संत ज्ञानेश्वर म. चरित्र १५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-१

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

नामदेवाचा आकांत पाहिल्या जात नव्हता. ज्ञानोबांच्या आतांपर्यतच्या कार्याचा आढावा घेत म्हणाले, माझ्या ज्ञानोबाचं कौतुक कुठवर वर्णन करु? रेड्याच्या मुखी वेद म्हणवले, जड भिंत चालविली, परमार्थाची वाट भोळ्या भाविकांसाठी मोकळी करुन पतीतांचा उध्दार केला. योगमार्गाचा दीप पाजळुन भक्तीची पताका फडकविली. अपरंपार भजन, किर्तनाचा सोहळा, गीतेवर मराठीत टीका करुन जन सामान्य, सर्व स्तरांतील लोकांसाठी ज्ञानाचे भांडार उघडे केले.

देवा! जळाविणं जसा मासा तडफडतो, तशी माझी गत झाली, प्राण कंठाशी आले रे! दाही दिशा उदासवाण्या झाल्यात. योग्याची विभुती चालली रे! मी खंत तरी किती करु? देवाने नामदेवाला जवळ घेऊन आसवे पुसली. त्याचे समाधान करत देव म्हणाला, नाम्या अरे! कुणासाठी येवढा शोकमग्न झालास? ज्ञानदेवासाठी? अरे! तो तर ज्ञान्यांचा देव, योग्यांचा योगी, ज्ञानाची संजीवनी, ज्ञानाचा सागर, आगर, भवसिंधु तरुन पलीकडे नेणारी नांव आहे. ज्ञानदेव हा माझं प्रत्यक्ष रुप आहे. तो कुठही जात नाही की, कुठुनही येत नाही…….

ज्ञानदेव ज्ञानसागरु। ज्ञानदेव ज्ञानगुरु। ज्ञानदेव भवसिंधु तारु। प्रत्यक्ष रुपे पै असे।। ज्ञानदेव हाचि देव।ज्ञानदेवां धरलिया भाव। ज्ञान होईल जीवां सर्व यासी संदेह नाही।।

तरी पण जीथे नामदेवाचे समाधान होत नव्हते, तिथं निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांचे काय? त्यांना काय वाटत असेल? त्यांच्या मनाची अवस्था कशी असेल?ज्ञानदेव भावावेशांत बसले आहेत. निवृत्ती स्फुंदताहेत, सोपान, मुक्ताई ढसाढसा रडताहेत, देव समजावतो आहे, पण कांहीच उपयोग नाही.

निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी। धरियेली कंठी पांडुरंगे।।कळवळती मनीं करिती दीर्घश्वनी। आठविती मनी ज्ञानदेव।।

विकल झालें चित्त संत हे दुश्चत्ता। नामा विकल तेथ होत असे।।

सर्व साधुसंत निवृत्तीनाथांना समजावूं गेले, तर निवृततीनाथ अत्यंत आर्ततेने, विकलतेने म्हणाले, एखाद्या तळ्याचा बांध फुटावा आणि पाणी बारा वाटेने वाहुं लागावे, गवताच्या पेंडीचै बंधन सुटुन गवत रानोमाळ व्हावं, हरिणीने पाडसाला टाकुन दूर निघुन जावं, अन् पाडसांनी दशदिशा हाकारत शोधावं! अगदी तसच माझं झालं आहे, कसं समाधान करुन घेऊ?

अरे! जेव्हा एका रात्री आमचे आई बाबा आम्हाला टाकुन पोरके करुन गेलीत, त्यावेळी तर अगदी लहान होतो, तरी सुध्दा त्यावेळी आतांसारखे मनाला कष्ट झाले नाहीत. आतां माझा ज्ञानोबा  चालला! मी कसं सहन करु? काय करु? निवृत्तीनाथ म्हणजे मुक्त योगी! त्यांच समाधान कुणी करायच? शेवटी  विठ्ठल रुख्माईसह अन् कांही साधुसंत निवृत्तींना समजावत म्हणाले,” निवृत्तीराजा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानदेवांचे गुरु! तुम्हीच जर असा शोक केला, स्वतःला सावरलं नाही तर, बाकीच्यांनी, अडाणी माणसांनी काय करावे बर?

कसे बसे निवृत्तीनाथांनी आपल्या भावनांना आवर घालुन मनाला समजाव ले पण सोपान, मुक्ताईचे काय? त्यांच्या दुःखाला तर ना अंत ना पार! मुक्ताईचे पालन पोषण तर आई होऊन ज्ञानोबांनी केले. तीच्या दुःखाची तर कल्पनाच करवत नाही. सोळा वर्षाच्या मुक्ताईने जमीनीवर घालुन घेतले. बिचारीला अगदी लहान, नासमज असतांना आईवडील सोडुन गेलेत,

त्यांच्या माघारी ज्ञानोबाच तीचं सर्वस्व होऊन  प्रत्येक नात्याने तीचे आईवडील, भाऊ बहिण, मार्गदर्शक, संरक्षक होऊन तीची वेणीफणी, न्हाऊ माखु घातले , झोपतांना अंगाई म्हणुन झोपवणे, सर्व नात्याने व खर्‍या अर्थाने तीला वाढवले. अशा या ज्ञानोबासाठीची तिच्या दुःखाची परिसीमाच राहिली नाही.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *