सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी १६ ते २०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी १६ ते २०

विषो एकमेकांची जिये । जिये एकमेकांची विषयी इये । जिये दोघे सुखीये । जिये दोघे।। ओ 16

अर्थ –चैतन्य जीवन निरुपाधिक आहे. ह्यापासून निघालेले दोन भाग शिव- शक्ती, स्त्री-पुरुष हे सुध्दा निरुपाधिक आहेत. त्यामुळे ते फक्त परस्परांचे विषय होऊ शकतात. आपापसांत एकमेकांचे विषय होऊनच ते सुखी होऊ शकतात.

शब्दार्थ विषयी = जाणणारी
विवेचन— खरंतर जीव – प्राण ह्या दोन्हींची विषय आवड एकच आहे. चैतन्य शक्तीला जाणून घेणे. चैतन्यातच विलीन होऊन आत्मसुखाची अनुभूती घेणे. हे परस्परांना समजले तर दोघेही सुखी पावतात. या दोघांनाही खरंतर एकाच मुक्तस्थितीची अभिलाषा असते. शिव- शक्ती, स्त्री- पुरुष असा कोणताही भेद नाही . सर्वांना एकाच निरपेक्ष सुख प्राप्तीची, मुक्तीची इच्छा असते. पण त्या साठी शरीर निरोगी व शुद्ध असले पाहिजे.

साधनेने शरीर शुद्धी आपोआप साध्य होते. त्याच बरोबर आहार, विहारादी नियम पाळले पाहिजे. व्यक्तितील प्राण व देह हे भिन्न असले तरीही त्यांना मिळणारी चैतन्य अनुभूती , प्राप्त होणारा निरुपाधिक, निरपेक्ष आनंद एकच आहे. जन्माला आलेल्या बाळाचे नाव ठेवले जाते. आपण नाव योगेश ठेवले तर ते त्या देहाचे असते तसेंच ते त्यातील प्राणाचे सुद्धा असतेच की. योगेश असं नाव घेतले तर तो देह व त्यातील प्राण दोन्ही आलेच की कारण हे दोन्ही एकाच चैतन्याचे दोन भाग, दोन बाजू आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः योगीराज होते. श्री निवृत्तीनाथ महाराजांसारख्या योग श्रेष्ठ गुरूंकडून पंथराज महायोगाची, शक्तिपात दीक्षा त्यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे अमृतानुभव त्यांनी स्वतः घेतला आहे. ही अत्यंत अवघड असणारी स्थिती त्यांनी अनुभवली असल्याने सहजतेने ते हा विषय समजावून सांगू शकतात.

स्त्री पुरुष नामभेदे । शिवपण ऐकले नांदे । जग सगळे अधाधे । पणे जिही ।। ओ 17

अर्थ –स्त्री आणि पुरुष अश्या भिन्न नामाने एकच चैतन्य नांदत आहे. त्या विभागलेल्या दोन भागातच संपुर्ण जगाची वाटणी झाली आहे.

शब्दार्थ अधाधे = अर्धे, जिही = जगणे

विवेचन –संपूर्ण जगाची विभागणी स्त्री व पुरुष अश्या अर्ध्या अर्ध्या भागात झाली आहे. पण स्त्री व पुरुष हा भेद सुद्धा उपयोगाचा नाही. कारण हे दोघेही त्या एकाच चैतन्यावर आधारित आहेत, अवलंबून आहेत. ह्या दोन्ही भागांत सामाईक गोष्ट कोणती ? तर ती आहे चैतन्य, प्राणशक्ती . प्राणशक्तीला स्त्री पुरुष असा लिंग भेद नाही. कोणतीही व्यक्ती मग स्त्री पुरुष, उच्च नीच, कोणत्याही धर्म, कोणत्याही देशातील असो प्राणाशिवाय राहू शकत नाही.

प्राणशक्ती शिवाय जीव राहू शकत नाही. जीवसृष्टीची उत्पत्तीही प्राणशक्ती शिवाय असंभवनीय आहे. देह व प्राण यांच्या एकत्र येण्यामुळे जग निर्माण झाले व त्याची विभागणी स्त्री व पुरुष अशी झाली. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात म्हणतात,” तै कुंडलिनी जगदंबा । विश्वबीजचिया कोंभा । साऊली केली ।” संपूर्ण विश्वाचे बीज एकच आहे चैतन्य ज्याला योगिक परिभाषेत कुंडलिनी म्हणतात. हि कुंडलिनी श्री गुरू कृपेने जागृत होते तेव्हा शिव-शक्तीच्या एकपणाची जाणीव होते. मी-तू पणा ची बोळवण होते. द्वैतभाव नष्ट होतो.श्रेष्ठ अश्या आत्मनिवेदन भक्तीचा लाभ होतो. गुरुदर्शीत मार्गाने साधना करीत जावे, जशी साधना वाढत जाते तशी भेदभावना कमी होते, हे विश्वची माझे घर ही भावना वाढीस लागते. तसे अनुभव येऊ लागतात. आज संपूर्ण विश्वाला ह्याची गरज आहे. म्हणूनच भारतीय अध्यात्म, भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वाला तारक आहे.

दो दांडी एक श्रुती। दो फुली एक दृती । दो दिवी एक दीप्ती । एकचीजेवी ।। ओ 18

अर्थ
–दोन तारा छेडल्या तरी त्यातून एकच झंकार निघतो. एका झाडाच्या दोन फुलातून एकच सुगंध येतो.दोन दिवे वेगवेगळे जळत असले तरी त्यातून मिळणारा प्रकाश एकच असतो.

शब्दार्थ श्रुती=ध्वनी, आवाज दृती= सुगंध

विवेचन — दोन एकतारीना वेगवेगळ्या तारा असल्या तरी त्यातून निघणारा झंकार सारखाच ऐकू येतो. तुम्ही म्हणाल नाही हो दोन तारातून वेगवेगळे स्वर येतात, पण नाही त्यासाठी त्या तारांना कमी अधिक ताण देऊन, कमी अधिक जाडी वापरून जाणीव पूर्वक भिन्न स्वर काढावे लागतात. पण सारख्या तारा व सारखाच ताण असेल तर झंकार सारखाच येतो. गायक कलाकार दोन तंबोरे समान स्वरांचे लावून घेतात. त्या दोन वेगवेगळ्या तांबोऱ्यातून स्वर मात्र एकच निघतात.

माऊली शिव- शक्तीचे एकलेपण सांगताना किती समर्पक व सुंदर दृष्टांत देतात. त्यांच्या संगीत विषयक, निसर्गाची निरीक्षण दृष्टी याचा येथे प्रत्यय येतो. ते म्हणतात , झाडाच्या एकाच फांदीवर दोन फुले उमलली, फुले वेगवेगळी असली तरीही त्या दोन फुलांतून येणारा सुगंध एकाच प्रकारचा असतो. अंधारात दोन दिवे उजळवले, लावले तरी त्यातून मिळणारा प्रकाश सारखाच असतो , तो पेटला की जीवनातील अंधार दूर होणार यात शंका नाही. एकदा श्रीगुरुंची कृपा झाली की, ज्ञानाचा दिवा पेटला की अज्ञान दूर जातेच त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. तारा व ध्वनी, फुल व सुगंध, दिवा व प्रकाश ह्याच्यामधील नाते जसे एकसारखे असते तसेच नाते गुरू व शिष्यामध्ये असते त्यात भेद, द्वैत नसते.

दो ओठी एक गोठी। दो डोळा एकचि दिठी । तेवि दोघी जिही सृष्टी । एकचि जेवि।। ओ 19

अर्थ
–दोन ओठ हलताना दिसतात पण त्यातून एकच वाणी, गोष्ट बोलली जाते. डोळे दोन आहेत पण त्यांना दिसणारे दृश्य एकच असते. त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष, शिव व शक्ती ह्यांच्यापासून निर्माण होणारी सृष्टी एकच असून ती एकत्वात विलीन होते.

शब्दार्थ गोठी= गोष्टी, वाचा , दिठी= दृष्टी

विवेचन –मागील ओवीचा विषय पुढे सांगतांना श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज आणिक काही दृष्टांत आपणांस सांगतात. अवघड विषय सोपा करून सांगताना अनेक सोपे, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन विषय सोपा करण्याची हातोटी येथे दिसून येते. आपण बोलतो तेंव्हा दोन्ही ओठ हलतात पण त्या दोन ओठांच्या मधून उमटतो तो शब्द मात्र एकच असतो. एक ओठ वेगळे बोलतो आणि दुसरा ओठ दुसरंच काही बोलतोय असं होतं नाही. दुसरे उदाहरण देतांना सुद्धा ते स्वतःशी निगडीत देतात. आपणांस दोन डोळे आहेत पण दोन्ही डोळ्यांना दिसणारी वस्तू एकच आहे.

तद्वत स्त्री – पुरुष एकत्र आल्यानंतर सृष्टीची निर्मिती होते त्या दोघांच्या एकतेचा भाग म्हणजे चैतन्यघन प्राणशक्ती आहे. त्यावरच संपूर्ण विश्वाची निर्मिती, व संवर्धन अवलंबून आहे. माणसाचा जन्म म्हणजे त्या प्राणशक्तीचे प्रगटीकरण आहे तर त्या शक्तीचे स्वस्थानी जाणे किंवा पुन्हा विश्वात्मक शक्तीत विलीन होणे म्हणजे मृत्यू आहे. म्हणजेच एका अर्थाने संपूर्ण सृष्टीचे अस्तित्व त्या प्राणशक्तीवर किंवा चैतन्यावर अवलंबून आहे. त्या चैतन्याचे देहात असणे म्हणजेच जीवन. जीवनाचे दुसरे नाव प्राण, चैतन्य आहे. पण त्याची ओळख सामान्यजनांना होत नाही चैतन्य हे निरुपाधिक असल्याने , अदृश्य असल्याने जाणवते पण दिसत नाही त्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो, श्रीगुरूंचे मार्गदर्शन लागते, साधना करावी लागते.

दाऊनी दोनीपण । एकरसाचे आरोगण । करीत आहे मेहुण । अनादी जे ।। ओ 20

अर्थ — देह व प्राण हे दोन विभागात विभागलेले दिसतात पण अनादिकालापासून ते एकाच चैतन्याचे रूप असून एखाद्या दाम्पत्याप्रमाणे ते वावरताना दिसतात. देव-देवता, शिव-शक्ती, स्त्री-पुरुष एकरूप होऊन आनंदाचे रसपान करतात. ते एक मेहुण (जोडपं) आहे.

शब्दार्थ आरोगण= प्राशन करणे, मेहुण=जोडपे( पती व पत्नी)

विवेचन — मेहुण म्हटले की पती व पत्नी दोघेही एकत्र येतात. पण त्या दोघांना मिळून संबोधायचे झाले तर मेहुण असेच म्हणतात. आपल्या घरी अनेकदा कुळाचार असता आपण मेहुण म्हणून बोलावणे करतो , असे बोलावणे केल्यास पती व पत्नी दोघेही येतात. त्यांना वेगवेगळे सांगावे लागत नाही. असे दांपत्य जीवनाचे आनंद रसपान, जीवनातील सुख-दुःख एकत्रितपणे अनुभवत असतात. वरवर ते दोन्ही भिन्न आहेत असे वाटले तरीही तीन मिळणारे गृहसुख, पुत्र सुख, घरदारादी सुखे ही दोघांचीही सारखीच असतात.

भारतीय कुटुंब व्यवस्थेत ह्या गोष्टीला फार महत्व दिले गेले आहे. आजकाल समाज व्यवस्था बदलत चालली आहे. स्त्रियांना आदरयुक्त स्थान कुटुंबात देण्याची जी पुरातन काळापासून चालत आलेली विचारधारा बदलली आहे. त्यामुळेच कुटुंब, मेहुण, दाम्पत्य सहजीवन ह्या संकल्पना सुद्धा बदलत चालल्या दिसतात. असे असले तरी आजही अनेक कुटुंबात सामंजस्य, समरसता दिसून येते. अध्यत्मात म्हणूनच पतीने केलेल्या पुण्याचा वाटा स्त्रीकडे आपोआप जातो असे म्हणतात. ते दोघे मुळात वेगवेगळे नाहीतच, करण ते ज्या प्राणशक्तीवर अवलंबून आहेत ती एकसारखीच आहे. त्यात भेद नाही. भेद आहे तो देहाचा, देह रचनेचा. मूळचे चैतन्य एकच आहे. ते सर्वांचे ठायी आहे. सर्वाभूती परमेश्वर म्हणतात, ते अनुभवास येते. येथे अनुभवा अंती असे म्हणावेसे वाटते सर्वाभूती (प्राण)परमेश्वर. माऊली अत्यंत छोट्याशा उदाहरणातून सुखाची अनुभूती कशी घ्यावी, सहजीवन कसे असावे हे पटवून देते.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी १६ ते २० समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading