विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378
अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ५१ ते ५५
प्रमोद कुलकर्णी सार्थ अमृतानुभव सर्व भाग: तेथ मी नमस्कारा । लागी उरो दुसरा ।।* जरी लिंगभेद पऱ्हा । जोडू जावो ।। ओ 51
अर्थ — चैतन्याला नमस्कार करून मी त्या चैतन्यापासून वेगळा कसा होऊ. स्त्री पुरुष हा भेदसुद्धा जेव्हा संपतो तेव्हाच चैतन्याचा (ज्ञानाचा) उदय होतो.
शब्दार्थ — पऱ्हा = भेद
विवेचन — ज्ञानेश्वरांची तन्मयता येथे प्रकट होते. ते म्हणतात त्या चैतन्याला मी नमस्कार ही करू शकत नाही कारण मीच चैतन्यमय झालो आहे, तेव्हा नमस्कार कोणी व कोणाला करायचा ? नमन भक्तीमध्ये सुध्दा द्वैत आहेच; मी भक्त नमस्कार करणारा आणि ईश्वर ज्याला नमस्कार करायचा तो असे दोन भाग झालेच. पण चैतन्य हे अद्वैत आहे. तेथे कोणताही भेद नाही अगदी स्त्री पुरुष हा लिंगभेद सुद्धा नाही. प.पु.काका महाराज हाच चैतन्य साधनेचा पूर्वाभ्यास सांगताना म्हणतात, डोळे मिटा, सुखासनात बसा, शरीर ढिले सोडा व काय होते ते पहा. आता प्रश्न येतो डोळे मीटल्यावर काय आणि कसे पहायचे ? विचार करता लक्षात येते, डोळ्यांना दिसते ते जग म्हणजे शिव भाग पण शक्ती डोळ्यांना दिसत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या आत, देहांत पहावे लागते. ज्ञानेश्वरीतील ६व्या अध्यायात माऊली पण सांगते,आपणची आपणाशी पहावे किंवा आता अंगाते अंग वरी डोळे बंद केल्यावर दृष्टी अंतर्मुख होते व प.पु.काका महाराज सांगतात त्याप्रमाणे शक्तीचे कार्य सुरू होते. मग आत्मपूजन म्हणजे स्वतःच स्वतःची पूजा करायची? हो, कारण ती विश्वजननी सर्वत्मक शक्तीच माझ्या ठिकाणी आहे आणि ही पूजा त्या शक्तीची आहे. ह्या पूजेसाठी काहीही लागत नाही, लागते फक्त अनुसंधान.
ती शक्ती आहे आणि नर देह आहे मग तेथे काही भेद नाही. म्हणूनच हे दोन्ही जेथे एक होतात तेथे द्वैत भाव संपतो आणि चैतन्याचा आविष्कार जाणवतो. भागवतात एक कथा आहे, एकदा शुक महामुनी विदेही, साधन अवस्थेत आश्रमातून निघाले तेव्हा तळ्यावर काही देवकन्या स्नान करीत होत्या. त्यांच्या जवळून शुकमहामुनी गेले तरी देवकन्याना लज्जा वाटली नाही, त्या निःसंकोचपणे स्नान करीत होत्या पण शुकमहामुनींना शोधत त्यांचे पिताश्री व्यासमुनी तेथे आले तेव्हा त्यांना पाहून मात्र देवकन्या जलांत शिरल्या. व्यासमुनींना प्रश्न पडला, मी एवढा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध असून माझी लज्जा वाटली पण त्या तरुण शुकाची नाही वाटली, असे का ? तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्या शंकेचे निरसन केले व सांगितले, शुकातील द्वैत भाव संपल्यामुळे व त्याचे चैतन्याशी अनुसंधान झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्त्री,पुरुष, वय इ.कोणताही भेद राहिला नाही त्यामुळेच त्याला पाहून देवकन्या लज्जित झाल्या नाही. जेंव्हा व्यासांनी शुकास हाक मारली तर झाडे, पशु, पक्षी सारेच ओ देऊ लागले करण चैतन्य सर्वांठाई व्यापून आहे.
परी सोनेनसी दुजे । न होता लेणे सोना भजे। ते नमन करणे माझे। तैसे आहे ।। ओ 52
अर्थ — माझे नमन म्हणजे ज्या सोन्यापासून अलंकार तयार झाले त्या केवळ अलंकाराला नसून ज्या सोन्यापासून तो अलंकार तयार झाला, त्या सोन्याला नमस्कार करण्यासारखे आहे.
शब्दार्थ — भजे = एकरूप होणारा
विवेचन — आत्मपूजनाचेवर अन करतांना माऊली साधकाला आत्मप्रौढी वस्तू नये कोणाला अहंकाराचा वारा लागू नये म्हणून आईच्या मायेने काळजी घेतात. संतांचे वर्तन अनुकरणीय असते. त्यांचा एक गुण जरी घेतला तरी जन्माचे सार्थक होते. येथे माऊलींनी दिलेला दृष्टांत किती सुंदर आहे. ते म्हणतात, सर्व अलंकार हे सोन्यापासून बनतात. त्यामुळे अलंकाराचे अंगी सोने आहेच. त्या सोन्याने अलंकाराला नमन केले, तर अलंकाराने अलंकारालाच नमन केले असे होणार नाही का? कारण सोने आलंकार झाले आणि अलंकार सोन्याचा आहे. मी जेव्हा सर्वव्यापी चैतन्याला नमन करतो तेव्हा तो नमस्कार माझे मलाच केल्यासारखे होणार . कारण त्या चैतन्याशिवाय मी नमस्कारासाठी हात जोडूच शकत नाही. मी दुसरा तिसरा कोणी नसून ते चैतन्यघन परमेश्वराचे रूप आहे. मी म्हणजेच माझ्यातील चैतन्य. म्हणूनच हे आत्मपूजन अतिशय महत्वाचे आहे.
आमचे ध्येय ठरले आहे. आम्हाला त्या चैतन्याला जाणून घ्यायचे आहे, नव्हे तर त्यात मिसळून जायचे आहे, त्याचेच होऊन जायचे आहे. त्या चैतन्यात विलीन होणे म्हणजे त्या चैतन्याशी समरस होणं, त्यालाच मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे मरण नाही. ते तर कोणालाही चुकले नाही. मुक्ती म्हणजे स्वत्वाचा विसर पडणे, जीवन्मुक्त होणे. योगाभ्यासात सांगितले जाते काहीही करू नका, जे होतेय ते होऊ द्या त्याचा आनंद घ्या. मी म्हणजे माझा श्वास मी म्हणजे चैतन्य जे श्वासागणिक माझ्या शरीरात प्रवेश करते मला शुद्ध व पवित्र करण्यासाठी प्रयत्न करते. तेंव्हा मीच मला नमस्कार कसा करणार? त्यासाठी आवश्यक आहे ती साधना. श्री गुरूंनी दिलेली साधना न चूकता, न विसरता करणे.
संधिता वाचेते वाचा । ठावु वाच्य वाचकाचा । पडता काय भेदाचा । विटाळू होय ।। ओ 53
अर्थ — वाणीने वाचा शब्द उच्चारला तरी वाणी व वाचा ह्यात काय फरक पडतो? दोन्हीचा अर्थ एकच मग उच्चारणारा व उच्चारलेला शब्द भले वेगळे दिसोत.
शब्दार्थ — संधिता = एकता, विटाळू = भेद, फरक
विवेचन — वाणी व वाचा हे शब्द वेगवेगळे आहेत. त्यात येणारी अक्षरे वेगवेगळी आहेत पण त्याचा अर्थ एकच आहे. त्यातून निर्माण होणारा शब्द एकच आहे. त्याच प्रमाणे आमचे सर्वांचे देह वेगवेगळे आहेत. आमचे धर्म, लिंग, वय जात, उपासना भिन्न आहेत पण तरीही आम्ही सारे एकच आहोत. कारण आमच्या सर्वांत एकच चैतन्य आहे. प.पु. नारायणकाका ढेकणे महाराज म्हणतात, ” चैतन्य ही आपल्या सर्वांची आई आहे आणि त्या अर्थाने आपण सारे भावंडे आहोत. ” खरं पाहू जाता ह्या पेक्षा समानतेचा कोणता विचार असू शकतो? म्हणूनच आपला सनातन धर्म आपणांस स्वधर्माचे पालन कारावे असे सागतो. ज्या धर्मात आपण जन्मास आलो त्या धर्माचे पालन केले पाहिजे. व्यक्तीगत जीवनात त्याची अवश्यकता आहे. त्याचे महत्त्व कमी नाही. पण समाज जीवनासाठी अध्यात्मिक अनुभवाची गरज असते. भारतीय सनातन अध्यात्म त्यामुळेच जगभरात सर्व श्रेष्ठ आहे.
प.पु. नारायण काका महाराजांसारखे अध्यात्मिक गुरू त्यांच्या आचरणातून हा संदेश जगाला देत असतात. त्यामुळेच काका महाराजांचे शिष्य अनेकविध जाती धर्माचे, निरनिराळ्या प्रांतातील, निरनिराळ्या देशांत विखुरलेले दिसतात. विश्व बंधुत्वाचा इतका सुंदर विचार स्वतः अवलंबुन सर्वदूर पसरवणारे श्रीगुरु दुर्मिळ असतात. असे श्रीगुरू निवृत्तीनाथांच्या रूपाने ज्ञानेश्वरांना लाभले. “आता विश्वात्मकें देवे ” अश्या ओव्या ज्ञानेश्वर महाराज लिहितात ते ह्याच विश्व बंधुत्व भावनेतून, आणि हेच त्यांचे वेगळेपण, श्रेष्ठत्व सिद्ध करतात. कलियुगातील असेच विचार देणारे श्रीगुरु म्हणजेच योग तपस्वी नारायण काका ढेकणे महाराज होय. सर्व सामान्य अगदी तळागाळातील लोकांपर्यंत त्यांनी सिध्दयोगाचा, कुंडलिनी शक्ती जागरणाचा मार्ग पोहचवला. सामान्य जणांना उत्थानाचा मार्ग दाखवला.आज हजारो साधक त्या मार्गाचे अवलंबन करीत आहेत.
सिंधू आणि गंगेच्या मिळणी । स्त्री पुरुष नामाची मिरवणी । दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ।। ओ 54
अर्थ — सिंधू आणि गंगा ह्या दोन वेगवेगळ्या नद्या वाहताना दिसतात पण समुद्रात मिळाल्यानंतर त्यांचे पाणी अलग अलग कसे दिसेल? तसेच स्त्री व पुरुष हे वेगवेगळे वाटले तरी ते एकाच चैतन्याचे भाग आहेत. तेही शेवटी त्याच चैतन्याला जाऊन मिळतात. ते वेगळे कसे राहतील?
शब्दार्थ — मिळणी = संयोग होणे मिसळणे, मिरवणी = संबोधन, नमः
विवेचन — सिंधू गंगा या आणि या सारख्या अनेक नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावतात. निरनिराळ्या प्रवाहाने वाहतात, पण शेवटी त्या सागराला जाऊन मिळतात. जेंव्हा त्या सागराला जाऊन मिळतात त्यावेळी त्यांचे पाणी एकमेकांत मिसळून जाते. त्यांचे द्वैत संपते. त्या सागराशी एकत्व पावतात. त्यांचे वेगळे असे अस्तित्व सुद्धा राहत नाही. इतके की पुन्हा त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही. चैतन्य जीवनाचे सुद्धा तसेच आहे. त्याचे ठिकाणी स्त्री पुरुष किंवा शिव शक्ती असासुद्धा भेद नाही. सृष्टीच्या निर्मितीसाठी व तिच्या संवर्धनासाठी त्या एकत्र येतात. ती प्रकृतीची गरज आहे. तसेच ते इतके एकमेकांत मिसळून गेले आहेत की याना वेगळे करणे शक्य नाही. डॉक्टरी भाषेत सांगायचे तर , प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष संयोगातून निर्माण होते.
त्यांचे जीन्स एकमेकांत एकरूप होऊनच देह निर्मिती होते . त्यातूनच पेशींचे संवर्धन होऊन देह परिपूर्ण होतो. पण त्या नंतर ते जीन्स वेगवेगळे करणे शक्य नाही. देहाच्या ठिकाणी हे दोन्हीही बीज रूपाने असतात. अर्थात जो जीव ह्या चैतन्य जीवनास जाणून घेतो, त्याच्याशी समरस होतो तो चैतन्याची अनुभूती घेत आनंदस्वरूप होऊन जातो. त्यासाठी आत्मसमर्पणाची तयारी मात्र पाहिजे. आत्मसमर्पण व आत्महत्या यात खूप फरक आहे. आत्मसमर्पण यात केवळ स्वत्वाचा, आपल्यातील मी पणाचा, अहंकाराचा त्याग अपेक्षित आहे. देह त्याग करावा लागत नाही. तो करायचाच नाही. देहातील मन वअहंकार सोडून दिले, गुरुदर्शीत मार्गाने ध्यान धारणा, साधना केली की अभ्यासाने हे शक्य होते.
पाहे पा भास्य भासकता । आपला ठायी दाविता । एकपण काय सविता । मोडतसे ।। ओ 55
अर्थ — सूर्य व सूर्यप्रकाश हे अलग अलग असले तरीही सूर्य व सूर्यप्रकाश हे वेगळे आहेत का? ते एकच आहेत
शब्दार्थ — भास्य = सूर्य, भासकता = सूर्यप्रकाश, सविता = सूर्य
विवेचन — सूर्यामुळे सूर्यप्रकाश पसरतो. त्याच सूर्यप्रकाशात आपण सूर्याला पाहतो. त्यामुळे सूर्य व सूर्यप्रकाश हे दोन्ही वेगळे आहेत असा भास आपणांस होतो , पण वस्तुतः ते दोन्ही एकच आहेत. सूर्याशिवाय सूर्यप्रकाश शक्य नाही. सूर्य आला की त्याचे बरोबर सूर्यप्रकाश हा येणारच. कारण ते दोन्ही परस्परावर अवलंबून आहेत. किंबहुना ते एकच आहेत. त्याच प्रमाणे शिव – शक्ती, देह – प्राण हे त्या चैतन्याचे एक भाग आहेत . त्यांचे एकत्र असणे हेच मानवी जीवनाचे अस्तित्व आहे. ते जो पर्यंत एकत्र आहेत तोवर आपले अस्तित्व टिकून आहे. देहांत प्राण आहेत तोवरच त्या देहाचा काही उपयोग आहे, त्या देहाला काही किंमत आहे.
तसेच देहांत शक्ती आहे तोपर्यंत शक्ती दृश्यमान कार्य करू शकते. चैतन्याला जेंव्हा जेंव्हा काही कार्य करावयाचे असते त्या त्या वेळी शक्तीला अवतरीत होऊनच कार्य करावे लागते. म्हणूनच देवदेवता सुद्धा निरनिराळे अवतार घेत असतात. पहा, मणीमल्ल जेंव्हा उन्मत्त झाले तेंव्हा शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला. महिषासुर माजल्यावर त्याचे परिमार्जन करण्यासाठी शक्ती मातेने भगवतीचे रूप धारण केले. अनेक दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीराम तथा श्रीकृष्ण अवतार झाले. प्राणाशिवाय देह कार्य करीत नाही, आणि शक्ती देहाशिवाय कार्य करू शकत नाही. केवळ दिवा आहे, तेल आहे, वात आहे म्हणजे प्रकाश पडणार नाही तो दिवा प्रज्वलित असला पाहिजे तरच प्रकाश पडतो. दिवा प्रज्वलित केला तर त्याचा प्रकाश आपण थांबवू शकत नाही, तो पडणारच. करण पेटलेला दिवा व त्याचा प्रकाश हे निरंतर अतूट नातं आहे.
सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला ओवी ५१ ते ५५ समाप्त
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI
