51-16
येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो । हा सम्यक्ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ॥ 51 ॥
ब्रह्मप्राप्तीला इतकें बलवत्तर दुसरें साधनच नाही; सर्व उपायांमध्ये सम्यक् ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले. 51
52-16
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें । आदरें तया ज्ञानातें । वोंवाळिलें जीवें ॥ 52 ॥
इतक्या अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते, त्यांनीं संतुष्टचित्त होऊन, त्या ज्ञानोपायावरून आपले प्राण ओवाळन टाकिले. 52
53-16
आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरीं पुढें पुढें । रिगों लागें हें घडे । प्रेम ऐसें ॥ 53 ॥
ज्याला ज्या विषयाची अत्यंत आवड असते, त्याची त्या विषयांत पुढे पुढे गति असते हें प्रेमाचे लक्षणच आहे. 53
54-16
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं । ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी । तंव योग क्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं ॥ 54 ॥
व प्राप्त झाले असतां कसें टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार.54
55-16
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्न । घडेल केवीं ॥ 55 ॥
म्हणून ते सम्यक् ज्ञान कसे हस्तगत (अपरोक्षत्वाने) होईल व झाल्यास त्याच्या वृद्धीचा यत्न कोणता करावा. 55
56-16
कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये । तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं ॥ 56 ॥
किंवा, ज्या कारणास्तव में ज्ञान उत्पन्नच न व्हावे, अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावें, अशी ज्ञानाला प्रतिबंधक कोणती गोष्ट आहे ते कळावें. 56
57-16
मग जाणतयां जें विरू । तयाचीं वाट वाहती करूं । ज्ञाना हित तेंचि विचारूं । सर्वभावें ॥ 57 ॥
म्हणजे त्यायोगे तो ज्ञानाला विघ्न करणारा मार्ग सोडून देऊन, त्याला हितकर असेल त्याच मार्गाचा सर्वभावें आदर करू 57
58-16
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥ 58 ॥
तुम्हा सर्व जिज्ञासूंच्या मनांत हे कळावें असा जो भाव आहे तो पुरविण्यासाठी लक्ष्मीपति भगवान् पुढे सांगतील. 58
59-16
ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥ 59 ॥
जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी, त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आतां करितील.59
60-16
आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥ 60 ॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या मिषाने रागद्वेषांदिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ति तिचेही देव वर्णन करितील. 60
61-16
सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायीं उभारणी । केली होती ॥ 61 ॥
ह्या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात, हें सांगण्याचा उपक्रम नवव्या अध्यायांत केला होता. 61
62-16
तेथ साउमा घेयावया उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । तरी तयां प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे ॥ 62 ॥
तेथे त्यांचा समग्र विचार करावयाचा होता, पण दुसराच प्रसंग (विषय) पुढे येऊन ते तसेच राहिले, म्हणून देव आतां त्या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करितील. 62
63-16
तया निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें । लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी ॥ 63 ॥
अध्यायाच्या अनुक्रमाने पहातां हें निरूपण सोळाव्यांत पडतें हे खरे; पण तो मागील विषयाचाच विस्तार होय. 63
64-16
परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाच्या हिताहितीं । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥ 64 ॥
पण हे आतां असो; ज्ञानाला हितकारिणी व अहितकारिणी अशा ह्या दोनच संपत्ति समर्थ आहेत. 64
65-16
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका ॥ 65 ॥
जी मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोहांधकारांतून प्रवास करतांना दिव्याप्रमाणे वाट दाखविणारी, ती दैवी संपत्ति प्रथम श्रवण करा. 65
66-16
जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं । संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे ॥ 66 ॥
जेथे एक पदार्थ दुसऱ्याला पोषक असतो असे अनेक पदार्थ एकत्र जमले म्हणजे त्याला संपत्ति असे म्हणतात. 66
67-16
ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणें येकोपजीवीं । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥ 67 ॥
दैवयोगाने, अशी सुखप्राप्ति करून देणारी साधने एकत्र झालीं म्हणजे ती दैवी संपत्ति होय. 67
68-16
श्री भगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥ 16.1॥
आतां तयाचि दैवगुणां- । माजीं धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसें ॥ 68 ॥
आतां ह्या दैवी संपत्तीमध्ये ज्याला प्रमुखस्थान लाधलें आहे त्याला ‘अभय’ अशी संज्ञा आहे.68
69-16
तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी । कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया ॥ 69 ॥
जो महापुरांत उडी घेत नाही त्याला जसें बुडण्याचे भय नसतें, किंवा जो नित्य पथ्य पाळितो त्याला रोग जसा गांठीत नाही. 69
70-16
तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणें येणें ॥ 70 ॥
त्याचप्रमाणे कर्म करणे अगर न करणे ह्यांविषयीं जो अत:करनात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे कारण नाही. 70
71-16
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें । भयवार्ता देशें । दवडणें जें ॥ 71 ॥
अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशाप्रकारे विस्तारला आहे कीं जें कांहीं दिसेल तें आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाहीं. 71
72-16
पाणी बुड{ऊं} ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें । तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय ॥ 72 ॥
पाणी मिठाला बुडवू लागलें तर, मीठच जलरूप होते, त्याप्रमाणे सर्वत्र अद्वैतभावना झाल्यावर (म्हणजे भय कारण जें द्वितीयत्व हें नाहींसे झाल्यावर) भयाला अवसरच कसा असणार? (तें नष्टच होतें) 72
73-16
अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें । सम्यक्ज्ञानाचें आघवें । धांवणें हें ॥ 73 ॥
अरे, अभय असे म्हणतात ते ह्याप्रकारें जाणावें; सम्यक् ज्ञानाशिवाय ते साध्य होत नाही. 73
74-16
आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥ 74 ॥
आतां ज्याला सत्वशुद्धि म्हणतात ती ह्या चिन्हांवरून ओळखावी; जशी राखोंडी जळतही नाही किंवा विझविणेचेंही कारण नसतें. 74
75-16
कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे ॥ 75 ॥
किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ति झाली व पाडव्याच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितींत चंद्राचे जसे अतिसूक्ष्मरूप असतें. 75
Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण
