सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

651-11
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥
असे वाटते की, मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाच्या आकारात जी व्यापक विश्ववस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या प्रेमाकरिता उकलून दाखविली.
652-11
तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥652॥
तेव्हा अर्जुनाने तिचा विस्तार व रंग चांगले लक्ष देऊन पाहिले, पण गिर्‍हाईकीचा संबंध झाला नाही – ग्राहकाला आवडले नाही – म्हणून परत त्याची भगवंताने घडी केली.
653-11
तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥653॥
त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अपार विस्तारामुळे, संपूर्ण विश्व व्यापिले गेले, तेच सौम्य व गोजिरवाणे असे मर्यादित साकार झाले.
(विश्वरूप व श्रीकृष्णस्वरूप हे दोन्ही खरोखर एकरूपच आहेत; म्हणून त्यांचा दोनपणा किंवा भिन्नपणा मानणे, हा भ्रम होय. हेच तत्व माउलींनी वरील ओव्यांत निरनिराळे दृष्टांत देऊन प्रतिपादिले आहे.)
654-11
किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥654॥
किंबहुना भगवान श्रीकृष्णांनी पुनः लहानसे रूप घेतले, पण विश्वरूपाला पाहून भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला.
655-11
जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥655॥
तेव्हा स्वप्नांत “मी स्वर्गाला गेलो” असे पाहणारा पुरुष, जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला.


656-11
नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥656॥
किंवा गुरुची कृपा झाल्याबरोबर, ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंचज्ञान मावळून आत्मतत्व अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपानंतर भगवंताची सगुण साकार श्रीकृष्णमूर्ती पाहिली.
657-11
तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥657॥
ती श्रीकृष्णमूर्ती पाहिल्यावर, अर्जुनाच्या मनांत असे वाटले की, श्रीकृष्ण व माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा आड होता, तो बाजूला सारला गेला, हे फार बरे झाले.
658-11
काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥658॥
जणू काय काळाला जिंकून परत आला किंवा भयंकर सोसाट्याच्या वार्‍याला मागे हटविले अथवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन काठास लागला.
659-11
ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥659॥
अशा प्रकारचा अत्यंत संतोष, विश्वरूपानंतर श्रीकृष्णमूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला.
660-11
मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥660॥
मग सूर्य अस्तास गेला असता, ज्याप्रमाणे आकाशांत नक्षत्रे चमकू लागतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णमूर्तीबरोबर अर्जुन व सर्व भूतसृष्टीसहित पृथ्वी पाहू लागला.


661-11
पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥661॥
अर्जुन पाहतो तो तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र, तसेच दोन्ही दळांना गोत्रज उभे असून, दळांतील वीर परस्परांवर शस्त्रास्त्रांच्या समुदायांचा वर्षाव करीत आहेत.
662-11
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥662॥
आणि त्या बाणांच्या मांडवात रथ स्थिर असून, रथाच्या धुरेवर भगवान श्रीकृष्ण बसले आहेत आणि आपण त्याच्या खाली बसलो आहोत, असे तो पाहू लागला.
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ।।11.51।।

अर्थ अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालो आहे.॥11-51॥
663-11
एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥663॥
याप्रमाणे पराक्रमाचा खेळ करणार्‍या अर्जुनाने जसे मागितले, तसे पाहिले व मग मनात म्हणाला आता माझ्या कुडीत प्राण आला असे वाटते.
664-11
बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥664॥
आतापर्यंत माझे ज्ञान बुध्दीला सोडून विश्वरूपाच्या भीतीने जंगलात पळाले होते व अहंकारासहित मन देशोधडीस लागले होते.
665-11
इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥665॥
इंद्रियांना कर्म करण्याचे भान राहिले नाही, वाचेचे ठिकाणी शब्द उच्चारण्याची शक्ती राहिली नाही, अशी शरीराचे ठिकाणी सर्वांची दुर्दशा झाली होती.


666-11
तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥666॥
अर्जुन मनात म्हणतो, या श्रीमूर्तीच्या योगाने ही संपूर्ण इंद्रिये पुनः जिवंत प्रकृतीला भेटली म्हणजे सजीव झाली आणि या मूर्तीमुळेच आता मी वांचलो असे मला वाटत आहे.
667-11
ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥667॥
याप्रमाणे अर्जुन मनात अत्यंत समाधान पावून, मग श्रीकृष्णाला म्हणाला, मी तुमचे मनुष्यासारखे असलेले हे रूप पाहिले.
668-11
हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥668 ।
देवराया ! मला तुम्ही हे रूप दाखविणे म्हणजे आईशी चुकामूक झालेल्या मज लेकराचे सांत्वन करून आईने स्तनपानच दिले आहे.
669-11
जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥669॥
जी देवा ! जो मी या विश्वरूप सागरात दोन हातांनी लाटा मोजीत होतो, तो आता मी श्रीकृष्णमूर्तीरूपी तीरास लागलो आहे.
670-11
आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥670॥
हे द्वारकापुरातील मित्रा ! ऐक. मला तू या रूपाने पुनः भेट दिलीस, ती भेट नसून, सुकू लागलेल्या मज झाडावर मेघांचा वर्षाव केलास.


671-11
जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज । 671॥
खरोखर तृषेने पीडलेल्या मला, कृष्णमूर्तीचे दर्शन झाले म्हणजे जणू अमृताच्या समुद्राचीच प्राप्ती झाली आहे. आणि आता जगण्याचा भरवसा वाटू लागला आहे.
672-11
माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥672॥
माझ्या ह्रदयदेशात हर्षरूपी वेली लावल्या जात असून आता माझी व सुखाची फारकत नाहीशी होऊन ऐक्य झाले आहे. (ज्याप्रमाणे झाडाची फांदी वाकविता वाकविता काही कालाने ती, स्वाभाविक वाकल्याप्रमाणे होऊन राहते किंवा संसारात सर्व प्राण्यांचे, आपल्या अपत्याविषयी जसे स्वाभाविक प्रेम असते, तेथे प्रेमकरणरूप क्रिया करावी लागत नाही, त्याप्रमाणेच, प्रेमळ भक्तांचे, आपल्या सगुण भगवंताचे ठिकाणीही असलेले प्रेम स्वाभाविक होऊन जाते. तेथेही प्रेम करण्याची क्रिया राहत नाही, असा भक्तांचा अनुभव असतो, हेच या ओव्यांतून दाखविले आहे. श्रीज्ञानेश्वर माऊलींनी पुढे अठराव्या अध्यायांत “तैसी क्रिया किर न साहे । परी अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचि जोगे नोहे । बोला ऐसे ॥या ओवीने हाच भाव दाखविला आहे.”)
श्रीभगवानुवाच
। सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ।।11-52॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासाने दिसण्याला कठिण असे जे माझे हे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत.॥11-52॥
विश्वरूप दुर्लभ
673-11
यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥673॥
याप्रमाणे अर्जुन बोलला असता, देव म्हणाले, बा अर्जुना!हे काय बोलतोस? तू माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी प्रेम ठेवून ये.
674-11
मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥674॥
आणि मग तू एकट्याने म्हणजे नुसत्या देहाने या माझ्या श्रीकृष्णमूर्तीला भेटावे, ही जी मी तुला शिकवण दिली, ती तू सुभद्रापती अर्जुना! विसरलास ना.
675-11
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥675॥
हे आंधळ्या अर्जुना!अनायासे प्राप्त झालेल्या सुवर्णमेरूचाही विशेष आदर वाटत नाही, असा हा मनाचा विपरीत स्वभाव आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *