126-13
आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥(द्वेष = 126)
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती, तिला द्वेष असे म्हणतात.
127-13
आतां यावरी सुख । तें एवंविध देख जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु॥127॥(सुख व दु:ख = 127)
आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो,
128-13
मना वाचे काये । जें आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडितजें ये ॥128॥
जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, (व्यापार बंद करते) आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते,
129-13
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥129॥
जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा (शांत) होतो व सात्विकवृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीचे वर चढत जाते,
130-13
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांतीं व । थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ॥130॥
आणि अर्जुना,जे सर्व इंद्रियवृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून निद्रा आणते
131-13
किंबहुना सोये । जीवआत्म्याचीलागे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥131॥
फार काय सांगावे?जीवाला आत्म्याचा लाभ(ऐक्य)जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते, त्या स्थितीला सुख हेनाव आहे.
132-13
आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था । जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥132॥
आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज.
133-13
तें मनोरथसंगें नव्हे । एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥133॥
ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी (मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की) ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय (मनाची स्थिरता व मनाची चंचलता) सुखदुखाला कारणीभूत आहेत.
134-13
आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पंडुसुता । चेतना येथें ॥134॥
(चेतना = 134)अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामधे जी सत्ता आहे, तिला येथे चेतना हे नाव आहे.
135-13
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥135॥
जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहेमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही,
136-13
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं । प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥136॥
मन व बुद्धी जिच्या योगाने प्रसन्न असतात. व जी नेहेमी प्रकृती(शरीर) रूपी वनाचा वसंतऋतू आहे,
137-13
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥137॥
बद️ जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही.
138-13
पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥138॥
आपला लवाजमा वगैरे किती आहे, जे राजास ठाऊक नसताही त्याचीआज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते,अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते)
139-13
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥139॥
अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते (हालचाल करावयास लावते) अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते,
140-13
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥140॥
अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते.
141-13
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा॥141॥
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती, ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, (म्हणजे जडाला चेतनदशेला आणते).
142-13
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना । आतां धृतिविवंचना । भेदू आइक ॥142॥
याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशेला आणल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना’ असे म्हटले जाते.
(धैर्य = 142) आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक.
143-13
तरी भूतां परस्परें । उघड जातिस्वभाववैरें । नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ॥143॥
तर पंचमहाभूतांमधे एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय?
144-13
नीरातें आटी तेज । तेजा वायूसि झुंज । आणि गगन तंव सहज । वायू भक्षी ॥144॥
पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज (स्वभावत:च) वायूला नाहीसा करते.
145-13
तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें ॥145॥
त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमधे शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपत: अलग असते ते आकाश होय.
146-13
ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें । कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती॥146॥
अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत, असे त्यांचे स्वभावत: वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात.
147-13
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥147॥
म्हणजे द्वंद्वाची उखीविखी (वैराविषयी वादविवाद) सोडून एकोप्याने रहातात. इतकेच नाही तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्याला पोषित असतो.
148-13
ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥148॥
याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति असे मी म्हणतो.
149-13
आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥149॥
आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तिसावे संघात नावाचे तत्व जाणावे.
150-13
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥
या छत्तीस तत्वांनी युक्त ते क्षेत्र = याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात हे प्रसिद्ध आहे.
