276-14
पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ॥276॥
वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तू (विस्मृतीने) आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते.
277-14
जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे । तैं हारी जैत होईजे । आपणपांचि ॥277॥
आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्यावेळेस राजा स्वप्न पहातो, त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी दडलेला जय अथवा पराजय आपणच होतो. (त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे) राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे),
278-14
तैसे मध्योर्ध्व अध । हे जे गुणवृत्तिभेद । ते दृष्टीवांचूनि शुद्ध । वस्तुचि असे ॥278॥
त्याप्रमाणे (वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे) उत्तम गती, मध्यम गती व अधोगती हे गतीचे भेद गुणवृत्तींच्या भेदामुळे आहेत. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तू शुद्ध आहे तशीच आहे.
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥14.19॥
श्लोकार्थ -: -::- जेव्हा गुणातीत पुरुष (गुणांचा) द्रष्टा होऊन गुणांवाचून इतर कर्ता नाही (म्हणजे गुणच कर्मे करतात) असे जाणतो व गुणांहून वेगळा जो (साक्षी) आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो पुरुष गुणातीत जे माझ्या स्वरूपाप्रत पावतो.
(गुणातीत मनुष्य स्वत:ला अकर्ता समजतो तेव्हा मत्स्वरूप पावतो)
279-14
परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो । परिसें तें सांगतसों । मागील गोठी ॥279॥
परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो. ऐक.
280-14
तरी ऐसें जाणिजे । सामर्थ्यें तिन्ही सहजें । होती देहव्याजें । गुणचि हे ॥280॥
तर हे तिन्ही गुणच आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावत:च देहाच्या निमित्ताने होतात. देहच बनतात.
281-14
इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे । कां आंगवे तरुवरें । भूमिरसु ॥२८१॥
ज्याप्रमाणे लाकूड ज्या आकाराचे असेल, त्याच आकाराचा अग्नि होतो किंवा सर्व प्रकारच्या वृक्षात भूमीचा एकच रस त्या त्या प्रमाणे होतो.
282-14
नाना दहिंयाचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें । कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं ॥२८२॥
अथवा जसे दूधच दह्याच्या रूपाने परिणाम पावते किंवा गोडीच उसाच्या रूपाने साकार स्वरूपात येते.
283-14
तैसें हे स्वांतःकरण । देहचि होती त्रिगुण । म्हणौनि बंधासि कारण । घडे कीर ॥२८३॥
त्याप्रमाणे हे तीन गुणच अंतःकरणासह देहरूप होतात; म्हणून ते बंधन करण्याला कारणीभूतही होतात.
284-14
परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥२८४॥
तरीपण, अर्जुना ! हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबध्द होऊनही त्याच्या मोक्षस्थितीत यत्किंचित कमीपणा येत नाही.
285-14
त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें । चाळितांही न खोमें । गुणातीतता ॥२८५॥
तीन गुण हे आपआपल्या स्वभावधर्माप्रमाणे देहाचे ठिकाणी मागे झालेल्या व पुढे होणार्या कर्मरूपाने राहाटत असता जीवाची मूळची गुणातीत स्थिती यत्किंचितहि उणी होत नाही.
286-14
ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ॥२८६॥
अशी जीवाची गुणातित मक्तावस्था जी स्वाभाविकच आहे ती, तू आत्मज्ञानरूपी कमळावरील भ्रमर असल्यामुळे तुला सांगतो, ऐक.
287-14
आणि गुणीं गुणाजोगें ।चैतन्य नोहे मागें । बोलिलों तें खागें । तेवींचि हें ॥२८७॥
आणि चैतन्य हे गुणांमध्ये असले तरी गुणाजोगे होत नाही व तसेच ती अंतिम स्वरूपस्थिति आहे, हे मागे सांगितलेच आहे.
288-14
तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे । स्वप्न कां जैसें । चेइलेनी ॥२८८॥
तरी अर्जुना ! ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्नाला भास समजतो, त्याप्रमाणे जीव जगाला सत्य न समजता मिथ्याभासरूप समजेल
289-14.
नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनी न्याहळी । चळण होतां कल्लोळीं । अनेकधा ॥२८९॥
किंवा आपण पाण्यात बिंबलो आहो व पाण्यातील लाटांच्या अनेक प्रकारच्या चळणवळणाने अनेक प्रकारचे होत आहो; पण माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही, असे जसे तीरावर उभे राहून मनुष्य पाहतो.
290-14
कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे । तैसें गुणजात देखावें । न होनियां ॥२९०॥
ज्याप्रमाणे नट, घेतलेल्या नानाप्रकारच्या सोंगाने मी खरोखर तसा झालो, असे समजत नाही; त्याप्रमाणे मी संपूर्ण सत्वादिगुणाचा साक्षी, त्याच्याहून निराळा आहे, असे पहावे.
291-14
पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें । नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥291॥
ज्याप्रमाने आकाशावर आपआपल्या क्रियाक्रमानुसार तिन्ही ऋतु निर्मान होतात.आणि नाहीसे ही होतात.पंरतु हे सर्व एकमेकापासुन भिन्न भिन्र आहेत. हे नुसते पाहावे.
292-14
तैसे गुणीं गुणापरौतें । जे आपणपेंअसे आयितें । तिये अहं बैसे अहंते । मुळकेचिये ॥292॥
त्याप्रमाने गुण-व्यवहार सुरु असताना त्याहुन पलीकडे असे जे आपले सहज स्वरुप आणि जो अह’ या प्रथम असणारे स्फुरणांचे मुळस्थान, त्या आत्मस्वरुपाशी त्याची बुद्धि स्थिर होत असते.
293-14
तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजित ॥293॥
मग तेव्हा तो त्या मुळस्वरुपाशी पाह लागला असता तो म्हणतो की, मी कर्माचा कर्ता नसुन, केवळ साक्षीभुत आहे. आणि सर्व कर्म ञिगुणांपासुन तयार होतात.
294-14
सत्त्वरजतमांचा । भेदीं पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥294॥
प्रकृतीस्वरुप असलेल्या सत्विक-राजस-तामस या विषेश अवस्थाप्रमाने कर्माचा विस्तार होते असतो, म्हणुन हा जो कर्माचा विस्तार आहे. तो ञिगुणांचा परिनाम आहे.
295-14
ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥295॥
वनामधे जसा वसंतऋतु वनाची शोभा वाढवण्यास कारणीभूत असतो, पंरतु तो या सर्वापासुन अलिप्त असतो.तसा मी या सर्व क्रिया करुनही अलिप्त आहे.
296-14
कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ॥296॥
अथवा तारागंनाच्या समुदायांनी लोपुन जावे. सूर्यकांतमण्याने अग्नी उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे.
297-14
ये कोणाचीं काजें कहीं । सवितिया जैसी नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥297॥
यापैकी कोणाच्याही कार्यामधे सूर्य जसा केव्हाही कोणालही कारण होत नाही, त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित असुन देखिल, केवळ साक्षित्वाने, अधिष्ठानरूप होऊन राहिलो आहे.
298-14
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे । ययाचेनि निःशेषें । उरे तें मी ॥298॥
मी स्वरुपातःप्रकाशित होऊन तिन गुणांचे प्रकाशन करत असतो. गुणांच्या ठिकाणी गुणांस पहातो, या तिन गुणांच्या ठिकाणी (असणारा) गुणत्व माझ्या सत्तेने वाढले जाते. व या गुणांचा आभास झाल्यावर जे उरते ते मीच आहे.
299-14
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें ॥299॥
हे धनंजया अशा या विवेकाचा किंवा विचाराचा ज्याच्या ह्रदयात उदय होतो त्यास गुणातीतपणा (उच्च) स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो.
300-14
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥14.20॥
श्लोकार्थ -: -: देहाला कारण असणार्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, जरा व इतर दु:खे यांनी मुक्त होऊन, मनुष्य मोक्ष, अमृतत्व पावतो_
(अमृतत्व कोणाला मिळते?)
आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक । जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ॥300॥
आता निर्गुण ब्रम्ह म्हणून जे तिनही गुणापेक्षाही वेगळे आहे ते तो बिनचूक जाणतो. कारण की ज्ञानाने त्याला द्रष्टा असणारा पुरुष संशयरहित आणि भ्रमरहित होऊन जाणतो. कारण की ज्ञानाने आपले रहाण्याचे ठिकान त्याच्याच ठिकानी स्थायिक केलेले असते.
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण