सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ६ ते १०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

हा ठावोवरी वियोग भेडे । जे बाळ जगा एवढे । वियाली परी न मोडे । दोघुले पण ।। ओ 6

अर्थ
–स्वानंद सुख उपभोगता यावे म्हणून जीव-चैतन्य यांनी त्यांचे द्वैत कायम राखले आहे. त्यातून जगाची निर्मिती झाली.

शब्दार्थ –वियोग = विरह, वियाली = व्याली जन्मास आली, दोघुले = दोघे

विवेचन
— जीव चैतन्याचे एकपण झाले तर देह जगेल का? अनेकवेळा शक्तिपात साधन मार्गात हा प्रश्न लोकांना पडतो . शक्तिपात झाला आणि देहभाव संपला तर आम्ही देहांत राहणार नाही का? मोक्ष म्हणजे मृत्यू का? असं मुळीच नाही बरे. शक्तीला आत्मसुख घेण्यासाठी, ते उपभोगण्यासाठी देहाची संगत लागतेच. त्यामुळे शक्ती देहाचे सुद्धा संवर्धन करतेच. मुळांत ह्या दोघांचे एकत्र येणे हेच जगाच्या उत्पत्तीचे करण आहे. त्यांच्या दोघांच्या एकत्र येण्यातून, त्यांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, हे बाळ केवढे तर जगा एवढे मोठे. अर्थ स्पष्ट आहे संपूर्ण विश्वाचे बीज ही प्राणशक्ती, हे चैतन्य आहे. पण केवळ चैतन्य असून चालत नाही,

ह्या विश्वाचा गाडा पुढे चालण्यासाठी देह सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच ही प्राणशक्ती देहाचे व स्वतःचे चैतन्यरुप असे दोन्ही कायम राखते त्याचे संवर्धन करते. त्यांना एकमेकांचा वियोग, दूर राहणे सहन होत नाही. म्हणूनच देह असूनही देहभाव मात्र चैतन्यात विलीन होतो व आत्मसुखाचा आनंद दोघांनाही प्राप्त होतो. देहालाही व चैतन्यालाही म्हणूनच ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असूनही आपले वेगळेपण जपतात. म्हणजेच देहांत राहूनही सुखाची प्राप्ती, निर्भेळ आनंदाची प्राप्ती होणे,निर्भय होणे, हीच मोक्ष स्थिती आहे. जगाच्या दुःख कल्पनेपासून सुटका म्हणजे खरा मोक्ष आहे.


आपुलिया अंगीं । देखलिया संसारा । परी नेदीती तिसरा । झोंक लागो ।। ओ 7

अर्थ
–आपल्यामुळे सर्व संसार, जग उत्पन्न झाले व तो संसार समोर दिसत असूनही हे दोघे शिव-शक्ती त्यांच्या संबंधात तिसऱ्या कोणालाही सामावून घेत नाही.

शब्दार्थ नेदीती = सामावून घेत नाही , झोंक = स्पर्श

विवेचन — देह व प्राणशक्ती ह्याशिवाय या जगात अन्य कोणीही नाही. देहांत जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत त्या देहाचे अस्तित्व आहे व तोपर्यंत मी व माझे विश्व , माझे नातेवाईक, स्नेही, माझी मुलं,इ. संपत्ती हे सारं काही आहे. पण ह्या देहातून प्राण बाहेर पडले तर ह्या पैकी काहीही आपले राहत नाही. म्हणजेच ह्या देहाची प्राण सखी कोणी असेल तर ती फक्त चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आहे. म्हणून ह्या शिव-शक्तीच्या जोडी मध्ये तिसरा कोणीही येऊ शकत नाही व ते कोणाला येऊही देत नाही. या दोघांनाही माहीत आहे, हे जग,विश्व जे निर्माण झाले आहे त्याचे निर्माते , जनक ते आहेत. माणसानं स्वतः भोवती निर्माण केलेल्या विश्वाचे सुद्धा खरं तर तेच निर्माते आहेत. माणसाचं अस्तित्व जर ह्या शिव-शक्ती वर अवलंबून आहे, तर त्याने निर्माण केलेल्या या विश्वाचे मूळ निर्माते तेच नाहीत का? ते जर एकमेकांपासून दूर झाले तर माणूस राहणार नाही आणि माणूस नसेल तर त्याचे आप्तस्वकीय, धन, दौलत, नांव सुद्धा त्याचे बरोबर संपून जाईल.


जया एकसत्तेचे बैसणे । दोघं एक प्रकाशाचे लेणे । जे अनादी एकपणे । नांदती दोघे ।। ओ 8
अर्थ
–या दोघांची शिव-शक्तीची मूळ बैठक एकच चैतन्य रुपी जीवनाचा प्रकाश. हा प्रकाश दोघांनाही सुशोभित करतो . ही दोघे अनंतकाळापासून एकत्र नांदत आली आहेत.

शब्दार्थ एकसत्तेचे = एकरूप होऊन, एकत्र

विवेचन — शिव आणि शक्ती असे दोन भाग आपण मानले तरी त्या दोघांचे मूळ एकच आहे ते म्हणजे चैतन्य. यांसाठी गुरुवर्य योगतपस्वी नारायण काका महाराज सांगत,” कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. आपण त्यांना छापा व काटा म्हणतो. नाण्याचा कोणताही भाग आपण हाती घेतला, काटा असो की छापा, संपूर्ण नाणं आपल्या हातात येते. त्याला छापा म्हणा की काटा.” त्याचप्रमाणे शिव म्हणा की शक्ती, देह म्हणा की चैतन्यमयी प्राण म्हणा पण हे दोन्ही एकाच जीवनाचे अंग आहेत.

हे दोन्ही एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही किंवा त्यांना वेगळे करणेही केवळ अशक्य आहे. ‘आदी’ पासून ‘अंता’ पर्यंत,अनादी काळापासून ते एकत्र नांदणार आहेत. ते एकत्र आल्यानेच जग प्रकाशमान झाले, दृश्यमान झाले आहे. हा चैतन्यरूपी प्रकाशच दोन्हीचे मूळ आहे, आधार आहे. चैतन्याच्या ह्या निवासस्थानाला मुलाधार म्हणतात. श्रीगुरु कृपा झाली की हेच मूलाधार जागृत होते, प्रकाशमान होते. त्या प्रकाशात साधकाचे जीवन आनंदमय होते.


भेदू लाजोनि आवडी। एकरसी देत बुडी । तो भोगणेया थंव काढी । अद्वैताचा जेथे ।। ओ 9
अर्थ
–शिव-शक्ती एकच असून दोनपणात राहण्याची त्यांना लाज वाटली तर ते आपल्या मूळ चैतन्यरसात डुंबतात. ते सुख उपभोगण्यासाठी अद्वै अश्या चैतन्यातच ते लिन होतात.

शब्दार्थ भेदू = भेद, द्वैत थंव = त्यावेळी

विवेचन –शिव-शक्ती हे माणसाच्या ठिकाणी एकच आहेत, पण ते जेंव्हा जेंव्हा एकमेकांपासून विभक्त होतात तेंव्हा त्यांनाच त्यांची लाज वाटते. मनुष्य जन्मास येतांना त्याचा जप असतो ‘सोहंम’ ‘सोहंम’ म्हणजेच मी ब्रम्ह असून त्या परमात्मन चैतन्य शक्तीचाच एक भाग आहे हे तो जाणतो. पहा लहान मुलं अतिशय निरागस, निर्लोभी, नीराभिमानी असतात. पण सभोवताली जे संस्कार होतात त्यामुळेच त्यांच्यातील जीवभाव जागृत होऊन त्या परमात्मन शक्तींपासून दूर होतात. स्वतःत असलेल्या चैतन्याचा विसर पडतो व मी म्हणजे माझा देह ही भावना दृढ होते. मग तो शरीराच्या भोगांकडे अधिक लक्ष केंद्रित करतो.

ते भोग प्राप्त करून घेण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू होतात. जी मूळातली अंतर्मुखी असलेली शक्ती मग बहिर्मुखी होते. आपल्यातील शक्तीचा त्याला विसर पडतो. त्यामुळे दुःख प्राप्ती झाली की स्वतःची स्वतःला लाज वाटते. पण.. पण जर श्रीगुरूंची प्राप्ती झाली तर त्या ब्रह्मरसाची गोडी लागते. मग त्या ब्रह्मरसात लिन व्हावे, शिव-शक्तीच्या एकत्रपणाचा आनंद, उपभोग घ्यावा ही एकच कामना राहते. मनुष्य अद्वैतानंदात निमग्न होतो.


जेणे देवे संपूर्ण देवी । जियेविण काही न गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकएकांची ।। ओ 10

अर्थ
–स्त्री भागाचा सारा शक्ती स्त्रोत, राहिलेला शिवभाग आहे. स्त्री भागाशिवाय पुरुषभाग शून्यवत आहे. त्यांच्या एकमेकांच्या सह्यानेच विश्व निर्मिती होत असते. ते एकमेकांवर अवलंबून असतात.

शब्दार्थ –एकोपजीवी = एकमेकावर अवलंबून असलेले

विवेचन –चैतन्य शक्ती शिवाय देहाची निर्मिती तसेच देहाशिवाय चैतन्य शक्तीचे प्रकटीकरण अशक्य आहे. या दोघांचे जेंव्हा ऐक्य होते, ते एकमेकांमध्ये मिसळून जातात तेंव्हाच विश्वाची निर्मिती शक्य असते. विश्वाचे अस्तित्व ह्या दोघांच्या, परस्परांच्या एकत्रिकरणावर अवलंबून आहे. चैतन्याशिवाय देह काही कार्य करू शकत नाही आणि देहाशिवाय चैतन्य सुद्धा दृश्यमान होऊन कार्य करू शकत नाही. हे दोन्ही एकत्र येतात तेंव्हाच कार्य पूर्णत्वास जाते. घरांत दिवे ( लाईट ) लावले आहेत, आणि वीज नसेल तर उजेड पडणार नाही. वीज आहे पण लाईट नाही तरीही उजेड पडणार नाही. देहात प्राण असतील तर देह कार्यरत होतो. तसेच चैतन्य संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेली असले तरी ह्या शक्तीला प्रकट कार्य करण्यासाठी देह माध्यम लागते.

म्हणून ज्याला ह्या दोन्हीचा योग साधायचा आहे त्याने देह शुद्ध ठेवला पाहिजे त्यासाठी आहार विहारादी नियम पाळलेच पाहिजे. तसेच देहाने चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी ध्यान-धारणा आदी साधना केली पाहिजे. शुद्ध पवित्र देह जेव्हा साधना करून सिद्ध होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाची प्राप्ती होते. एकदा हा आनंद प्राप्त झाला की त्यापासून दूर जाण्याची इच्छाच उरत नाही. त्या आनंदरसात देहभाव विरुन जातो इतके अंतर्बाह्य चैतन्यमय स्वरूप होते. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ अशी अवस्था होते.

सार्थ अमृतानुभव अध्याय पहिला समाप्त
ओवी ५ ते १० समाप्त

सार्थ अमृतानुभव :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading