सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

326-15
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ 326 ॥
देवा, अवयवांचा शरीराशी संयोग किंवा वियोग म्हणणे जसे अप्रस्तुत, तसे, तुझ्याशी अभिन्न असलेले जीव ह्यांचा तुझ्याशी संयोग किंवा वियोग होतो ही भाषा बोलण्याची सोय नाही. 26
327-15
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि? ॥ 327 ॥
आणि जे तुमच्याहून नित्य वेगळे आहेत त्यांचे तुमच्याशीं कधींही ऐक्य होणार नाही. मग, ते परत येतात आणि येत नाहीत व्यर्थ उठाठेव कसली? 27
328-15
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥ 328 ॥
असा दुहेरी पेंच असल्याने तुझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे ते आहेत तरी कोण, ह्याविषयीं, हे विश्वतोमुखा, माझी समजूत करावी. 28
329-15
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ 329 ॥
अर्जुनाच्या ह्या शंकेने, सर्वज्ञशिरोमणि भगवान् श्रीकृष्ण, शिष्याची धारणाबुद्धि पाहून मनांत संतुष्ट झाला. 29
330-15
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥ 330 ॥
मग भगवान् म्हणाले, अर्जुना, मोठा बुद्धिमान् आहेसरे ! अरे, माझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे सांगितले ते दृष्टि भेदाने माझ्याहून भिन्नही आहेत व अभिन्नही आहेत 330

331-15
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥ 331 ॥
खोल विचार करून पाहिला, तर, त्यांचे व माझे स्वभावसिद्ध ऐक्य आहे; आणि वरवरच्या (उथळ) दृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत असेही म्हणावें लागले. 31
332-15
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ । एऱ्हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ॥ 332 ॥
जशा पाण्यावरील लाटा ह्या पाण्याहून वेगळया आहेतशा दिसतात, पण वस्तुतः या जलरूपच असतात 32
333-15
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें । मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥ 333 ॥
अलंकार हे सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते; पण विचार केला म्हणजे ते सर्व सोनेंच आहे असे ठरतें; 33
334-15
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥ 334 ॥
त्याचप्रमाणे अर्जुना, शुद्ध ज्ञानदृष्टया, त्यांच्यांत व माझ्यांत भेद नाहींच; पण भिन्न आहेत अशी जी बुद्धि होते, तो सर्व अज्ञानाचा प्रभाव होय. 34
335-15
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें । भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥ 335 ॥
सम्यकवस्तुविचारदृष्टीनें, अद्वितीय एक जो मी, त्या माझ्यापुढे दुसरें येणार कोठून कीं. तें भिन्न आहे कीं अभिन्न आहे हें तुला सांगावें? 35

336-15
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी । तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे? ॥ 336 ॥
सूर्यबिंबानेंच सर्व आकाश व्यापून पोटांत घातले तर, प्रतिबिंब होण्याला स्थलच कोठलें? किंवा किरण तरी कोठे पडणार? 36
337-15
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया? । म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज ॥ 337 ॥
अर्जुना, प्रलयकाळचे उदक, हें काय नदीनाले ह्यांच्या पाण्याने भरलें जातें? त्याचप्रमाणे सर्वव्यापक, अविक्रिय, अपरिच्छिन्न जो मी एक, त्या मला अंश कोठेच? 37
338-15
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें । रवी दुजेपण आलें । तोयबगें ॥ 338 ॥
परंतु, उजू असलेले पाणीही ओघाच्या योगाने जसे वाकडे वाटू लागतें, किंवा सूर्यबिंबालाच जलामुळे प्रतिबिंबरूप दुजेपणा येतो. 38
339-15
व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे । परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ॥ 339 ॥
आकाश चौकोनी की वाटोळे? ह्याचे उत्तर ते कसल्याही आकाराचे आहे हे होय; पण, घटमठादि उपाधीमध्ये ते बाटोळे व चतुष्कोण असेही असतें. 39
340-15
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे? । स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ॥ 340 ॥
अरे, निद्रेच्या आधारावर पडणाच्या स्वप्नांत, जेव्हां हा ‘राजा’ होतो तेंव्हा त्या अवस्थेतील राज्यादि सर्व प्रपंचरूपाने हा एकटाच नटलेला नसतो काय? 340

341-15
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें । तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी ॥ 341 ॥
किंवा, उत्तम सोने हिणकस धातूच्या मिश्रणाने जसे कसाला कमी भरते त्याप्रमाणे, शुद्धस्वरूप जो मी, त्या माझ्याशीं स्वमायेचा जेव्हां योग किंवा संबंध घडतो (उपाधियुक्त होतो) 41
342-15
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे । मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ॥ 342 ॥
तेव्हां एका अज्ञानाचाच प्रादुर्भाव होऊन ‘मी कोण?’ असा विकल्प उत्पन्न होतो व मग खऱ्या स्वरूपाचा विसर पडून ‘ देहच मी’ असा निश्चय ठरतो. 42
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥15. 7॥

343-15
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे । तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें ॥ 343 ॥
ह्याप्रमाणे सर्वव्यापक आत्म्याचे शरीर तोच मी, असे वेगळे किंवा मर्यादित ज्ञान होते, त्यावेळीं परिच्छिन्नत्वामुळे जीव हा माझा अंश आहे असे भासतें. 43
344-15
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं ॥ 344 ॥
वायूच्या योगाने समुद्रावर लाटा उठतात तेव्हां त्या समुद्राचाच लहानसा अंश आहे असे जसे दिसतें. 44
345-15
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं ॥ 345 ॥
त्याप्रमाणे, जडदेहाला चेतना देणारा व तद्विषयक अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्यस्वरूप मी, तोच ह्या मृत्युलोकीं जीवभावाने नांदतो. 45

346-15
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥ 346 ॥
जीवाच्या ज्ञानाचा विषय असणारी जी ही जगतांतील घडामोड, तो ” जीवलोक” शब्दाचा अभिप्राय होय. 46
347-15
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥ 347 ॥
आपण देहाबरोबर जन्माला आलों व देहाबरोबर मरणार हा व्यवहार जो सत्य मानतो तोच जीवलोक (जन्ममृत्यु सत्य मानणे ही जीवसृष्टि) व संसारही तोच. 47
348-15
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं । जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ॥ 348 ॥
उदकांत प्रतिबिबित झालेल्या चंद्राचा जसा उदकाला स्पर्शही नसतो, तसा ह्या जीवलोकाच्या ठिकाणी मी असंगत्वाने आहे असे तू समज. 48
349-15
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥ 349 ॥
किंवा कुंकुमावर ठेवलेला स्फटिकमणि, पहाणाराला जरी तांबडा वाटला तरी, तो खरोखर तांबडा नसतो.49
350-15
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ॥ 350 ॥
त्याप्रमाणे माझे अनादिसिद्धत्व न मोडतां, व अक्रियत्वाला बाध न येता, मी कर्ता भोक्ता आहें असें जें वाटतें, ती, अर्जुना, भ्रांति आहे असे समज. 350

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *