सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

551-11
देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥551॥
देवा!तुम्ही जेवणाचे वेळीं माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असां, पण मी फुगुनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा!
552-11
देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥552॥
देवाच्या अंतःपुरात खेळतांना मनांत शंका देखील येत नसे. देवा!तुझ्या अंथरूणावर तुझ्याबरोबर निजत असे.
553-11
‘कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥553॥
‘अरे कृष्णा!’म्हणून तुला हाक मारावी. तू एक यादव आमचा सोयरा आहेस, असे समजावें. तु जायला लागलास की तुला मी आपली आण वाहून’जाऊं नकोस’असे म्हणत असे.
554-11
मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोतटीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥554॥
तूं बसलेल्या असनावर मी बसणें किंवा तुझे म्हणणेंहि न ऐकणें, हे अतिपरिचयामुळें पुष्कळवेळा घडून आले आहे;
555-11
म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥555॥
म्हणून अनंता!काय काय अपराध सांगूं?मी सर्व अपराधांची राशीच आहे.


556-11
यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥556॥
म्हणून प्रत्यक्ष तुमच्यासमोर किंवा तुमच्या पश्चात्,जें कांही माझ्याकडून वाईट वागणें झालें, भगवंता!तें सर्व आईप्रमाणे पोटांत घाल.
557-11
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥557॥
देवा!कोणे एखादे वेळीं नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे येतात व दुसरा उपायच नसल्यामुळे समुद्र, त्या पाण्याला आपल्यांत समावून घेतो.
558-11
तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥558॥
त्याप्रमाणे प्रेमाने असो की प्रमादिने असो, बोलूं नये असें, सलगीमुळे सवयीने जे शब्द बोलले गेले असतील, ते सर्व भगवंता पोटांत घालावें.
559-11
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥559॥
आणि देवाच्या क्षमागुणांमुळे पृथ्वी क्षमा संज्ञेला पात्र झाली, म्हणून ती सर्व भूतसृष्टीला आधार झाली आहे; म्हणून पुरुषोतातमा!मी काय विनंति करूं!
560-11
तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥560॥
तरी आतां प्रमाणाच्या आटोक्यांत न येणार्‍या भगवंता!मज आपल्या शरणगताला या सर्व अपराधांची क्षमा कर.
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः॥11.43॥

अर्थ या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व आद्य असा गुरु आहेस. हे अप्रतिम प्रभावा (ज्याच्या प्रभावाशी तुलना करण्याला योग्य असा दुसर्‍या कोणाचाही प्रभाव नाही अशा) (स्वर्ग, मृत्यु, पाताळ, या) तिन्ही लोकांमधे देखील तुझ्य़ासारखा दुसरा कोणीही नाही. मग तुझ्याहून अधिक कोठून असणार?॥11-43॥


561-11
जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥561॥
अहो जी देवा!आतां मी यथार्थ महिमा जाणला आहे. तूं सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्तिस्थान आहेस.
562-11
हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता । वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥562॥
हरिहरांदि सर्व देवांची तूं परम पूज्य देवता असून, वेदालाहि उपदेश करणारा आद्य व परम गुरु तूं आहेस.
563-11
गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा । सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥563॥
हे श्रीरामा तूं अति गंभीर असून, सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी एकसारखा व्यापून आहेस. तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादि षड्गुण निरतिशय असून तुझ्यावांचून दुसरी वस्तूच नाही.
564-11
तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें? । तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥564॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे कांही नाही, हे काय बोलायचें?आकाशरूप झालेल्या ठिकाणीच संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे.
565-11
तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥565॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे आहे, हे म्हणतांच जेथे लाज वाटतें, तेंथे तुझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहें हें कसे म्हणतां येईल?


566-11
म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥566॥
म्हणून या संपूर्ण त्रिभुवनांत तूंच एक असून, तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक दुसरा कोणी नाही. तुझा अगाध महिमा वर्णन करतांना आमची मति कुंठित होते.
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥11-44॥

अर्थ यास्तव (जगताचा) स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला, मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करवून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस.॥11-44॥
567-11
ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥567॥
अर्जुन असें बोलला व भगवंताला पुनः त्याने साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा त्याला अष्टसात्विकभाव दाटून आले.
568-11
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध । समुद्रौनि मातें ॥568॥
मग अत्यंत गहिंवरून गद् गद् वाणीने भगवंताला म्हणाला, भगवंता! कृपा कर, कृपा कर व मला या अपराध समुद्रांतून बाहेर काढ.
569-11
तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज विईश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ॥569॥
तूं सर्व ब्रह्मांडाचा अहेतुक कल्याणकर्ता असूनहि, सोयरेपणामुळें आम्ही असें मानित नव्हतों तूं सर्व सृष्टीचा चालक, पण आम्हांला ते आश्चर्यकारक वाटत असें.
570-11
तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥570॥
तूंच एक सर्वस्वी वर्णन करण्यास योग्य, परंतु सभेमध्यें प्रेमाने तूं माझें वर्णन करावें व मी तें पाहून गर्वाने फुगून अधिकच बडबड करीत असे.


571-11
आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां ॥571॥
भगवंता ! आतां अशा माझ्या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधांपासून माझें रक्षण कर रक्षण कर.
572-11
जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं । परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले ॥572॥
माझे इतके असंख्य अपराध आहेत की अपराधांपासून माझें रक्षण कर अशी प्रार्थना करण्याचीहि माझ्या अंगी योग्यता राहिली नाही. पण मुलगा जसा बापाशीं सलगीने बोलतो तसे मी बोलत आहे.
573-11
पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥573॥
पुत्राचे असंख्य अपराध झाले तरी, पिता जसा ते सर्व अपराध दुजाभाव सोडून देऊन सहन करतो, तसें माझें सर्व अपराध, देवा!सहन कर.
574-11
सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥574॥
मित्राचा उद्दामपणा, जसा मित्र मनांत कांही न येऊ देतां सहन करतो, त्याप्रमाणे माझें सर्व अपराध तूं पोटांत घाल.
575-11
प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण । तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी ॥575॥
प्रिय, प्रियेच्या ठिकाणी मनाची मुळींच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण राजसूय-यज्ञांत उच्छिष्ट पानें काढलीं, त्याची क्षमा करा.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *