सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी २६ ते ३०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी २६ ते ३०

कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसे द्वैतमिषे एक । मिरवितसे।। ओ 26

अर्थ — बिंबा मुळे ( मूळ प्रतिमेमुळे ) प्रतिबिंब पडते. व प्रतिबिंबामुळे मूळ प्रतिमेची कल्पना येते. तत्वतः दोन्ही एकच असतात पण दोन भिन्न असून मिरवतात.

शब्दार्थ — अनुमापक = ज्यामुळे अनुमान काढता येते. द्वैतमिषे = भेदभावने मुळे

विवेचन — आरश्यात किंवा पाण्यात आपण प्रतिबिंब पहातो. तेव्हा प्रतिमा व प्रत्यक्ष हे वेगवेगळे भासतात. पण तत्त्वतः हे दोन्हीही एकच आहेत. प्रतिमा पाहून प्रत्यक्ष काय व कसे असेल हे समजते. आपण अरश्यातील प्रतिबिंब पाहूनच केस विंचरतो, कपाळी कुंकू लावतो. आपण कसे दिसतो ह्याची कल्पना त्या प्रतिबिंबामुळेच आपणांस होत असते. आपण प्रत्यक्ष आपले केस, कपाळ, आपला चेहरा कधीच पाहू शकत नाही. आपली प्रतिमाच आपणांस आपण कसे दिसतो, कसे आहोत, कसे असावयास पाहिजे हे सांगत असतो. ते प्रत्यक्ष पाहण्याची गरज नसते. आरश्यातील प्रतिबिंब व प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व ह्यात काहीच फरक नसतो. पण ती व्यक्ती दूर झाली व त्याच आरशासमोर दुसरी व्यक्ती उभी राहिली तर त्या व्याक्तिचे प्रतिबिंब आरश्यात दिसेल.

प्रत्यक्षातील गोष्ट बदलली की प्रतिमा सुद्धा बदलते. प्रत्यक्षातील वस्तूचे, व्यक्तीचे परीक्षण प्रतिबिंबामुळे शक्य असले तरी प्रतिबिंब हे प्रत्यक्षावर अवलंबून असते. जसे बिंब तसेच प्रतिबिंब . त्यात काहीही फरक नसतो. आपणांस जंगलातील मूर्ख वाघाची व हुशार कोल्हा यांची गोष्ट माहीत आहे. कोल्हा वाघास सांगतो,” महाराज, तुमच्या सारखाच दिसणारा एक वाघ जंगलात आला असून तो विहिरीत बसला आहे. तो तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.” मूर्ख वाघ विहिरीतील प्रतिबिंब पाहतो व त्याच्याशी लढाई करण्यासाठी विहिरीत उडी मारतो. शेवटी प्राण गमवावे लागतात. स्वतःच स्वतःचा आत्मघात करून घेतो. आपल्या सारखे संसारी सामान्य जीवांचे सुद्धा असेच होते. आम्ही आमचा देह जो खरं तर आमच्यातील चैतन्य शक्तीचे प्रतिबिंब आहे त्यावर खूप प्रेम करतो. पण त्यातील चैतन्यशक्तीला जाणून न घेता संसार सागरात उडी घेतो. तो खोटा आहे, आभासी आहे हे लक्षांत घेण्यास उशीर होतो व पर्यायाने आपलाच आत्मघात आपणच करून घेतो. संसार वाईट नाही, देहाचे महत्व नाही असे नाही पण ते केवळ चैतन्याचे, प्राणशक्तीचे, परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे. बिंब चैतन्य सुंदर असेल तर प्रतिबिंब सुंदर दिसणार आहे हे आम्ही विसरतो. देह व प्राण हे भिन्न नाहीत हे लक्षांत न आल्याने व मतमतांचा गलबला असल्याने कोणी एक धूर्त कोल्हा आमच्या देहाचे गुणगान करतो त्यावर विश्वास ठेवून संसारात बुडून जातो व आत्मघात करून घेतो.

सर्व शुन्याचा निष्कर्षु । जिया बाईला केला पुरुषु |जेणे दादूलेनी सत्ता विशेषु । शक्ती झाली ।। ओ 27

अर्थ — जगतरुपाने संसाराला दृश्यरुप देण्याच्या शक्तीच्या पाठीमागे ते विश्वरूप चैतन्य आहे. त्याला शक्तीने आपला पती मानला आहे. तो केवळ शून्यवत निष्क्रिय आहे पण शिव – शक्तिच्या प्रभावाने चैतन्यास सत्ता झाली व शक्तिशी विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

शब्दार्थ — दादूलेनी = पती, शून्याचा = निष्क्रीयतेचा

विवेचन — संपुर्ण जग, विश्व हे केवळ चैतन्यरूप किंवा चैतन्याधिन आहे असे जर मानले व जगात देहभाव नसता तर जग दृश्यमान झालेच नसते. देहातील शक्तीमुळे देहाला चैतन्य, चेतना येते हे जरी खरं असले तरी देहामुळेच चैतन्याला दृश्यरुप आकारमान प्राप्त होते, हेही तितकेच खरं आहे. शकले नसते. इतकेच काय पण त्यांना कोणी पाहू सुद्धा शकले नसते.प्राण किंवा शक्ती ही वायुरूप अदृश्य आहे. ते दिसत नाही. कोणतेही कार्य संपन्न होण्यासाठी बापूसाहेब म्हणजे बापूसाहेब यांचे मधील प्राण हे जरी खरं असलं तरी बापूसाहेबांच्या देहाशिवाय इंद्रियांशिवाय ते काहीच कार्य करू शकत नाही.

सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये यांनी युक्त असा शिवात्मक देह सुद्धा असावा लागतो, म्हणूनच माऊली म्हणतात कुलीन स्त्री संसार करतांना आपल्या पतीस सहाय्यभूत होऊन त्याच्याच नावाने संसार करते त्याच प्रमाणे शक्ती शिवात्मक देहाला पती मानून त्याच्याच साहाय्याने जगाचा क्रम चालवते. शक्ती ही जगाची जननी आहे पण तिचे जननीपण सिद्ध होण्यासाठी पतीची गरज आहे. त्यामुळे ती नव निर्मितीची साम्राज्ञी होते. माऊलींनी हा नाजूक विषय किती सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. त्यांनी दिलेले दाखले किती चोख व नित्य परिचयाचे आहेत. एक बाल ब्रह्मचारी योग्याने पती-पत्नीच्या रुपकातून शिव-शक्ती ची ओळख करून देणे हे त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्ता व डोळस निरीक्षण क्षमतेची साक्ष पटवून देते.

जिये प्राणेश्वरिविण । शिवीहि शिवपण । थारो न शके ते आपण। शिवे घडली।। ओ 28

अर्थ
— शिवानेच आपल्या प्रिय प्राणेश्वरी शक्तीला साकार केले आहे आणि शक्ती मुळे शिवालाही शिवपण प्राप्त झाले आहे.

शब्दार्थ थारो= राहू शकणे, प्राप्त होणे

विवेचन — देहामुळे क्रियमान कसे घडते हे सांगून झाल्यावर माऊली म्हणतात, देह म्हणजेच सर्व काही नाही. किंबहुना देहाची सत्ता चालते ती केवळ प्राणशक्ती स्वरूपी चैतन्यामुळे. हे चैतन्य आहे तर देह आहे व त्याचे कार्य आहे. पण चैतन्य नसेल तर देहाची कार्यक्षमता शून्य आहे. त्या प्राण शक्तीने जर देहाचे कुंपण ओलांडले, तर देहाचे देहपण, शिवाचे शिवपण राहणार नाही. सामान्य माणसाला सुध्दा हे सहज समजते पण त्याचा अध्यात्मिक अर्थ लक्षात येत नाही. त्यासाठीच माऊलींसारखी दिव्य दृष्टी व निवृत्ती नाथांसारखे समर्थ श्रीगुरूंची कृपा असावी लागते. हे सर्वज्ञात आहे पण त्याचा गुपित अर्थ माऊली येथे स्पष्ट करतात.

सर्व देहामध्ये वावरणारी ही प्राणशक्ती, चैतन्य देहाच्या माध्यमातून सर्व कार्य करीत असते म्हणजेच ईश्वराच्या प्रति जाण्यासाठी ह्याच चैतन्याची आराधना केली पाहिजे. चैतन्याचे हे कार्य सहजपणे पार पाडण्यासाठी देहाला सुध्दा त्याच प्रमाणे कार्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी देह शुद्ध होऊन तयारीत असला पाहिजे. सामान्य माणूस फक्त देहाचेच महत्व जाणतो त्यामुळे त्याचे लक्ष केवळ देहाकडे व त्या देहाचे चोचले पुरवण्याकडे जाते. साधक मात्र सावधपणे देहा बरोबरच चैतन्याचे महत्व जाणतो. चैतन्याची आराधना म्हणजेच नवम भक्ती आत्मनिवेदन म्हणजेच सिद्धयोग साधना. शरीर ढिले सोडून, डोळे मिटून, श्वासांवर लक्ष केंद्रित करून फक्त बसायचे. श्रीगुरूंच्या संकल्पाने जागृत झालेली शक्ती त्या देहाला जे जे योग्य आहे, हितकारक आहे ते सर्व देहाकडून करवून घेते. अर्थात त्यासाठी देह सुध्दा शुद्ध व पवित्र असला पाहिजे. देह व प्राण यांचे एकत्व होते. सहजसाध्य अशी सिद्धयोगाची साधना वाढीस लागते. आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवास येतात आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहू शकतो.

ऐश्वर्येसि ईश्वरा। जियेचे अंग संसारा । आपलाही उभारा । आपणची जे ।। ओ 29

अर्थ
— शक्ती म्हणजे शिवाचे ऐश्वर्य आहे शोभा आहे. शक्तीचे अंग म्हणजे या जगाचा दृष्टिगोचर पसारा आहे.

शब्दार्थ उभारा = उभारलेला, दृश्यमान

विवेचन — शक्तीशिवाय संपूर्ण जग व्यर्थ आहे. आज विज्ञानाच्या सहाय्याने आपण अन्य ग्रहांवर सुद्धा जाऊन पाहून आलो पण तेथे जीवसृष्टी नाही. असे का? तर तेथे प्राण शक्ती नाही. प्राणशक्ती असणे म्हणजेच सृष्टीचे अस्तित्व आहे. आज आपण म्हणतो माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने खुप प्रगती केली आहे. सूक्ष्म विचार केला की लक्षांत येते , माणूस म्हणजे तरी काय ? माणसातील चैतन्य नाही का. आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण याचा शोध न्यूटनने लावला. पण विचार केला की लक्षात येईल त्या शोधापूर्वी गुरुत्वाकर्षण नव्हते का? फळ झाडावरून खाली पडल्यावर त्या शोधापुर्वी काय आकाशात जात होते का? नाही. फक्त ते फळ खाली जमिनीवर का पडते याचा उहापोह त्याने केला. बरं, त्यापूर्वी कोणी केलाच नव्हता का? तर तेही चूक आहे कारण वैदिक श्लोकात त्याचा उल्लेख आहे.

आकाशात पतितं तोयं यथा गच्छती सागरम्, याचा अर्थ जे काही आकाशातून पडते म्हणजेच वरून पडते ते जमिनीवर पडते व शेवटी सागराला जाऊन मिळते. एक अनामिक शक्तीच्या आधारे हे सर्व होते. ती अदृष्य आहे, पण तिची जाणीव आपणांस होत असते. हा सुद्धा त्या शक्तीचाच एक भाग आहे. ही शक्ती जगाचे वैभव आहे. खूप धनिक माणूस आहे प्रचंड पैसा, ऐश्वर्य आहे. पण ह्या ऐश्वर्याचा उपभोग तो केवळ प्राणशक्ती आहे तोपर्यंतच घेऊ शकतो. एकदा त्या प्राणशक्तीने संग सोडला की त्या ऐश्वर्याचा त्याला काहीही उपभोग घेता येत नाही. तो देह सुद्धा राहत नाही. पण माणसाचे दुर्दैव आहे की त्याच्या हे लक्षांत येत नाही. ज्या शक्तीच्या सहाय्याने सर्व ऐश्वर्य मिळवतो नवनवीन शोध लावून भोग वाढवतो त्या शक्तिलाच तो विसरतो. ह्या सर्व विश्वाचा पसारा त्या शक्तिने खूप वाढवून ठेवला आहे . त्यामुळेच तिचे स्वरूप लक्षांत येत नाही.

पतीचेनि अरुपपणे । लाजोनी अंगाचे मिळवणे । केले जगा एवढे लेणे । नामरूपाचे ।। ओ 30

अर्थ — आपला पती शून्यवत आहे ह्या गोष्टीची लाज वाटून तिने स्वतः संसाराचे अंग धारण करून मिरवणे सुरू केले . संपूर्ण जगातील स्थूल- सुक्ष्माला त्यांच्या नाम रुपासह अलंकार म्हणून धारण कारुन ती मिरवते आहे.

शब्दार्थ अरुपपणे= ज्याला रूप, आकार नाही.

विवेचन — देह हा शून्यवत आहे. माणसाचा देह एकटा काहीच करू शकत नाही. शरीर कितीही सुस्वरूप असो की विद्रूप असो, निरोगी असो की रोगीष्ट असो, सद्वर्तनी असो की दुर्वर्तनी असो त्या शरीरात प्राण आहेत तोवरच त्या देहाला किंमत आहे. ते शून्यवत होते. ते चैतन्य सुद्धा एकटे काही करू शकत नाही. पण ह्या शून्यवत भासणाऱ्या देहाला माध्यम करून ती शक्ती सर्व कार्य करीत आहे. विश्व निर्मिती करीत असते. सुवर्ण हा धातु अत्यन्त किमती सुंदर व विशेषतः स्त्रियांना आवडणारा आहे. पण केवळ सोने अंगभर घालू शकत नाही त्याचे कुंडले, बांगड्या, कंठीहार यासारखे निरनिराळे दागिने करून अंगभर घातले जातात. त्याच प्रमाणे ही प्राण शक्ती सुद्धा अनेकविध माणसे,वृक्ष, स्थावर, चराचर, निर्माण करून त्यांना आभूषणा सारखे मिरवते. स्त्रियांना सोन्याची आवड असते.

पण म्हणून कोणी सोने अंगावर ठेऊन जात नाही, तर सोन्याचे निरनिराळे दागिने घालून ते मिरवतात. मी हातात सोने घातले असं न म्हणतात मी हातात बांगडया घातल्या असंच म्हणतात. बांगड्या सोन्याच्या असतात तसेच काचेच्या सुद्धा असतात पण सोन्याच्या बंगडीचे मोल सोन्यामुळे जास्त आहे. तिला मिळणारे संरक्षण मोठे, हा सन्मान त्या बांगडीचा नसून त्यातील सोन्याचा असतो. तद्वत ह्या संपूर्ण विश्वात चैतन्य भरून राहिले आहे. त्या चैतन्याचे दर्शन होत नसले तरी विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत, चैतन्य आहे म्हणूनच विश्वातील सर्व गोष्टींना किंमत आहे, त्याचे महत्त्व आहे. सुवर्ण बांगडीची किंमत ही त्यातील सोने, त्याची प्रत, बांगडीची कलाकारी ह्यावर ठरते. तसेच व्यक्तीचे महत्व सुद्धा त्याच्या ठिकाणी असलेले चैतन्य, त्या चैतन्याच्या आधारे त्याने केलेले कार्य व शक्तीचा केलेला यथा योग्य सदुपयोग यावर अवलंबून असते.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी २६ ते ३० समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading