूपे।। ओ 35

अर्थ — जीवभाव सूक्ष्म रूपाने राहू शकत नाही . तो शक्ती शिवाय राहूच शकत नाही, पण जगाचे अंग तो धारण करतो. असा हा चैतन्य देव विश्वरूप आहे.

शब्दार्थ ठेवो = ठावठिकाणा, मंदरुपे = सूक्ष्म, उवाईलापणे = उघडपणे, हरपे = हरवणे

विवेचन — जीवाने कितीही ठरवले तरी तो चैतन्याशिवाय राहू शकत नाही. आपण कितीही शक्तिमान, बलदंड, सुदृढ असलो तरी देहातून प्राणशक्ती, चैतन्य बाहेर पडले की सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल क्रिया देह करू शकत नाही. विश्वविजेते राजे सुद्धा ह्या प्राणशक्तीच्या इच्छे विरुद्ध काहीही करू शकत नाही. देहाच्या सर्व क्रिया चालणे, बोलणे, पाहणे, ऐकणे, ह्या बाह्य क्रिया तसेच श्वासोच्छ्वास करणे, अन्नाचे पचन करणे ह्या आंतरिक क्रिया सुद्धा प्राणशक्तीच्या आधारानेच चालतात.

असे असले तरीही केवळ प्राणशक्ती सुध्दा काहीही कार्य करू शकत नाही. तिला देहाचे, शरीराचे माध्यम लागतेच. त्यामुळेच विश्वाचे रूप ह्या देहात्मक शिवाने साकारले आहे. ज्याप्रमाणे वीज स्वतः प्रकाशमान होत नाही त्यासाठी दिव्याची आवश्यकता असते. वीज व दिवा यांच्या संयोगाने प्रकाश पसरतो. त्याचप्रमाणे जगाचा पसारा प्रकट होण्यासाठी व त्याचे संवर्धन होण्यासाठी देहात्मक शिव व प्राणस्वरूप शक्ती ह्या दोन्हीही अतिशय महत्वाच्या आहेत. दोघांचेही महत्व समान आहे. प्राण आहे तर शरीर आहे, आणि शरीरात प्राण आहेत तर क्रियमान शक्य आहे. त्यासाठी साधकाने शरीरशुद्धी सांभाळून प्राणशक्तीचा अभ्यास केला पाहिजे. शरीर शुद्धीचे नियम साधनेच्या विकासात सहाय्यभूत होतात.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ३१ ते ३५ समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading