सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४६ ते ५०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ४६ ते ५०

जयाच्या रूप निर्धारी । गेली परेसी वैखारी । सिंधुसी प्रलयनिरी । गंगा जैसी ।। ओ 46

अर्थ
— वाचा ही जीवनापासून तयार झाली आहे, त्यामुळे वाचेला जीवन चैतन्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. ज्याप्रमाणे प्रलयकाली सर्वत्र पाणीच पाणी होते , तेंव्हा समुद्र आणि गंगा किंवा सिंधू यांना वेगवेगळे जाणुन घेणे अशक्य आहे तसेच वाचा आणि जीवन चैतन्य याना वेगवेगळे करणे अशक्य आहे.

शब्दार्थ वैखारी = मोठ्याने बोलणे

विवेचन — आपण आत्ता चैतन्य विषयी बोलत असलो तरी त्याचा बोलविता धनी मात्र त्यामागील चैतन्य शक्तीच आहे. ह्या वाणीच्या मागे वदवून घेणारी शक्ती व वाणी वेगळे झाले तरी वाणीचे शब्द ऐकू येणार नाहीत. तसेच वाणीच्या उच्चरणासाठी सुध्दा हीच शक्ती लागते. म्हणजेच वाणी व शक्ती एकरूप झाल्या तरच वाणीचे उच्चारण आणि तिचा आस्वाद घेता येईल. म्हणूनच वाणीला शब्दब्रम्ह असं सुद्धा म्हणतात. माऊली येथे खूपच समर्पक दाखला देतात. ते म्हणतात,” जर महाप्रलय झाला तर सर्व जलमय होईल. संपूर्ण जग जलमय होईल. असं जर झाले तर, मग कोणता प्रवाह गंगेचा आहे? कोणता सिंधु नदीचा आहे? कोठे सागर आहे?

काहीही सांगता येणार नाही. पाणी पाण्यात मिसळून जाईल तेंव्हा त्याचे वेगळे असं काही अस्तित्व राहत नाही.त्यांना वेगळे करणे शक्य होणार नाही. नदी सागराला मिळे पर्यंतच तिचं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवते पण सागराला मिळाली की ती स्वतःच सागर होऊन जाते. आपल्या मानवी देहांत चैतन्य असंच सामावलेले आहे. शरीरातील प्रत्येक पेशी-पेशीत ती वास करते. तिला वेगळे करता येत नाही. ती दिसत नाही पण ती जाणवत राहते. तिला जाणून घेणे, तिच्या अस्तित्वाचा आनंद उपभोगता येणे साठी गुरुकृपायोग, सिद्धयोग, शक्तिपात योग प्राप्त करून घेता आला पाहिजे. त्यासाठी योग्य गुरूचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले पाहिजे.

वायू चळवळीसी । जिराला व्योमचिये कुशी । आटला प्रलय प्रकाशी । सप्रभ भानू ।। ओ 47

अर्थ
— वायूची सर्व चळवळ, हालचाल ही आकाशातच विलीन होते. त्याचप्रमाणे जेंव्हा प्रलय प्रकाश पडतो तेंव्हा सूर्याचा प्रकाशही त्यातच विलीन होतो.

शब्दार्थ व्योम = आकाश, भानू = सूर्य

विवेचन — वारा हा फक्त आकाश मंडलातच आपली करामत दाखवू शकतो. वारा कितीही जोराचा सुटला ,कितीही मोठे वादळ आले तरीही ते शांत होऊन पुन्हा अगाध मंडलातच स्थिर होते. वाऱ्यामुळे झाडे पडतील, पूर येतील, घरे पडतील पण शेवटी ते वादळ आकाशमंडळातच स्थिर होते. त्याचप्रमाणे जेंव्हा प्रकाश प्रलय होतो तेंव्हा सर्वत्र प्रकाश पसरतो. केवळ प्रकाश आणि प्रकाशच सर्वत्र भरून जातो.

त्या प्रकाश प्रलयात कोटी सुर्यांची प्रभा असते. त्या प्रकाशात सूर्यप्रकाश सुध्दा विलीन होतो. आपले मूळ रूप त्यात विरून जाते. आपले सुद्धा मूलस्वरूप चैतन्य प्राणशक्तीच आहे. आपणांस सुद्धा शेवटी त्या चैतन्यातच विलीन व्हावे लागणार आहे. एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर आपण सहज म्हणतो त्यांचे प्रणोतक्रमण झाले. म्हणजेच त्या देहाच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती चैतन्यात विलीन झाली. चैतन्य जोपर्यंत देहाच्या आधारे असते तोपर्यंत ते देहाचे नमः, रूप घेते. पण ज्यावेळी चैतन्य देहबंध सोडून देते तेंव्हा ते पुन्हा विश्वात्मक होते. चैतन्य चैतन्यात विलीन होते.

जया दोघांच्या आलिंगनी । विरोनी गेली दोन्ही । अवघियाची रजनी । दिठी जेवि ।। ओ 48

अर्थ
— शिव-शक्ती ह्या दोन वेगळ्या भासत असल्यातरी त्या एकमेकांना आलिंगन देतात तेंव्हा दोन्ही आपला मीपणा विसरून एकरूप होतात. जसे सूर्य उगवला नंतर अंधार व प्रकाश असा भेद उरत नाही.

शब्दार्थ अवघियाची = सगळ्यांची, दिठी = दोघेही, रजनी = रात्र

विवेचन — शिव-शक्ती, प्राण आणि देह हे वेगवेगळे भासतात तरीही ते एकमेकांच्या संगतीत राहतात.त्यांचे अलिगंन इतके दृढ आहे की ते एकमेकांत विरून गेले आहेत. त्यांना त्यांचे वेगळे अस्तित्व राहत नाही. ही मिठी आध्यत्मिक आहे. येथे शिव शक्तीची भेट आहे. त्यांचे प्रेमालिंगन आहे. श्रीगुरुकृपेने जेंव्हा आत्मज्ञान प्रकट होते, तेंव्हा मी व माझे हे विरून जाते. उरतो तो फक्त ज्ञानाचा प्रकाश. हे विश्व ची माझे घर हा साक्षात्कार होतो घराचा स्वामी विश्वात्मक देव प्रकट होतो. बाळ संन्याशाने हे वर्णन केले आहे, हे विशेष. ज्याप्रमाणे स्त्री पुरुष एकमेकांच्या मिठीत जग विसरून जातात तद्वत देहभाव आत्मभावात विरून जातो. येथे माऊली दृष्टांत देतात तोही अंधार व प्रकाशाचा. दोन्ही वेगवेगळे आहेत असे वाटते पण त्यांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. सूर्योदय झाला की रजनी रात्र अंधार निघून जातो, त्या प्रकाशात विलीन होतो. प्रकाश व अंधार,

दिवस व रात्र असें दोन भाग राहत नाही. प्रकाश म्हणजे ज्ञान तर अंधार म्हणजे अज्ञान. आत्मज्ञानाच्या उजेडात देहभावाच्या आकुंचित संकल्पना विरून जातात. प.पु. श्री काका महाराज ढेकणे सुध्दा म्हणतात, “व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया साऱ्या आकुंचित सीमा, विशाल हृदयी स्थापन केली मानवतेचि ही प्रतिमा”. समिष्टी भाव जागृत होतो , मी तू पणा गळून पडतो. संपूर्ण विश्व माझे आणि मी विश्वाचा हा अनुभव येतो. समर्पण करावे लागत नाही आपोआप होते. शक्तिपात साधनेत साधकाने काहीच करायचे नसते, फक्त साक्षीभावाने सारे अनुभवायचे असते. मिटल्या डोळ्यासमोर जेंव्हा जग दिसू लागते तेंव्हा होणारा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे. तो क्षण अनुभवायला पाहिजे. त्या शक्तीच्या मिठीत अलगद शिरण्याचा अनुभव विलक्षण आहे.

तेवि न्याहाळता यायते । गेले पाहणेनसी पाहते । पुढती घरौते वरौते । वंदली तिये ।। ओ 49

अर्थ — चैतन्य जीवनाला न्याहाळायचे किंवा पहायचे म्हंटले तर ते अशक्य आहे पण पाहणारे आणि त्यांचे पाहणे चैतन्य दर्शनाने नाहीसे होते.

शब्दार्थ ययाते = यांना, घरौते वरौते = पती पत्नी

विवेचन — स्वतःस स्वतः पाहणे शक्य नाही. आपण म्हणाल आम्ही आरश्यात तर रोज स्वतःला रोज पाहतो पण लक्षात घ्या ते तुम्ही स्वतः नाहीत तर ते तुमचे प्रतिबिंब आहे. लक्षपूर्वक पाहिले तर लक्षांत येते आरश्यातील प्रतिबिंब हे बरोबर उलटे दिसते. डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे दिसते. म्हणजेच आपण जसे आहोत तसेच आपण स्वतःस जसे आहोत तसे स्वतःला पाहू शकत नाही. जर स्वतःचा देह स्वतः पाहू शकत नाही,तर स्वतःतील चैतन्य पाहणे किती अवघड असेल. आपल्यातील चैतन्य दर्शन किंवा आत्मदर्शन होणे किती अवघड असेल हे सांगावयास नको. म्हणूनच नवविधा भक्ती मध्ये सुद्धा आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती समजतात. जोपर्यंत “आपणची आपणासी पाहावे” अशी स्थिती येत नाही तो पर्यंत संपूर्ण ज्ञान शक्य नाही.

प्रभू रामचंद्र याना वसिष्ठ महामुनींनी अनेकविध ज्ञान दिले तरी त्यांचे प्रश्नांना उत्तर देतादेता योगवसिष्ठ सारखा मोठा ग्रंथ तयार झाला तरीही त्यांचे प्रश्न संपत नाही असे पाहून शेवटी वसिष्ठ महामुनींनी त्यांना शक्तिपात घडविला. रामायणात फार सुंदर वर्णन त्या प्रसंगाचे येते. प्रभू रामचंद्र व श्रीगुरु वसिष्ठ दोघेही शेजारी शेजारी बसले आहेत. गुरुदेवांनी प्रभूंच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रभू रामचंद्र एका भावसमाधीत गेले. आपण हळू हळू हवेत तरंगत जातोय असा त्यांना भास होऊ लागला. गुरुदेव पण शेजारी आहेत असे जाणवत होते. त्यांनी हळू हळू डोळे उघडायला सांगितले तेव्हा रामचंद्र खाली पहात होते. खाली सर्व आश्रम दिसतोय व सर्व शिष्य बसले आहेत. वसिष्ठ महामुनी आहेत त्यांच्या शेजारी ते स्वतःलाही पहात होते. हा मोठा चमत्कार होता. त्या क्षणी ज्ञान उत्पदते स्वयं या न्यायाने रामचंद्रांच्या जागी ज्ञान जागृत झाले, सर्व शंका फिटल्या. याचाच अर्थ आत्मदर्शन झाल्यावर गुरू-शिष्य, शिव-शक्ती हा भेद रहात नाही. सर्वत्र चैतन्य जाणवते.

जयाचिया वाहणी । वेदकु वेद्याचे पाणी । न पिये परी सांडणी । अंगाचीही करी ।। ओ 50

अर्थ — समुद्रातून निघणारा एक तरंग संपूर्ण समुद्राचे दर्शन घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे चैतन्यातून निर्माण झालेला एक जीव संपुर्ण चैतन्याचे स्वरूप जणून घेऊ शकत नाही. त्यासाठी चैतन्यातच विलीन व्हावे लागते.

शब्दार्थ वाहणी = नदी, वेदकु = समुद्र

विवेचन — समुद्रातून अनेक लाटा, अनेक तरंग निर्माण होतात पण त्यांना समुद्राचे दर्शन होत नाही कारण प्रत्येक लाटेला तिचे स्वतंत्र अस्तित्व असते. पण जेंव्हा ही लाट पुन्हा समुद्रात विलीन होते तेंव्ह ती लाट वेगळी राहत नाही. ती सुद्धा सागराचा एक भाग होते. तिला सागराचे अस्तित्व लक्षात येते. आपल्या मानवी देहाचे सुद्धा असेच आहे. खरंतर प्रत्येक जीव हा त्या चैतन्याचा एक भाग आहे. पण त्या चैतन्यास जाणून
घेणं प्रत्येक जीवाला शक्य होत नाहीत. त्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. केवळ गुरूंची दीक्षा झाली, म्हणजे चैतन्याचे दर्शन होईल असे होत नाही. त्यासाठी संपूर्ण समर्पण असले पाहिजे. जोपर्यंत मी व माझे हा भाव जागृत आहे, तोपर्यंत चैतन्य व आपण वेगवेगळेच असतो. समुद्राच्या लाटेला लाट म्हंटले जाते , पण जेंव्हा ही लाट समुद्रात स्वतःला समर्पित करते तेंव्हा तिलाही सागर म्हणतात. अनेक लाटांना सागर आपल्यात सामावुन घेत असतो. योगतपस्वी काका महाराज म्हणतात चैतन्य फार मोठे आहे त्याला जाणून घेण्यासाठी निरंतर साधना केली पाहिजे. त्यांच्याकडे अनेक साधक येऊन आपले अनुभव सांगत . तेंव्हा ते म्हणत, ” हो का, आपणांस दिव्य अनुभव आहेत. साधनेत कोणास काय अनुभूती येईल हे सांगता येत नाही.

ते आम्हालाही माहीत नाही. ते चैतन्यच प्रत्येकास आवश्यक ते अनुभव देते.” जेंव्हा हजारो लोकांना चैतन्याची अनुभूती देणारे योगतपस्वी म्हणतात आम्ही चैतन्याच्या लीला सांगू शकत नाही तेंव्हा त्या चैतन्याची व्याप्ती लक्षांत येते. चक्रधर स्वामी यांनी एक छान दृष्टांत दिला आहे. एकदा काही अंध व्यक्तीच्या समोर हत्तीला उभे केले व सांगितले तुम्ही स्पर्शाने ओळखून सांगा हत्ती कसा आहे. झाले प्रत्येकाने हत्तीला स्पर्श केला. कोणी कानाला स्पर्श केला, तो म्हणे हत्ती सुपा सारखा, कोणी सोंडेला स्पर्श केला ते म्हणे हत्ती मुसळा सारखा. प्रत्येकाने हत्तीचे वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केले तेंव्हा एक डोळस माणसाने सांगितले अरे बाबांनो ह्या सर्वांचा मिळून होतो तो एक हत्ती आहे. आपली सर्वांची अवस्था ही अज्ञानाने अंध व्यक्तींसारखी झाली आहे. परमेश्वरीय शक्तीचे जे रूप दिसले, जाणवले त्यालाच आम्ही ईश्वर समजतो पण ईश्वरीय शक्ती त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठी जगदव्यापी आहे. तिचे होऊन जाणे ज्याला जमले तोच खरा ज्ञानी.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ४६ ते ५० समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading