सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३६ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ३६ ते ४०

जिया जेविवला शिवु । वेद्याचे बोणे बहू । वाढतेनसी जेऊ । नि धाला जो ।। ओ 36

अर्थ
— चैतन्यशक्तीने शिवात्मक देहाच्या पोषणासाठी भोजनासाठी अनेक, विविध पदार्थ निर्माण केले व त्यास पोटभर जेवू घातले. देहसुद्धा त्या वाढणाऱ्या शक्तीसह भोजन करून तृप्त झाला.

शब्दार्थ जेविवला = जेवू घातला, बोणे =पदार्थ, वाढतेनसी = वाढले, जेवू घातले, धाला = तृप्त झाला

विवेचन — ज्याप्रमाणे दुधापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे त्याची रुची, रूप, आकारमान भिन्न होते. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप असे अनेक पदार्थ निर्माण होतात. पुन्हा त्यापासून खीर, श्रीखंड, कढी तसेच दूध आटवून त्यापासुन खवा केला जातो. त्याच खव्या पासून गुलाबजाम, पेढे, बर्फी, असे अगणित पदार्थ एका दुधा पासून होतात. शिवाय पनीर, चीझ, बटर असेही पदार्थ होतात.

दूध हा एकच मूळ पदार्थ पण त्यापासून थोडा बदल करून अनेक उत्तम, रुचकर, निरनिराळ्या गुणधर्माचे पदार्थ तयार करतात. त्यांचे उपयोग सुद्धा भिन्न असतात. त्याचप्रमाणे चैतन्य शक्ती सुद्धा ह्या विश्वाचे सौंदर्य वाढवण्यासाठी, उपयुक्तता टिकवण्यासाठी, उपभोग्यता वाढवण्यासाठी अनेक रूपे धारण करते. अनेक जीव जंतू, चराचर निर्माण करते. वेगवान घोडे, कष्टकरी बैल, अवजड हत्ती, दूध देणारे गाई,म्हशी, संरक्षण करण्यासाठी कुत्रे, मांजरे असे अनेकविध जीव निर्माण केले आहेत. माणसांचे सुद्धा किती प्रकार निर्माण केले. कोणी उत्तम गायक, तर कोणी चित्रकार. लेखक, कवी, संशोधक, लढवय्ये, शिक्षक हे सारे तिचेच आविष्कार आहेत. त्याशक्तीला ज्या जीवा कडून जे कार्य करून घ्यावयाचे असेल त्याप्रमाणे ती अंत:स्थ शक्ती कार्य करीत असते. त्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. आपण पहातो, उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले लोक गायक, नट होतात कारण त्या शक्तीला त्या जीवाकडून ते कार्य करून घ्यावयाचे असते. ज्याप्रमाणे गृहिणी आपल्या पतीसाठी उत्तम भोजनाची तयारी करून निरनिराळे चविष्ट पदार्थ तयार करते, व तो प्रेमळ पती सुध्दा पत्नीला सहभोजनास घेऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतो. समाधान व तृप्तता मिळवतो. माऊली म्हणते त्याचप्रमाणे शिव शक्ती सुद्धा ह्या विविधतेने नटलेल्या विश्वाची निर्मिती करून त्या जगाचा अस्वाद घेतात. आपणसुद्धा आपल्या देहात असलेल्या शिव शक्तीच्या आधारे आपल्या जीवनात आनंद निर्माण करून सुंदर निरामय निर्मळ आयुष्य जगू शकतो.

निदेलेनी भातारे । जे विये चराचरे । जियेचा विसंवला नुरे । आपलेपणही ।। ओ 37

अर्थ
— शिवाच्या देहाच्या सुप्तावस्थेत शक्ती जगाचा पसारा व्याप सांभाळते. शिवाच्या मदतीने तिने जगाचा व्याप निर्माण केला व खूप मोठा केला आहे. पण शक्ती मात्र विश्रांती घेत नाही. तिने विश्रांती घेतली तर जगासह तिचे अस्तित्व समाप्त होईल.

शब्दार्थ निदेलेनी = झोपलेला, विये = जन्मास घालणे,

विवेचन — शिव शरीर झोपले असतांनाच शक्तीने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली सर्व चराचराची उत्पत्ती ही शक्तीनेच केली आहे. केवळ शरीर एकत्र आले म्हणजे प्रजनन होत नाही. त्यासाठी जी एक पेशी लागते तीच शक्तीचे स्वरूप घेते. अन्यथा जगात कोणीही निपुत्रिक राहिले नसते, कारण केवळ शरीर एकत्र आले म्हणून जीव निर्माण होत नाही. तेथे शक्तीचे अधिष्ठान महत्वाचे आहे. याचे सुंदर उदाहरण महाभारतात आहे ते म्हणजे पांडवांचा जन्म. प्रत्येक पांडवाचा जन्म हा त्या त्या देवतेच्या शक्तीचा आविष्कार आहे जसे सूर्यापासून कर्णा चा जन्म. येथे शरीर संबंध नाही.अनेकजण शंका घेतात, हे कसे शक्य होईल? पण हे शक्य आहे.

आजच्या विज्ञानयुगात क्लोन प्रणाली किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे त्याच धर्तीवर शक्य झाले ना? उलट ज्याचा आम्ही शोध लागला म्हणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी सृष्टीत फार पूर्वीपासून होत्या. त्याची माहिती आपणांस नव्हती ती आता आज झाली इतकेच. आज जग त्याला शोध म्हणत असेल तर ठीक आहे, पण ती निर्मिती नाही. शोध हा जे अस्तित्वात आहे त्याचाच घेतला जातो. शीव निद्रिस्त असतानाही म्हणजेच शरिर निद्रिस्त असतानाही शक्ती मात्र कार्यरत असते. रोजचं उदाहरण घ्या शरीर झोपी गेले तरी अंतर्गत क्रिया चालूच असतात, उदा. अन्नाचे पचन, रक्ताभिसरण, पेशींची निर्मिती इत्यादी. म्हणजेच शिव, शरीर झोपी गेले तरी शक्ती मात्र सदैव क्रियाशील असते. तिने कार्य थांबवले की झाले, सर्वच संपले.


जवं कान्त लपो बैसे । तंव नेणिजे जिया उद्देशे । जिये दोघे आरसे । जिया दोघे ।। ओ38

अर्थ — जगत संसारामध्ये चैतन्य लपून राहिले आहे. परंतु चैतन्य हे जीवनाचे प्रतिबिंब आहे व जीवन हे चैतन्याचे प्रतिबिंब आहे आपापल्या आरश्यात दोघांनाही एकच प्रतिबिंब पाहावे.

शब्दार्थ — कान्त = पत्नी, लपो = लपून बसने

विवेचन — जगाची कर्ती करविती असलेली चैतन्य शक्ती लपून बसली आहे. सहज साध्य दृष्टिपथात येत नाही. ती दिसत नाही. शरीरातील प्राण हे अतिशय महत्वाचे आहेत, पण ते दिसत नाही, हे खरे आहे, वास्तव आहे . त्यासाठी एक दृष्टांत प. पु. काकामहाराज ढेकणे नेहमी देत असत, ते म्हणत ,”एकदा सर्व अवयवांचे भांडण लागले. प्रत्येक अवयव स्वतःचे महत्त्व जास्त आहे असे म्हणू लागला. हात म्हणे सर्व कामे मीच करतो. पाय म्हणतात अहो केवळ मी आहे म्हणून तुम्ही पाहिजे तेथे जाऊ शकतात . कान म्हणू लागले माझ्यामुळे तुम्ही ऐकू शकतात. संगीत ऐकू शकतात. डोळे म्हणे, मी नसलो तर जगात काय आहे हे तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे मीच महत्वाचा.” खूप वेळ हे भांडण चालू होते. कोणीही माघार घेण्यास तयार नाही. शेवटी ह्या भांडणाला कंटाळून शक्ती,प्राणदेवता उभी राहिली, म्हणाली ” तुम्ही सारेच मोठे आहात, महत्वाचे आहात.

मीच सर्वात लहान व अदृष्य आहे. तुमच्या भांडणाला मात्र मी कंटाळले आहे. तुमचे चालू द्या मी थोडी बाहेर जाऊन येते. ” असे म्हणून ती शक्ती शरीराच्या बाहेर पडू लागली त्याबरोबर सर्व अवयव शांत झाले. त्यांना काही कार्य करता येणे अशक्य झाले. प्रत्येकाला त्याच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा साक्षात्कार झाला. शक्ती शिवाय आपण बलहीन आहोत. त्या शक्ती शिवाय आपणांस काही अस्तित्व नाही हे लक्षांत आले. ज्याप्रमाणे आपण आरश्या समोर उभे राहिलो तर आपले प्रतिबिंब आपणांस दिसते. आपण जशी हालचाल करू तशीच अरश्यातील प्रतिबिंब सुद्धा हालचाल करते. आरश्यातील प्रतिबिंब स्वतः कोणतीही हालचाल, कोणतेही कार्य करू शकत नाही. त्याचे अस्तित्व मूळ व्यक्तीवर अवलंबून असते. तसेच शरीराचे असणे नसणे हे त्या प्राण शक्तीवर अवलंबून आहे. जणू शरीर हे त्या शक्तीचे प्रतिबिंब आहे. देह व शक्ती हे परस्परावलंबी आहेत. शक्तीशिवाय देह असून नसल्यासारखे आहे. जशी पत्नी लपून बसली असता भ्रतार अस्वस्थ होतो. तशीच चैतन्य शक्ती देहांत लपून बसली आहे. ती नसता देह अस्वस्थ होतो. पती पत्नी जसे प्रतिरूप असतात, तसेच शक्ती व देह प्रतिरूप आहेत.

जियेचेनि अंगलगे । आनंद आपणा आरोगु लागे । सर्व भोक्ता परी नेघे । जियेविण काही ।। ओ 39

अर्थ
— शिव-शक्ती यांच्या मिलनातच त्यांना आनंद लुटता येतो. शिवात्मक देह हा उपभोक्ता आहे पण तो शक्तीशिवाय कशा चाही उपभोग घेऊ शकत नाही.

शब्दार्थ — अंगलगे = मिलन होणे, आरोगु = आनंद भोगणे

विवेचन — कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर शिव-शक्ती, देह व प्राण या दोन्हीही गोष्टींची आवश्यकता असते. केवळ शरीर किंवा केवळ प्राण कसलाही उपभोग घेऊ शकत नाही. एखादे सुंदर गाणे ऐकायचं आहे तर त्यासाठी कानांनी ते ऐकले पाहिजे पण ते ऐकण्यासाठी कानांचे मागे त्याची प्राणशक्ती सुद्धा पाहिजे तरच त्या श्रावणाचा आनंद आपण उपभोगू शकतो.

सुदंर चित्र, कैलास लेणे पहायचे असेल तर डोळे व त्या डोळयांतील प्राण शक्ती दोन्ही पाहिजेत. अंधव्यक्ती ते पाहू शकत नाही तसेच प्राणहीन व्यक्ती सुद्धा ते पाहु शकत नाही. पण प्रणोतक्रमन झालेल्या व्यक्तीचे डोळे दुसऱ्या अंध व्यक्तीला दिले तर तो मात्र पंगू शकतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, दोन्हीचा संयोगाने आपण कोणतेही सुख दुःखाचे अनुभव घेऊ शकतो. याचा अर्थ दिसणे, ऐकणे, इत्यादी देहात्मक क्रिया करण्यासाठी देहातील अवयवज्याला माऊली शिव म्हणतात. तसेच त्यामागे असणारे प्राण, चैतन्य ज्याला माऊली शक्ती म्हणतात हे दोन्ही अत्यंत गरजेचे आहेत. जेंव्हा असे शिव-शक्तीचे मिलन होते तेंव्हाच आपण ती क्रिया पूर्ण करून तिचा आनंद घेऊ शकतो.

जे प्रियाचे अंग । जो प्रियु जियेचे चांग । कालवुनी दोन्ही भाग । जेविते आहाती।। ओ 40

अर्थ — चैतन्याने अंग धारण करून जगाची निर्मिती केली. ह्या जगाचे सर्वस्व, प्रियतम चैतन्यच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही भागांची सरभेसळ झाली आहे आणि त्यामुळेच ते जगाचा आनंद उपभोगू शकतात.

शब्दार्थ — चांग = स्वत्व, जेविते = उपभोग घेणे

विवेचन — प्राणप्रिय शक्तीचे अंग म्हणजे शिव आहेत. ज्याप्रमाणे मूर्तिकाराकडे माती असते माती हा मुख्य घटक आहे. त्या मातीपासून तो गणपतीची मूर्ती घडवेल. एखादी नृत्यांगना घडवेल. किंवा एखादी हत्ती, बैल या सारख्या प्राण्यांच्या मूर्ती घडवेल. कालीमातेची मूर्ती साकारताना ज्या मातीने देवीची मूर्ती घडवतो त्याच मातीतून तो महिषासुराची मूर्ती घडवतो. माती एकच पण तिची रूपे अनेक, उपयोग विविध, त्यातून घडणारे दर्शन विविध. तद्वत जगात अनेकविध प्राणी आहेत,

माणसं सुद्धा अनेक प्रकारच्या रंग, रूप, स्वभाव, आकारमानाचे आहेत पण सर्वांचे ठिकाणी प्राणशक्ती, चैतन्य एकच. जोपर्यंत ही प्राणशक्ती व शिवात्मक देह यांचे मिलन होत नाही तो पर्यंत त्यांचे अस्तित्व लक्षांत येत नाही. पहा, आपण अत्यंत प्रिय व्यक्तीला किंवा वस्तूला सुद्धा संबोधतांना ती मला प्राणप्रिय आहे असे म्हणतो. हा सहजभाव असला तरी त्यातील गमक असे आहे, त्या माणसातील प्राण व माझ्यातील प्राण एकच असून जोपर्यंत परस्परातील प्राण आहेत तो पर्यंत ती मला प्रिय राहील. त्या व्यक्तीचा सहवास किंवा त्या वास्तुचा उपयोग, त्यातील सुंदरता ही जोवर तिच्या ठिकाणी प्राणशक्ती आहे तोवर मला मिळो, ही त्यातील इच्छा, भावना असते.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ३६ ते ४० समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *