भ. विठ्ठल २८ युगापासून खरच उभा का ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली

या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे मानलेली आहेत.
यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे.

अशी एकसहस्र (१०००) चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय.
त्याला कल्प असेही म्हणतात.

त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात;
म्हणजेच सुमारे ७१ चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो. त्यालाच मन्वंतर असे नाव आहे.


ब्रह्मदेवाचे आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे एवढे असते.
त्यातील ५० ब्राह्मवर्षे संपून ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे.

त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून,
सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे.
वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली,
तर
आताचे कलीयुग हे अठ्ठाविसावे युग आहे.
विठ्ठल अठ्ठावीस युगे आहे, म्हणजेच वैवस्वत मन्वंतरापासून तो आहे.

विठोबा ‘युगे अट्ठावीस विटेवरी उभा’ पण कोणाच्या सांगण्यावरून, ते पहा!
विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते, भक्त भगवंताच्या परस्परावरील निस्सीम प्रेमाची कथा. आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे. हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा! एक दोन नाही तर अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

सुमारे २८ युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारेकेतून दिंडीर वनात आले होते, त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकांची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले, तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई-वडिलांची सेवा करीत होते. भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले, भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते, श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, ‘सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे.

श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला. देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता. म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाट देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हटले, देवा काही काळ या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच.’

आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटले, ‘देवा, माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना? माझं चुकलं, मला क्षमा कर!’

श्रीकृष्ण म्हणाले, ‘पुंडलिका आई वडिलांची सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा मोठी असते. ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलो असतो. पण तुझ्या मातृ-पितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझा आदर्श पुढील पिढयांसमोर सदैव राहावा, यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील.’

भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकालादेखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला. याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे,
‘पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा,
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा!’

‘युगे अट्ठावीस विटेवरी उभा’ कसा समजून घेऊ.
युगे २८ उभा विठु विटेवरी !


सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो.
सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.

वारी म्हणजे हिंदु कुटुंब आणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत !

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात.

‘विठ्ठल’ या शब्दाची व्युत्पत्ती

डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’

अर्थ
१. विट + ठल (स्थळ) = विठ्ठल
अर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.
२. विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति
अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.
३. विठ्ठल’ याचे दुसरे नाव : पांडुरंग
पांडुरंग’ हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते पंढरपूर’ होय, असे डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात.

पंढरपूरच्या वारीचा प्रारंभ
संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ।
विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥
होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥
– संत चोखामेळा

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥
पतितपावन मानसमोहन ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥
ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥
– संत ज्ञानेश्‍वर

‘युगे अठ्ठावीस’ म्हणजे काय?
श्रीविठ्ठलाच्या आरतीत ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ पण ही अठ्ठावीस युगे कोणती व कशी मोजली जातात? याची उत्तर आपण पाहू.

श्रीविठ्ठलाच्या आरतीत संत नामदेव महाराज ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ असे वर्णन करतात; पण युगे अठ्ठावीस म्हणजे काय? या मागे काय गणित आणि काय तर्कशास्त्र आहे? हे शब्द काही संत नामदेवांच्या कल्पनेतून किंवा निव्वळ प्रतिभेतून किंवा उगीचच आलेले नाहीत. त्यामागे कालगणनेचा एक विचार आहे. ‘युग’ ही खास भारतीय संकल्पना आहे.

भागवत पुराणात मन्वंतर आणि युग याविषयी सविस्तर सांगितलेले आहे. भारतीय किंवा अधिक बरोबर सांगायचे, तर हिंदू संकल्पनेनुसार ‘मनू’ ही कालगणना आहे. ती कशी झाली आणि तिला मन्वंतर का म्हणतात? तर मनू हा एक क्षत्रिय राजा होता. त्याने कालगणना सुरू केली. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळलेली मनुस्मृती मनूनेच लिहिली). मनूने सुरू केलेली कालगणना म्हणून तिला ‘मन्वंतर’ असे म्हणतात.

हिंदू कालगणनेचा विचार केला, तर एकूण 14 मन्वंतरे आहेत. मनू हा एकच नाही, प्रत्येक मन्वंतराचा प्रमुख एक मनू असतो. या 14 मन्वंतरांची नावे अशी आहेत –

स्वायंभुव,
अग्‍निपुत्र स्वारोचिष,
प्रियव्रतपुत्र उत्तम,
उत्तमबंधू तामस,
तामसबंधू रैवत,
चाक्षुष,
श्राद्धदेव वैवस्वत,
सावर्णी,
दक्षसावर्णी,
ब्रह्मसावर्णी,
धर्मसावर्णी,
रुद्रसावर्णी,
देवसावर्णी आणि
इंद्रसावर्णी.

काही पंचांगांत देवसावर्णी आणि इंद्रसावर्णी या नावांऐवजी रौच्य आणि भौत्य अशी नावे दिलेली असतात. यापैकी ज्या मन्वंतराची सुरुवात ज्या तिथीला झाली त्या तिथीला मनवादी (मनुवादी नव्हे) तिथी म्हणतात. पंचांगात या तिथीसमोर ‘मन्वादि’ असा स्पष्ट उल्लेख असतो.
आता या प्रत्येक मन्वंतरात एक महायुग असते. एका महायुगात चार युगे असतात. त्या युगांची नावे – सत्य किंवा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे आहेत. एक मन्वंतराचा काळ हा 30 कोटी 67 लाख 20 हजार वर्षे आहेत. या वर्षांची विभागणी युगानुसार अनुक्रमे 4:3:2:1 अशी केलेली आहे.

आता विचार केला, तर असे लक्षात येईल की,

सध्या 7 व्या वैवस्वत मन्वंतरातील चौथे म्हणजे कलियुग चालू आहे; गणिताच्या भाषेत सांगायचे झाले तर 4 गुणिले 7 = 28, म्हणजे हिंदू कालगणनेनुसार सध्या अठ्ठाविसावे युग सुरू आहे. वैवस्वत मनू हा या मन्वंतराचा अधिपती आहे. हीच अठ्ठावीस युगे श्रीविठ्ठल विटेवर उभा आहे, असे संत नामदेव म्हणतात. वैवस्वत मन्वंतरापासून तो उभा आहे.

आपण छत्रपती शिवरायांना ‘युगपुरुष’ असे म्हणतो. युगातून एकदा जन्माला येणारा पुरुष, तो युगपुरुष होय. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करून युगनिर्मिती केली, असे आपण म्हणतो.
वैश्‍विक संदर्भात बोलायचे झाले, तर काळ हा चक्राकार असतो. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. या कालावधीबाबत मतमतांतरे आहेत.

महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा 43 लाख 20 हजार मानवी वर्षे इतका आहे.
चार युगांचे मिळून एक महायुग बनते.
त्याचा कालावधी 12 हजार दिव्य वर्षे होतो.
एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षे असल्यामुळे तो कालावधी 43 लक्ष 20 हजार मानवी वर्ष इतका होतो. यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असेही म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात. म्हणजेच सुमारे 71 चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो.

त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान 100 ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील 50 ब्राह्मवर्षे संपून 51 व्या वर्षातला पहिला श्‍वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्‍न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलियुग हे अठ्ठाविसावे युग आहे. चार युगांचा कालावधी समान नसतो, परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो.

दुसर्‍या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते.
प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्‍वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो.
प्रत्येक मन्वंतरात 71 महायुगे येतात.
प्रत्येक महायुग हे चार युगांत (कालखंडात) विभागले जाते.
सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली.
या युगांत अनुक्रमे 4800, 3600, 2400 आणि 1200 वर्षे येतात.
मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी 360 ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ इ.स.पूर्व 3102 मध्ये झाला असे मानले जाते.

कृतयुग किंवा सत्ययुग हे अत्यंत रमणीय होते. देव आणि प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी या युगात पृथ्वीवर नांदत होते. तो खराखुरा स्वर्गच होता असे मानले जाते.

त्रेतायुग हे मानवकाळातील दुसरे युग होते.

याच युगात वामन, परशुराम आणि श्रीराम हे तीन अवतार होऊन गेले.
श्रीरामाच्या देहान्तानंतर त्रेतायुगाचा अंत झाला.

त्रेतायुग 12 लाख 96 हजार वर्षांचे होते.
द्वापारयुग हे तिसरे युग आहे. हे 8 लाख 64 हजार वर्षांचे होते.
याच युगात भगवान श्रीकृष्णांचा अवतार होऊन गेला. महाभारत याच युगात होऊन गेले, तसेच श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापारयुग समाप्त झाले.

सध्या कलियुग सुरू आहे.
हे 4 लाख 32 हजार वर्षांचे आहे. त्यापैकी 5 हजार 123 वर्षे संपलेली आहेत.


विष्णूचा दहावा अवतार कल्की हा पृथ्वीवर पाप वाढल्यानंतर अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेईल, असेही विष्णू पुराण सांगते.

सत्ययुगात धर्म चारी पायांवर उभा होता.
त्रेतायुगात तो धर्म तीन पायांवर उभा राहिला.
त्यानंतरच्या द्वापारयुगात तो धर्म दोन पायांवर उभा राहिला
आणि
कलियुगात तो धर्म एका पायावर उभा आहे, असे मानले जाते.

संदर्भ :- भागवत पुराण, विष्णू पुराण

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *